खळांची व्यंकटी सांडो!

सध्याचा काळ म्हणजे ‘फास्टफूड’चा जमाना झालाय. जे खाण्यात, जगण्यात तेच जीवनव्यवहारात. ‘इथं विचार करायला कुणाला वेळ आहे?’ हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. वेगवेगळ्या संदर्भात. जिथं स्वत:चाही विचार करायला पुरेसा वेळ नाही इतकी धावपळ असेल किंवा जिथं फक्त स्वत:चाच विचार करण्याची वृत्ती असेल, तिथं आपल्या भोवतीच्या समाजाचा, प्रदेशाचा आणि देशहिताचा विचार वगैरे केवळ कल्पनाच! या कल्पना करण्याची (तरी), त्या मांडण्याची आणि साऱ्या समाजापर्यंत अशा विधायक कल्पना पोचवण्याची साधनं म्हणजे प्रसारमाध्यमं आणि साहित्यक्षेत्र! ही दोन्ही क्षेत्रं समाजाला विचार देणारी प्रभावी साधनं असतात. समाजहिताच्या मुद्द्यांवर चर्चा, वाद, संवाद घडवून आणून व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपात आपल्या समाजाला पुढं नेण्यासाठी ही दोन्ही क्षेत्रं फार महत्त्वाची म्हणावी लागतील. दुर्दैवानं जगण्यातील सर्वच बर्‍यावाईटाचा संसर्ग अगदी नैसर्गिकपणे या दोन्ही क्षेत्रांना  झाल्यामुळं आज पत्रकारांची किंवा साहित्यिकांची समाजात काय प्रतिमा आहे याचं आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करायला नको का?

आपल्या देशाचा स्वातंत्र्यलढा अभ्यासताना असं लक्षात येईल की, आपले बहुतांशी राष्ट्रीय नेते हे एकतर शिक्षक  प्राध्यापक होते, निष्णात वकील तरी होते किंवा संपादक तरी होते. मराठी पत्रकारितेचा पाया घालणारे ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर हे मूलत: प्रकांड पंडित, बहुभाषांचे जाणकार, प्राध्यापक आणि संपादकसुद्धा ! दादाभाई नौरोजी आणि गणितज्ज्ञ केरो लक्ष्मण छत्रे यांच्यासारखी नामवंत मंडळी जांभेकरांचे विद्यार्थी होते, एवढ्यावरूनही जांभेकरांच्या मोठेपणाची थोडी तरी कल्पना यावी. ‘भारतात इंग्रजांचं राज्य का आलं आणि ते कसं विस्तारलं याची अभ्यासपूर्ण चिकित्सा करणारा महाराष्ट्रातील पहिला पुरुष’ अशा शब्दांत आचार्य अत्रे बाळशास्त्रींचं वर्णन करीत. मराठी पत्रकारितेला आणि साहित्यक्षेत्राला सुद्धा अशा अनेक दिग्गजांचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे.

पुढच्या काळात राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांनी आणि विचारवंतांनी आपल्या वाणीतून, लेखणीतून आणि प्रत्यक्ष जगण्यातून सुद्धा पत्रकारितेला, साहित्यक्षेत्राला आणि स्वातंत्र्यलढ्याला फार मोठी वैचारिक दिशा दिली. ‘प्रबोधन’कार ठाकरे, आचार्य प्र. के. अत्रे, कवीश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर, बाळासाहेब ठाकरे, किर्लोस्कर या  नामवंतांनी ही परंपरा वेगळ्या अर्थाने पुढे नेली. पुढील काळात विविध वृत्तपत्रांच्या संपादकांनी आपापल्या कुवतीनुसार आणि मगदुराप्रमाणे ही परंपरा आणखी पुढे नेली. पत्रकारितेसह साहित्य क्षेत्रामध्ये पुढील काळात आपले बहुमोल योगदान देणाऱ्यांमध्ये पां. वा. गाडगीळ, ह. रा. महाजनी, प्रभाकर पाध्ये, निळुभाऊ खाडीलकर, माधव गडकरी, गोविंद तळवलकर, डॉ. अरुण टिकेकर, कुमार केतकर, विजय कुवळेकर, उत्तम कांबळे, गिरीश कुबेर यांच्यासह अनेकांनी बदलत्या काळात ही परंपरा आपापल्या पद्धतीनं समृद्ध केली. या यादीमध्ये आणखीही काही नावं नक्कीच समाविष्ट करता येतील. पण जागेअभावी सर्वांचाच उल्लेख अशक्य आहे.

मात्र दुर्दैवाने गेल्या 20-25 वर्षांमध्ये पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रातच काय, पण राजकारणासह जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये सवंगपणा आणि उठवळपणालाच प्रतिष्ठा प्राप्त होऊ लागली. ‘तुमच्याकडे विकण्याची कला असली म्हणजे काहीही विकता येऊ शकते’ हाच बहुतांशी मंडळींच्या जीवनाचा मंत्र बनू लागला. एका प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या वरिष्ठ संपादकांच्या बैठकीत मालकच म्हणू लागला, ‘वृत्तपत्रं ही जाहिरातींसाठी असतात. बातम्या देऊन आपण त्यात मूल्यवृद्धी करतो.’ पत्रकारितेच्या क्षेत्रापेक्षा साहित्याच्या काय अन् शिक्षणाच्या क्षेत्रात यापेक्षा फारसं वेगळं चिंतन सध्या दिसून येत नाही.

पत्रकार संपादकांच्या लेखणीचं पावित्र्य मालक असलेल्या आणि स्वार्थासाठी सोयीनुसार अंगावर संपादकीय वस्त्रं चढवणाऱ्या राजकारणी आणि धनदांडग्यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल तर ते कसे टिकून राहणार? मग अनेकांची शक्ती एखादा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आयुष्यभराची तपश्चर्या पाठीशी असणाऱ्या दिग्गजांची यथेच्छ बदनामी करण्यातच खर्ची पडते किंवा गेला बाजार साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असावा याच्या प्रोजेक्शनपासून ते वरच्या स्तरावरच्या राजकारण्यांशी सलगी दाखवणारे आपले फोटो काढून ते पसरवण्याच्या कामातच पणाला लागत असते.

समाजजीवनातील अनेक घटकांना आज दुर्दैवाने लागलेल्या परस्परद्वेषाच्या आणि जातीपातीच्या रोगाचा संसर्ग प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रालादेखील मोठ्या  प्रमाणात लागल्याचे वेदनादायक वास्तव पहायला  मिळते. इथे अभिव्यक्तीचा आणि संपादकीय स्वातंत्र्याचा मुद्दा गृहित धरूनदेखील अनेक जण आपल्या ‘सेटलमेंट’ करण्याच्या कुवतीनुसार आपण समाजातील अनेकांची ‘इमेज’ घडवतो किंवा बिघडवतो अशाच (गैर) समजात वावरताना पहायला मिळतात. कोणताही विधीनिषेध मानायचा नाही, असंच जणू ठरवून या क्षेत्रात घुसलेली मंडळी कोणती  जीवनमूल्यं स्वत:च्या पत्रकारितेमधून किंवा साहित्यातून मांडतील? प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात हे वातावरण! साहित्याच्या क्षेत्रात यापेक्षा आणखी वेगळं काय शोधायला जावं? ज्ञानपीठासारखा साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणार्‍या आपल्या पूर्वसुरींवर अत्यंत अश्लाघ्य शब्दांत टीका करणारा साहित्यिक पुढे तो पुरस्कार तर पटकावतोच, पण ज्यांना शिव्या घातल्या त्यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कारही बिनदिक्कतपणे खिशात घालतो या प्रवृत्तीला काय म्हणायचे? अनेकांची पुस्तकं वाचून किंवा त्यातलाच मजकूर इकडेतिकडे करून आणि त्याहीपेक्षा राजकारण्यांसह अनेक संस्थाचालकांची भाषणं लिहून देऊन, मानपत्रात शब्द मावणार नाहीत एवढी त्यांची स्तुती करून ज्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेले असते अशी मंडळी बाजारपेठेचा अंदाज घेण्यात पक्की  मुरलेली असतात. दोन-पाच पुस्तकांची परीक्षणं मनाशी ठरवल्याप्रमाणे छापून आली की मग विविध संस्थांचे पुरस्कार पदरात पाडून घेण्याचं कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. या कामात पत्रकार आणि साहित्यक्षेत्रातली काही मंडळी परस्परसहयोगाचे अनेक अलिखित करार करत असतात. अशी कौशल्यं प्राप्त करणाऱ्यांच्या स्वप्नात- मग साहित्य संमेलनांचं- निदान ग्रामीण, प्रादेशिक अशा, संमेलनाचं अध्यक्षपद येऊ लागतं, त्यासाठी प्रसंगी अशी मंडळी संयोजकांना प्रायोजकही मिळवून देतात, मग काही प्रायोजित माध्यमं ते आवर्जून छापतात देखील. काही वेळा तर पत्रकारितेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वतंत्रपणे आणि सामूहिकपणे केलं जाणारं राजकारण पाहून खरे राजकीय पुढारीदेखील लाजतील, अशी सद्यस्थिती बऱ्याच ठिकाणी दिसते.

गेल्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याची एका वृत्तपत्रातील मुलाखत वाचनात आली. ‘उद्या पैसे मिळाले, तर स्वागताध्यक्षांचीही बोली लागेल आणि दाऊद इब्राहिम देखील स्वागताध्यक्ष होऊ शकेल’ असे या पदाधिकाऱ्याने म्हटले होते. पंच्याहत्तरपेक्षा अधिक वर्षे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जी मातृसंस्था आयोजित करते त्याच साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याची ही हतबलता असेल तर मराठी साहित्याच्या क्षेत्रातदेखील सध्या काय चालले आहे त्याचा अंदाज येऊ शकेल. परस्परांचे ‘पानिपत’ करण्यामध्येच या क्षेत्रातील अनेकांची ऊर्जा खर्च होताना दिसते. परिणामी दोन्ही क्षेत्रांमध्ये आपलं काही गुणवत्तापूर्ण योगदान असावं, आपल्याला स्वत:ला आपल्या कामाचा निर्भेळ आनंद मिळावा ही उर्मीच अनेकांमधून हरवलेली पहायला मिळते.

पूर्वी अनेकविध क्षेत्रांमध्ये शहाण्या लोकांचं बहुमत असायचं. (एकमत नव्हे- ते भिन्न असू शकते, आणि त्याचा आपण आदरही करायला हवा.) पण हल्ली बहुमतानंच शहाणा कोण हे ठरत असल्याने प्रसारमाध्यमं काय किंवा साहित्याचं क्षेत्र आपापलं सत्त्व आणि स्वत्व हरवताना दिसत आहे. अस्सल गुणवत्तेकडे सदैव दुर्लक्षच करायचं आणि बाजारबुणग्यांनाच प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी परस्परस्वार्थाच्या हिशेबामध्येच आपली प्रतिभा खर्च करत रहायचं, हाच जर अशा अनेकांच्या सुखी जीवनाचा मंत्र बनलेला असेल, तर आपण साऱ्याच भारतीयांनी पुस्तकातली प्रतिज्ञा केवळ वाचून सोडून न देता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आपापला कार्यक्रम राबवायला हवा.

लेखक : डॉ. सागर देशपांडे 

संपर्क : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *