वयोवद्धी व ज्ञानवृद्धी : नाबाद शंभर!

वयाची शंभरी पूर्ण करणे हे आपल्याकडेच काय जगभरात सर्वत्रच कौतुकाचा विषय आहे. विशेषत: ज्या घरातील माणूस अशी शंभरी पूर्ण करतो, तेव्हा त्याच्या किंवा स्त्री असेल तर तिच्या घरातील लोकांचेही कौतुक होत असते. पण यापेक्षा अधिक गोष्ट असेल तर? तसे पुण्यात नुकतेच घडले. ते असे की, वयाच्या शंभरीत पदार्पण केलेले संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांना साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला तो त्यांनी केलेल्या असामान्य संशोधनात्मक कामाबद्दल. वयाच्या शंभराव्या वर्षात असा राष्ट्रीय पातळीवरचा महत्त्वाचा सन्मान वाट्याला आला तर त्या व्यक्तीला आणि त्याच्या घरच्यांना अक्षरश: भरून पावल्याची भावना होत असेल! आपल्याकडे यास ‘दुग्धशर्करा योग’ असेही म्हणतात!

मला डॉ. मेहेंदळे यांना भेटण्याचा योग आला तो त्यांना हा राष्ट्रीय सन्मान जाहीर झाल्यानंतर. त्यांचे लष्करातील निवृत्त कर्नल असणारे चिरंजीव प्रदीप आणि सूनबाई सौ. रोहिणी यांनी मला पेढा देऊन त्यांच्या आनंदात सहभागी करून घेतले. स्वत: प्रदीप हे वयाच्या पंचाहत्तरीत आहेत. मी येण्यापूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांना शाल पगडी व मानपत्र देऊन त्यांच्या घरीच सन्मानित केले होते. तसेच यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले असल्यामुळे पुरस्कार मिळणे हे डॉ. मेहेंदळे यांना तसे नवीन नव्हते; पण साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर लपत नव्हता! आयुष्याच्या या टप्प्यावर मला हा खूप मोठा सन्मान मिळत असल्याने हा आनंदही मोठा आहे, असे ते म्हणालेही.

आयुष्यातली कृतार्थता वाटणे म्हणजे काय हे डॉ. मेहेंदळे यांच्याकडे पाहून मला स्पष्ट जाणवलं. वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध व्यक्ती म्हणून त्यांचा फोटो काढताना मला तेथील विद्वत्तेचे प्रतीक असणाऱ्या पुणेरी पगडीचा आधार घ्यावासा वाटला. ती पगडी घालून मी त्यांना फोटो काढून घेण्याचा आग्रह केला. त्यांनीही मग मनापासून हसत हसत आणि ती पगडी डोक्यावर परिधान करत मला फोटो काढू दिला. 1918 मध्ये जन्मलेले डॉ. मेहेंदळे मला हा फोटो काढताना सर्वात तरुण आणि सर्वात आनंदी असल्याचे जाणवले!

आपल्या उण्यापुऱ्या दहा दशकांच्या आयुष्यात त्यांनी शंभरहून अधिक अभ्यासपूर्ण लेख, इंग्रजी, संस्कृत आणि मराठीतील ग्रंथ, असंख्य भाषणं आणि संशोधनपर प्रबंध सादर केले. न थकता, न कंटाळता पण तितक्याच उत्साहाने व चिकाटीने त्यांनी जोवर शक्य होते तोवर चालू ठेवले. मराठी, हिंदी याबरोबर त्यांनी गुजराथी, इंग्रजी आणि जर्मन भाषाही त्यांनी शिकून घेतल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीत जाऊन तिथल्या संशोधकांना संस्कृत आणि प्राकृत भाषांमधील संशोधनात मोलाची मदत केली. गुजरातमधील बडोदे, मध्यप्रदेशातील इंदूर, कर्नाटक आणि अशी भ्रमंती करत ते अखेर 1950 च्या सुमारास पुण्यात स्थिरावले आणि पुणेकर झाले! डेक्कन कॉलेजात नोकरी तर निवृत्तीनंतर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात संशोधनाचे काम अखंड चालू ठेवले.

दीर्घायुष्याची परंपरा त्यांच्या घरात होती का नाही ते ठाऊक नाही. वडील बडोद्यात रेल्वे स्टेशन मास्तर होते. 1940 च्या दशकात त्यांनी मित्रांबरोबर शपथ घेतली व आंतरजातीय विवाह करण्याचे धाडस दाखवले. घरच्यांचा विरोध असताना कुसुम परळीकर या सीकेपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परिवारातील मुलीशी विवाह केला. तो यशस्वी करत कुसुमताईंबरोबर त्यांच्या 97 व्या वर्षापर्यंत संसारही केला. याचा अर्थ दीर्घायुषी पतीची साथ देणाऱ्या कुसुमताई स्वत: दीर्घायुषी ठरल्या आणि डॉ. मेहेंदळे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी त्यांच्या कामात साथही दिली. काही काळापूर्वी त्या निवर्तल्या.

तुम्हा दोघांच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय? असा प्रश्न मी जेव्हा त्यांना विचारला तेव्हा ते पुन्हा  मनापासून हसले. लहान असताना मी व्यायाम करत असे आणि कुस्तीच्या आखाड्यात जात असे. मी पुढं कधी कुस्ती खेळलो नाही, पण त्यामुळे माझे आरोग्य चांगले राहायला मदत झाली. माझ्या दीर्घायुष्याचे कारण कदाचित तेही असावे. लहानपणापासून जोपासलेली पोहोण्याची आवड वयाच्या नव्वदीपर्यंतही त्यांनी भागवली. डॉ. मेहेंदळे यांच्याप्रमाणेच कुसुमताईंनाही पोहणे अतिशय प्रिय होते. याचा अर्थ असा होतो की, नियमित आणि निरामय जीवनाची सूत्रे त्यांनी पाळली आणि हेच त्याचे खरे उत्तर आहे! शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा संपूर्ण विकास मेहेंदळे दांपत्याला लाभला, असेच दिसते. डॉ. मेहेंदळे आणि कुसुमताई या दोघांवर धनंजय मेहेंदळे यांनी एक माहितीपटही बनवला आहे. त्यामध्ये तरुणपणचे हे जोडपे कसे दिसत होते हेही पाहायला मिळते.

गेल्या वर्षी घरात पडल्यामुळे डॉ. मेहेंदळे यांच्या पार्श्‍वभागाचे हाड मोडले आणि या वयातही त्यांचे ऑपरेशन करण्यात आले. याचा एक परिणाम असा झाला की एरव्ही स्वत: हिंडू फिरू शकणारे डॉ. मेहेंदळे व्हीलचेअर आणि वॉकरच्या मदतीने घरातल्या घरात फिरू लागले. मुळात इतक्या वयात असे ऑपरेशन ही एक जोखीमच होती आणि त्यामुळे त्यांना किमान व्हिलचेअरवरून का होईना फिरता आले. असे असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडणारा आनंद कुठेही कमी झाला नाही! नवे वास्तवही त्यांनी तितक्याच आनंदाने स्वीकारले. हे सगळं पाहिल्यावर एका गोष्टीची प्रचीती येते, ती म्हणजे जगण्याकडे पहिल्यापासूनच सकारात्मक दृष्टीने पाहिले तर वयाच्या कोणत्याही टप्प्यात रक्तदाब, मधुमेह हे विकार चिकटत नाहीत. मनस्थिती कायम ताजी टवटवीत रहाते. पण त्यापेक्षा जीवनातील चैतन्याचा सळसळणारा अर्थ अशा माणसांना नेमका उमगतो, याची प्रचीती येते.

नाबाद शंभरी गाठलेले अन्य जण पुणेकर :

          – वयाची शंभरी गाठलेल्या सेंच्युरी क्लबवर मी यापूर्वी याच स्तंभातून लिहिले आहे. पण या अशा सर्वाधिक आयुष्य लाभलेल्या पुणेकरांचा जाहीर सत्कार माझ्या प्रथमच पाहण्यात आला. गेल्या 9 ऑगस्ट रोजी पुण्यातील डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने त्यांच्या मधुमित्र या मासिकाचा शतकमूर्ती विशेषांक प्रसिद्ध केला तेव्हा ज्या व्यक्तींनी जीवनाच्या 100 व्या वर्षाकडे आगेकूच केली आहे, किंवा 100 वर्षे पूर्ण केली आहेत अशा शतकमूर्तींचा सन्मान करण्याचे ठरवले. या निमित्ताने अशा  शतकमूर्तींच्या मुलाखती आणि दीर्घायुष्यावरील नाम वंतांचे लेख त्यांनी प्रसिद्ध केले. या कार्यक्रमासाठी वयाची 96 वर्षे पूर्ण केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. हा एक अपूर्व योगच होता. शिवाय तर निरामय जीवनावर भाष्य करण्यासाठी ज्येष्ठ पुणेकर असणारे डॉ. ह. वि. सरदेसाई यांना अध्यक्ष म्हणून बोलावले. अनेक अर्थांनी हा कार्यक्रम चिरस्मरणीय झाला. बाबासाहेबांसारख्या ज्येष्ठ पुणेकराच्या वयाच्या 100 वर्षे साजरे करणाऱ्यांना नक्कीच आनंद झाला असणार. हा सन्मान पाहणे हा अपूर्व योग होता.

– डायबेटिक असोसिएशनचे कार्यवाह असणारे डॉ. रमेश गोडबोले यांनी या कार्यक्रमात एक चांगला मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, वय आणि वृद्धत्व हे सारखेच असत नाही. कारण आपल्याकडील परंपरेत चांगदेव हा 1400 वर्षे जगला तर ज्ञानेश्वरांना विद्वत्ता वयाच्या 15 व्या वर्षीच प्राप्त झाली. याचा अर्थ विद्वत्ता ही वयावर अवलंबून नसते. तसेच वृद्धत्व वयावर अवलंबून नसून ते त्या व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असते. दीर्घायुष्यासाठी इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. शतायुषी होणे ही केवळ देवाची कृपा आहे असे म्हणून थांबता येत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीने केलेले शारीरिक कष्ट, स्वावलंबी व शिस्तीची सवय, घरातले निरोगी आणि आनंद वातावरण तितकेच आवश्यक असते.

– अशा व्यक्ती आपल्या जगण्याकडे काहीशा निर्लेपपणाने पाहू शकतात. घरात असून  वानप्रस्थाश्रमात असल्यासारख्या त्या अलिप्तपणे जगाकडे पाहातात. वयानुसार येणारा आग्रही तापटपणा या व्यक्तींमध्ये असतो पण नंतर ते शांतही होतात. थोडक्यात सांगायचे तर, अशा शतकमूर्ती व्यक्तींच्या सहवासात येणाऱ्यांनाही काही गोष्टी  समजून कराव्या लागतात. अशा व्यक्तींच्या गरजा आणि अपेक्षा काय आहेत हे नीट लक्षात घ्यावे लागते. अशी माणसे मला डॉ. मेहेंदळे यांच्या घरात दिसली. तो समजूतदारपणा आणि अशा ऋषीतुल्य माणसाची सेवा करण्यातला आनंदही तिथे स्पष्ट जाणवला.

– डायबेटिक असोसिएशनच्या कार्यक्रमात इंदूबाई नलावडे या 104 वयाच्या फुलं विकणाऱ्या कष्टकरी स्त्रीचाही सन्मान झाला. याच वयाच्या आयुर्वेदाचा अभ्यास करणारे लक्ष्मण गणेश दिनकर, हुजूरपागा शाळेतील प्राथमिक विभागाच्या निवृत्त मुख्याध्यापक असणाऱ्या वयाची 99 वर्षे पूर्ण करणाऱ्या लीला काटदरे, उषा रामचंद्र कुलकर्णी (98), औरंगाबादचे दिगंबर लक्ष्मण .. (98), श्री. सेवेकर (103), शालिनी चिरपूटकर (101), पांडुरंग क्षीरसागर (101), उषा रामचंद्र कुलकर्णी (98), त्र्यंबक विष्णू केळकर (104), इंदिराबाई ओगले (100), वाईचे शंकर अभ्यंकर (100) आणि  डॉ. लीला गोखले (100) इत्यादी. या सर्वात 98 ते 104 या वयोगटातील माणसे होती. विशेष म्हणजे या आघाडीवरही स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती!

– शतकमूर्तींचे सत्कार करण्यामागची भूमि का मांडताना डॉ. रमेश गोडबोले यांची भूमिका अशी आहे की, प्रत्येक शतायुषी किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी बोलणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. कारण अनेक आश्चर्यकारक गोष्टी त्यातून समजतात. तसेच मानवी जीवन म्हणजे नेमके काय आहे याचीही काही प्रमाणात कल्पना येते. संपर्कात आलेल्या सर्व शतायुषींच्या जीवनातील साम्यही मग जाणवू लागते! त्या सर्वांच्या 100 वर्षे जगलेल्या आयुष्याकडे पाहाताना सलाम करावासा वाटतो! कारण त्यांच्या उमेदीचा कालखंड हा ऐन पारतंत्र्यातला होता. अनेक घातक रूढी आणि परंपरा रुजलेला तो काळ होता. या साऱ्यांनाच टक्कर देत व झपाट्याने बदलत गेलेल्या परिस्थितीशी जुळवून घेत या सर्वच शतायुषी व्यक्तींनी धैऱ्याने आणि गंभीरपणे तोंड दिले आहे.

– त्यांच्या जगण्यातील साधर्म्य लक्षात घेता ते सारेच सतत काही ना काही उद्योग किंवा कामात स्वत:ला गुंतून ठेवतात. खाण्याच्या बाबतीतही त्यांचा जिभेवर ताबा आहे. सर्व खाद्यपदार्थांचा ते थोडा थोडा आस्वाद घेतात. स्वावलंबन, देवावर विश्वास पण अंधश्रद्धा नाही, समाधानी वृत्ती हे त्यांच्या दीर्घायुष्याकडे बघण्याच्या मानसिकतेचे एक मुख्य सूत्र सापडते. डॉ. गोडबोले यांच्या मते अशा दीर्घायुषी माणसांच्या आयुष्यातली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुटुंबियांचे त्यांना लाभलेले प्रेम!

– तुकाराम महाराजांच्या ‘ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान’ या श्लोकाचा खरा अर्थ जर लक्षात घ्यायचा झाला तर ते आयुष्यातल्या कोणत्याही चांगल्यात चांगल्या आणि वाईटात वाईट परिस्थितीला तितक्याच शांतपणाने आणि समाधानाने सामोरे जातात. आपल्या समोर जे आहे त्यात  समाधान मानणे या वृत्तीवर एरव्ही टीका होते. पण तीच अशा व्यक्तींचे खरे मानसिक सामर्थ्य असते. ‘ठेविले अनंते’ म्हणजे त्यांना कोणताही बदल नको असतो, आहे त्या परिस्थितीत समाधान मानून घेतात असा त्याचा अर्थ होत नाही. – शंभरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आणि पेशाने प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर असणाऱ्या लीला गोखले (रानडे) म्हणाल्या की, आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे आपल्या हाती असते. हे जगत असताना आपल्या जगण्याचा दुसऱ्यालाही उपयोग व्हायला हवा. प्रत्येकाच्या दीर्घायुष्याच्या काही टीप्स असतात. त्यानुसार मीही काही गोष्टी नियमाने करते. एरव्ही गायीचे दूध चांगले असे सांगितले जाते, पण मी मात्र म्हशीचे दूध प्यावे असेच सांगेल. अर्थात ते प्रत्येकाच्या प्रकृतीवर आवलंबून असते. प्रत्येकाची पचनशक्ती कशी आहे यावर अशा गोष्टी ठरतात.

– डॉ. रानडे यांनी पुण्यातला पहिला टेलिफोन, पहिली मोटार पाहिली आहे. त्यांच्या घरातही पहिल्यांदा वीज केव्हा आली हेही त्यांना आज आठवते! शिवाय वयाच्या नव्वदीपर्यंत त्या मोटार ड्रायव्हिंग करत असत. गंमत म्हणजे या वयातही त्यांना त्यांच्या मोटारीला कुणी ओव्हरटेक केलेले आवडत नसे! वयाची पन्नाशी ओलांडल्यावर त्यांनी रशियन भाषा शिकून घेतली. तसेच साहित्य प्राज्ञ ही मराठी भाषेची अवघड समजली जाणारी परीक्षाही दिली. नव्या पिढीला संदेश देताना त्या म्हणतात की, शिस्तबद्ध जीवन जगा, सत्य आणि अहिंसा या तत्त्वांना मुरड घालू नका. स्वावलंबी राहा आणि सतत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

– मधुमेहावर मात करत वयाची 101 वर्षे गाठलेले रघुनाथ रामकृष्ण लिमये म्हणतात की, बरीच वर्षे मधुमेहावरील औषधे घेत होतो. पण रक्तातील साखर नियंत्रणात असल्याने आता डॉक्टरांनीच माझ्या गोळ्या बंद केल्या आहेत. सहकारनगरमध्ये राहात असणारे लिमये वयाच्या 95 वर्षांपर्यंत तळजाई टेकडीवर सकाळी फिरायला जात असत. या वयातही त्यांना झोप चांगली लागते. तसेच रोजच्या दैनंदिन गोष्टीत ते इतरांची फारशी मदत घेत नाहीत. विशेष म्हणजे या वयातही त्यांची स्मरणशक्ती चांगल्या स्थितीत आहे. फर्ग्युसन कॉलेजात शिकताना प्रा. भालबा केळकर यांनी बसवलेल्या बेबंदशाही या नाटकातील संभाजी महाराजांच्या तोडची पल्लेदार वाक्येही ते खणखणीत आवाजात बिनचूक म्हणतात!

– नियमित मोजका आहार घेणाऱ्या 99 वर्षे वयाच्या लीला काटदरे म्हणतात की, दीर्घायुषाचे आपले काही खास रहस्य नाही. रोज नियमित मोजकाच आहार घेते. सकाळी पाच वाजता उठून तासभर व्यायाम करते. चहाऐवजी दोन्ही वेळा एक कप दूध घेते. घरात ज्वारीची भाकरी व कोणतीही भाजी किंवा पालेभाजी आवडीने खाते. जेवणात भात मात्र रोज नसतो. आजूनही कोणत्याही प्रकारचे परावलंबित्व आले नाही. ज्या सन्मानाने आजपर्यंतचे आयुष्य गेले त्याच सन्मानाने परमेश्वराने मृत्यूकडेही असेच सन्मानाने न्यावे! हुजूरपागेच्या माजी मुख्याध्यापक असणाऱ्या काटदरे बाई आजी रोज तीन चार तास वाचन करतात. आपली सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करत आहेत.

– उतारवयाकडे प्रसन्नपणे पाहाणाऱ्या शंभरीच्या इंदिराबाई ओगले यांना खेळाची आवड आहे. तरुण असताना त्या बॅटमिंटन खेळत. मधूनच स्वयंपाकघरात डोकावून आपल्या आवडीचा एखादा पदार्थ करतात! नवनवीन पदार्थही ते आपल्या सुनांना शिकवतात. त्यांना जेवताना ताटात चटणी, कोशिंबीर, फळभाजी, पालेभाजी आणि आमटी असे सर्व पदार्थ असले तर समाधान मिळतं. शिवाय सकाळ संध्याकाळच्या जेवणातही पदार्थांचे वैविध्य असले तर ते अधिक आवडते. विवाहानंतरही त्यांनी महिला मंडळांच्या पाककृती स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे  मिळवली आहेत. तसेच पुढे रुचिरा या नावाचे पुस्तकही काढले!

– वयाची 99 वर्षे पूर्ण करणाऱ्या कावेरी भास्कर वायचळ आजी या वयात नातवंडांच्या मागे स्कूटरवर बसून फिरतात! रास्ता पेठेत राहाणाऱ्या वायचळ आसपासच्या लोकांशी संवाद गप्पा यात रमून गेल्या आहेत. वयाची नव्वदी पूर्ण होईपर्यंत त्यांनी कधी पंढरपूरची वारी चुकवली नाही. पूर्वी घराच्या गरिबीमुळे एकदा त्यांना बारामती ते पुणे हा प्रवास पायी करावा लागला होता. संत एकनाथांची भारूडं त्यांना खूप आवडतात आणि ती ते मोठ्या ठसक्यात सादरही करतात. या वयातही त्यांचे पाठांतर बरेच असून पांडुरंगाला पत्र या नावाचे एक गमतीदार गाणे म्हणून त्या इतरांकडून दादही घेतात! जुन्या पिढीचे

प्रतिनिधित्व करणाऱ्या वायचळ आजी यांचा वयाच्या नवव्या वर्षी विवाह झाला. त्यांना एकंदर पाच मुले आणि चार मुली अशी नऊ बाळंतपणे झाली! त्या म्हणतात की त्यांच्या आईला एकंदर 12 मुले झाली होती. आज हे ऐकायला अचाट व अशक्य वाटते. पण पूर्वीच्या पिढीची ती एक जीवनशैली होती.

– या साऱ्यात विशेष लक्षात राहिल्या त्या म्हणजे इंदूबाई नलावडे या 104 वर्षांच्या फुलांची विक्री करणाऱ्या आजी. पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीच्या प्रवेशद्वारापाशी त्या गेली सत्तर वर्षे फुले विकत आहेत! या वयातही त्या रोज अप्पर इंदिरानगर येथून पीएम्‌पी बसने शनिवारवाड्यापाशी उतरतात व तेथून पायी गणपतीच्या मंदिरापाशी येऊन आपला व्यवसाय करतात! विकलेल्या हार, फुले आणि नारळाचे पैसे गोळा करून संध्याकाळी त्या परत बसने घरी जातात. त्यांना लिहिता वाचता येत नसले तरी तोंडी हिशेब कळतो. विशेष म्हणजे त्यांना अजूनही चष्म्याशिवाय चांगले दिसते! यंत्राशिवाय ऐकू येते तसेच बोलणेही अतिशय स्पष्ट आहे.

– डॉ. गोडबोले यांच्या मधुमित्र या शतकमूर्ती विशेषांकात शताब्दी पूर्ण केलेल्यांमध्ये एका लक्षणीय जोडप्याचे कौतुक केले आहे. हे दोघेही पती पत्नी शतायुषी असून जनार्दन हरिभाऊ कल्हापुरे 112 वर्षांचे तर त्यांच्या पत्नी रूख्मिणी 102 वर्षांच्या आहेत. कल्हापुरे कुटुंब हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असणाऱ्या खडांबे खुर्द या गावचे आहेत. संपूर्ण शाकाहारी व दिवसभर कष्ट करणारे हे जोडपे असल्याने आजपर्यंत त्यांचे आरोग्य निरोगी राहिले. जनार्दन कल्हापुरे यांनी महात्मा गांधींची भाषणे ऐकली असून त्याचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. प्रवृत्तीने कल्हापुरे हे आध्यात्मिक असल्यामुळे समोर आलेल्या आयुष्यावर समाधान मानण्याची प्रवृत्ती हे त्यांच्या दीर्घायुष्याचे मर्म आहे. पती पत्नी हे दोघेही दीर्घायुषी आणि वयाची शंभरी ओलांडलेले आजच्या काळात दिसणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.

वयाची शंभरी पूर्ण करणे याला आपल्या संस्कृतीत महत्त्व आहे. आपल्याकडील वेदांपैकी युजर्वेदात जीवेत शरद: शतम् असा आशिर्वाद आधीची पिढी पुढच्या पिढीला देण्याचा संकेत आहे. आयुष्याची लांबी तीन आकड्यांची होणे यात जी रोमहर्षकता आहे त्याला तोड नाही! याचे मुख्य कारण आपल्या रोजच्या जगण्यात अशी माणसे फारशी भेटत नाहीत किंवा असली तरी ती माहीत नसतात. एक व्यक्ती म्हणजे गेल्या दहा ते वीस पिढ्यांचा चालता बोलता दस्तावेज असतो! गेल्या 100 वर्षांच्या इतिहासाचा ते एक जिवंत तुकडाच असतात!

वयाच्या शंभरीतली किंवा शंभरीकडे वाटचाल करणारी माणसं या वयात काय विचार करत असतील. किंवा त्यांची मानसिकता नेमकी कशी असते, असा प्रश्न मला नेहमीच पडतो. बाबासाहेब पुरंदऱ्यांनी याचे उत्तर त्यांच्या भाषणातून काही प्रमाणात दिले. ते म्हणाले की, माझा 1922 चा जन्म आणि आमच्या घरात शतकी परंपरा आहे! माझ्या अकराव्या वर्षी माझी आत्या 113 वर्षांची असलेले मी पाहिले होते. घरात कुणी लवकर गेले तर क्यू मोडून गेले असा गमतीदार शब्दप्रयोग केला जात असे! शिक्षणमहर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे वयाच्या 104 वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगू शकले. त्यांचा मुलगा रघुनाथ गेल्यावर मात्र ते म्हणाले की, त्याचं वय झालं होतं. वयाच्या 100 व्या वर्षात कर्वे यांनी हे म्हणावं हे विशेष म्हणावं लागेल.

कृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्या चरित्रातील एक महत्त्वाचे साम्यस्थळ सांगताना बाबासाहेब म्हणाले की, या दोघांच्या चेहऱ्यावरील स्मित कधीही ढळले नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात स्माईल ही सर्वात मोठी गुंतवणूक असायला हवी! स्वत:बद्दल बोलताना बाबासाहेब म्हणाले की, जगण्याचं प्रयोजन मला वयाच्या 16 व्या वर्षी सापडलं. त्यावेळीही माझ्या मनात असा विचार आला की सबंध मराठेशाही पाहणारा दीर्घायुषी आपल्याला कोणी सापडतो का? मुरारराव घोरपडे हे त्यातल्या त्यात जवळ असणारे नाव सापडले ते 1809 मध्ये गेले. त्यांनी बहुतेक सारी पेशवाई पाहिली असणार. तशी ऊर्मी असायला हवी.

आपल्या मनाची शांतता टिकवण्यासाठी व सातत्याने जपण्यासाठी मला शिवचरित्र कायमच  मदतीला आले आहे. छत्रपती हे स्वत: सहनशीलतेचे मूर्तीमंत प्रतीक आहेत. आपल्या आवडी-निवडी बाबत बोलताना बाबासाहेब म्हणाले की, मला आवडणारे पदार्थ समोर आले तरी आपण त्यातले किती खायचे हे ठरवायला हवे. पिढलं आणि बाजरीची भाकरी मला सर्वात जास्त आवडते!

शतायुषी होण्यामागचे निसर्गचक्र पाहाता जीवेत शरद: शतम् ही शतायुषी होण्याची प्रार्थना आहे, असे डॉ. ह. वि. सरदेसाई यांचे मत आहे. ते म्हणाले की 100 वर्षे कशी जगावीत, तर ती पाहून, बोलून आणि ऐकून! कोणावर आवलंबून न राहाता स्वशक्तीने जिवंत राहून. आयुष्याची लांबी, रुंदी या या स्वअस्तित्वाच्या सीमा असून त्याची खोली समाजासाठी काय करतो ही आहे! आपली आवड हा आपला अहं किंवा इगो असतो. त्याला किती जपायचे हे महत्त्वाचे आहे.

या निमित्त माणसाचे शरीराचे वय आणि प्रज्ञा याचा किती संबंध आहे याची काही प्रमाणात का होईना कल्पना यायला आपल्याला मदत होईल.

लेखक : विवेक सबनीस

संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *