वाचनाच्या गोष्टी

सुभाष अवचट यांची अनेक चित्रे मला आठवतात. सुभाष अवचटचा परिचय झाला तेव्हा मी त्यांना जुन्या चित्रांच्या आठवणींबद्दल सांगितलेच. सुभाष अवचटच्या पुस्तकात इस्किलरसाठी काढलेल्या चित्रांचाही अनुभव आहे. किंबहुना मुखपृष्ठ आणि चित्र म्हणजे सुभाष अवचट हेच समीकरण होते. आजही दिवाळी अंक आले कि मी चित्रे पाहतो. चांगली चित्रे साहित्याचा आनंद वाढवतात.

एक दिवस भाऊ कमलाबाई निमकरमधून अनेक पुस्तकांची मुखपृष्ठ घेऊन आला. याचे कारण मला वाटते त्याला दोन पुस्तकांच्या मुखपृष्ठाचे काम  मिळालेले होते. त्यातील एक कादंबरी संगीतविषयक होती ती मी वाचली. अनेक संदर्भ घेऊन भावाने निळ्या काळ्या, आणि पांढऱ्या अशा रंगात ती चित्रे साकारली. त्या कादंबऱ्या आमच्याकडे कालपर्यंत होत्या आता मात्र त्या गायब झालेल्या आहेत.

घरी भावाचे मित्र येत असत. चित्रकलेवर चर्चा व्हायची. पॉल क्ली, व्हॅनगॉग यांची पुस्तके मी लहानपणीच पाहिली. इतकेच नव्हे रीडर्स डायजेस्टचे जगभरातील चित्रकारांवरील चित्रांचे पुस्तक मी रोज बघत असे. त्यातील ते दालीचे येशुख्रिस्ताचे चित्र किंवा माशाच्या शिकारीचे चित्र हे पाहताना वेगळीच भावना व्हायची. खऱ्या अर्थाने जागतिक चित्राचा परिचय लहानपणीच झाला. इतका की, आठवीत असताना माझी चित्रकला चांगली होती आणि त्यामुळे चित्रकलेच्या बाईंशी माझा नेहमी संवाद होत असे. एक दिवस मी भावाचे हे पुस्तक त्यांना नेऊन दिले आणि त्यांनी ते पाहून परत दिले.

ज्या लोकांचा व्यक्तिगत दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह चांगला असतो तो घरातल्या मंडळींना सांभाळणे खरंच कठीण जाते. अनेकदा अशी पुस्तके चक्क रस्त्यावर येतात. यावर उपाय म्हणजे एकतर त्या त्या  महाविद्यालयांशी त्यांनी त्यांच्या वाचनालयाशी त्यांनी जिवंतपणे कंत्राट करावा. उदा.- अमेरिकेमध्ये ज्यांच्याकडे दुर्मिळ किंवा महागडी चित्रे असतात ती मंडळी ती चित्रे जिवंतपणे डोनेट करतात. पण संग्रहालये ती चित्रे त्याच वेळी नेत नाहीत तर त्याच्या मृत्यूनंतर. मात्र त्याच्यावरचा टॅक्स माफ होतो. या प्रकारची उपयुक्त असलेली योजना सरकारने महाविद्यालयामधून करायला हरकत नाही.

दुसरे म्हणजे वाचनासाठी नियोजन करता का असे काहीजण विचारतात. या प्रश्नांचे उत्तर असे की मी याचे नियोजन करत नाही याचे फायदे तोटे हे आहेत की एकतर नियोजन करून वाचन होत नाही. तोटे बरेच आहेत एक म्हणजे अनेकदा ज्या पुस्तकांचे आपण वाचन करतो. त्या पुस्तकांबद्दल कळत नाही म्हणजे आपण सध्या काय वाचतो आहोत. मध्यंतरी मी ली चाईल्डच्या रहस्यकथांची तीन पुस्तके वाचली. तर मला असे वाटत होते की, नियोजन करत वाचली असती तर दोन महिन्यांनी एखादे पुस्तक वाचता आले असते.

रहस्यकथा किंवा विनोदी लेखक सलग वाचण्यापेक्षा सायकलने हे सारे वाचणे अशा पद्धतीचे नियोजन राजीव श्रीखंडे हा माझा मित्र करतो. तो एक लॅटिन अमेरिकन कादंबरी वाचतो मग रहस्यकथा वाचतो मग अभिजात साहित्य वाचतो. याप्रकारे एका विशिष्ट वर्तुळाच्या या पद्धतीने तो वाचतो.

वाचनालयाची स्थिती सुधारणे हे समाजात वाचन वाढवायचे असेल तर आवश्यक आहे. वाचनालयात कमी पगारावर का होईना, पण पुस्तकांची आवड असलेली माणसे नेमायला हवीत. विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड आहे. अशा पद्धतीच्या मुलांना जर वाचनालयात काम दिले तर अशा पद्धतीचे मुलांचे शोध अ‍ॅप्टिट्यूड टेस्टमधून घेता येतील. वाचनालयाची स्थिती सुधारण्यासाठी आणखी म्हणजे ज्या पद्धतीने जीएस्‌टी किंवा कर हा त्या त्या राज्यात वापरला जातो. तसेच तालुका ग्रामपंचायत किंवा जिल्हापरिषद यांना काही बजेट देऊन मिळालेल्या कराचा काही वाटा वाचनालयाची स्थिती सुधारण्यासाठी देता येईल.

या बाबत धुळ्याचे उदाहरण सांगण्यासारखे आहे. तिथे हर्षल विभांडिक या तरुणाने गावातून पैसे जमवून शाळा डीजिटाइज केल्या. तर त्याला मी म्हटले याचप्रमाणे शाळेचे ग्रंथालय बनवण्याचे काम सुरू करता येईल.

हा एक मुद्दा आहे, दुसरे असे की काही श्रीमंत मंडळींना देणग्या द्यायला लावून त्यांच्या हस्ते ग्रंथालयाची बांधणी करायला लावणे. म्हणजे उदा : रिया पब्लिकेशन्सची स्वस्त पुस्तके आता पाच-सहा हजारात शंभर पुस्तके येतात तर कोणालातरी सांगावे की तू ही शाळांना घेऊन दे. त्या त्या गावातील दहा जणांनी मिळून शंभर पुस्तके द्यावीत. यापद्धतीने शाळांना वाचनालयाचा संग्रह करता येईल.

वाचनासाठी वेळ काढण्यासाठी अनेक गोष्टी मी करतो. उदा : चहा पिताना, जेवताना मी नेहमी वाचतो. आणि माझा दिवसाचा बराच वेळ चहा पिण्यात जातो किंवा ड्रिंकिंग करताना वाचतो.  यामुळे काही तास तरी आपले वाचनात खर्च होतात. वाचन करता यावे म्हणून मी टी.व्ही घेतला नाही पण सिनेमे मी बघतो. ते सिनेमे पाहताना मी बरेच जुने सिनेमे पाहत असेन तर मी वाचन करतो. (य. दि. फडके याप्रमाणे चित्रपट बघत वाचन करीत) यातूनही वाचनासाठी वेळ मिळतो.

यापुढे एकही पुस्तक घ्यायचे नाही अशा निश्चय मी केलाय पण हा निश्चय पुस्तकाच्या दुकानात गेल्यावर तुटतो. यावर उपाय म्हणजे अलिकडे मी पुस्तक प्रदर्शनांना किंवा strand च्या सेलला जात नाही. पण हा काही उपाय तितकासा परिणामकारक नाही आणि योग्यही नाही मला वाटते वाचन करणाऱ्या सर्वांकडेच अतिरिक्त अशी पुस्तके तयार होत जातात. या पुस्तकांची एकदा काय ती नीट विल्हेवाट लावली तर वाचनासाठीचा वेळ कमी पडणार नाही. होते असे की आपण जितकी पुस्तके वाचू शकतो त्याच्या कितीतरी पट विकत घेतो आणि त्यातून हा त्रास होतो.

वाचनाची आवड लागायला ज्या पद्धतीने आम्ही शाळेत असताना वाचायला शिकलो. त्याप्रमाणे वाचायचे असेल तर मुलांसाठी वर्गात एक तास वाचनाचा हवा. शिक्षकांनी त्या काळात चांगली पुस्तके वाचून दाखवायला हवीत. आणि मोबाईलला शाळांमध्ये बंदी करायला हवी. हा एक उपाय आहे मला वाटते. दुर्दैवाने मी इंग्रजी आणि मराठी सोडून इतर भाषांतले फार लेखक वाचले नाहीत. हिंदीतून प्रेमचंद थोडासा वाचला आहे विनोद कुमार शुक्ल वाचले आहे. पण बाकी थोडी शेरोशायरी. पण माझे प्रामुख्याने आवडते लेखक हे इंग्रजीतच आहेत.

आणि फ्रेंच जर्मन लेखकांची उदा : पॅट्रिक सस्केंडसारखा लेखक हे सारे मी इंग्रजीतूनच वाचले आहेत. मिशेल वेल्वेक हा फ्रेंच लेखक मला आवडतो. त्याच्यानंतर विज्ञान कथा लेखक अराउंड द वर्ल्ड एटी डेज वाला वगरे किंवा ‘सूर्यावर स्वारी’ लिहिणारा जो विज्ञान कथा लेखक आहे तो, जुल्स व्हर्न  मला खूप आवडतो. असे हरिकी मुराकामीचे लेखन आवडते. अपडाईकच्या कथा कादंबऱ्या आवडतात. कॅनिडी लेखक हॅरीस मन्रोच्या कथा आवडतात. जॉन अपडाईकच्या कथा कादंबऱ्या माझ्या आवडीचा विषय आहे.

भारतीय कथांमध्ये डॉम मोराईस आवडतो आदिल जेसावालाच्या कविता आवडतात. रणजित होस्खोटेच्या कविता आणि गिरीष शहाणेचे लेखन आवडते. पॉल कॉपर, रिचर्ड फाईनमन हेही माझे आवडते लेखक आहेत. तत्त्वज्ञानपर लेखकांमध्ये वॉल्टर बेन्जामिन आणि फ्रेंच लेखक मिशेल फिको आणि रासेल्सारखे लेखक वाचणे हे आव्हान असते. आयजॅक असीमोवचे लेखन आवडते. पीटर ड्रकरचे अर्थ आणि व्यवस्थापन विषयक लेखन मी आवडीने वाचलेले आहे. आयझॅक असिमोवच्या कथा कादंबऱ्या आवडतात. झुम्पा लहरीचे साहित्य आवडते. अर्थात रशियन लेखक कार्ल मार्क्स पासून ते डोस्तोवस्की टॉलस्टॉय किंवा आता तिचे चरित्रात्मक पुस्तकच माझ्यासमोर आहे. मरीना स्व्त्सायेवा, अ‍ॅना आखाम्तोवा या रशियन कवयित्रींचे साहित्य आवडते. Mark strand हा कवी आवडतो. ‘मादाम बोवरी’ हेही माझे आवडते पुस्तक आहे. पॉल जॉन्सनचे बरेच इतिहास लेखनशैलीमुळे आवडते. आणि एरिक हॉब्जवामची इतिहासावरची पुस्तके आवडतात. असे सांगत गेले तर खूप मोठी यादी होईल.

शिवाय आवडत्या लेखांचाही मोठा संग्रह माझ्याकडे आहे. त्यात प्रामुख्याने न्यूयॉर्कर साप्ताहिकातले लेख आहेत. तसेच इतरत्र उदा. एनकाउंटर, अगदी आपल्याकडच्या विकलीपासून जुने TLS किंवा न्यूयॉर्क रिव्ह्यूचे अनेक अंक मी सांभाळून ठेवले होते. सहा-सात वर्षांचे इकॉनॉमिस्टचे अंक मी सांभाळून ठेवले होते. पण या अशा गोष्टी फार सांभाळून ठेवता येत नाहीत यातले बरेच मला रद्दीत द्यावे लागले.

लेखक : शशिकांत सावंत
संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *