स्वातंत्र्याची सत्तरी

नुकताच साऱ्या देशभरात स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापनदिन साजरा झाला. म्हणजेच आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची सत्तर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने मागे वळून पाहिले तर भौतिक प्रगतीच्या बाबतीत अपेक्षेइतकी नसली तरी आपण बरीच प्रगती केली असल्याचे जाणवते. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीची सवय झाल्यानंतर पारतंत्र्यालाच स्वातंत्र्य मानावे लागल्याची सवय अनेक पिढ्यांना लागून राहिली. त्यातल्याच काहींनी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. पुढाकार घेतला. अनेकांना त्यात यश आले. अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. अनेकांच्या संसारांची राखरांगोळी झाली. बऱ्याच जणांनी प्रचंड त्याग केला. आपण या सर्वांविषयी नेहमीच कृतज्ञ असायला हवे.

या सगळ्यांच्याच, अनेक  विचारधारांमधल्या लोकांच्या प्रयत्नांमुळे, त्यांच्या सामूहिक कृतिशूरतेमुळे आपण आज स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. तरीही एक जाणवते की, अशा त्यागाने भारलेल्या पिढीला 15 ऑगस्ट 1947 रोजी आपण कृतकृत्य झाल्याचे जसे समाधान जाणवले असेल, त्याचवेळी असेही वाटले असेल की, या स्वातंत्र्याचे मोल साऱ्या देशवासीयांना समजेल. पुढच्या पिढ्यांनाही ते लक्षात ठेवावे वाटेल. आपला त्याग, आपले हौतात्म्य, आपल्या वैयक्तिक स्वप्नांची दुर्दशा हे सारे सारे आपण आपल्या मातृभूमीच्या  मुक्ततेसाठी कामी आणले. एक तर स्वयंप्रेरणेने किंवा आपल्या त्यागी आणि दूरदर्शी नेतृत्वाने दिलेल्या प्रेरणांमुळे! स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षांच्या वाटचालीनंतर त्या जुन्या पिढीने हाती लागलेल्या ताळेबंदाकडे कोणत्या नजरेने पहावे? की ‘कालाय तस्मै नमः’ म्हणून उसासे टाकत शांत बसावे. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पिढीकडेच स्वातंत्र्योत्तर भारताच्या राजकारणाचे आणि सत्ताकारणाचे नेतृत्व आले. त्या वेळच्या नेतृत्वाला त्या काळी जे योग्य वाटले (कदाचित सोयीचेही वाटले) त्याप्रमाणे आपल्या देशाच्या किंवा स्वराज्याच्या कारभाराची ध्येय-धोरणे ठरवली गेली. त्याविषयी आजही चिकित्सा करण्यास हरकत नाही. आजवर्तमान काळात, आपण याच इतिहासाच्या खांद्यावर बसलो आहोत याची जाणीव ठेवून लांबवरच्या भविष्याकडे नजर टाकली पाहिजे, ती दृष्टी जोपासायला पाहिजे असे वाटते. मात्र जिथे तिथे दृष्टिदोषाचेच रुग्ण समाजाच्या विविध क्षेत्रात वाढताना सध्या दिसत आहेत.

म्हणजे आम्हाला विज्ञान-तंत्रज्ञान आणि त्यामुळे प्राप्त होणाऱ्या भौतिक साधन-सुविधा हव्यात. पण आम्ही विज्ञानदृष्टी जोपासताना कमी पडतो.

आम्हाला एक तर इतिहासच नको किंवा तो आमच्या त्या त्या वेळच्या (बदलत राहणाऱ्या) भूमिकांना सोयीचा ठरेल एवढाच पुरे, पण त्याचा राष्ट्रीय भावनेतून कठोर, परखडपणे, सखोल केलेला अभ्यास नको असतो.

वर्तमानातील प्रखर वास्तवाची धग आम्हाला जाणवते. पण त्याच्या मुळाशी जाऊन, त्या सम स्येला विचारपूर्वक उत्तर शोधण्याऐवजी आम्ही जमावातूनच उत्तरे शोधण्याचा असफल प्रयत्न वारंवार करत राहतो.

आम्ही आमच्या देशाच्या राज्यघटनेचे गोडवे गातो. पण ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? मुळात आमच्या शिक्षणात राज्यघटनेच्या माहितीचा कितीसा अंतर्भाव असतो? या देशाचा कारभार ज्या राज्यघटनेनुसार चालतो, इतकेच काय, पण ज्या शाळा-महाविद्यालयांमधून आम्ही राज्यघटनेचे तपशील सांगतो, त्यातली कलमे, अधिकार-कर्तव्ये यांची माहिती विद्यार्थ्यांना देतो आणि ज्या सरकारी, निमसरकारी  कार्यालयांमधून घटनेनुसार कारभार चालतो असे आपण म्हणतो – असे समजतो, यापैकी किती ठिकाणी आपल्याला राज्यघटनेची प्रत पहायला मिळते? या देशात जन्म होणे भाग्याचे असे कधी कधी म्हणत आपले आयुष्य संपून जाते, तरीही आजन्म राज्यघटना कशी असते? हे पाहण्याची अजिबात तसदी न घेणारेच पदवीधारक जेव्हा स्वतःला सुशिक्षित समजू लागतात आणि त्यांच्या प्रमाणपत्रांकडे पाहून समाजही त्यांना सुशिक्षित, उच्चशिक्षित समजायला लागतो तेव्हा आपला देश, आपल्या देशाची राज्यघटना, या देशात राहणारे आणि प्रतिज्ञेपुरते का असेना आपण ज्यांना बांधव म्हणतो ती सर्व माणसे, इथला निसर्ग, इथल्या भाषा, इथली संस्कृती, इथल्या विधायक परंपरा यांपैकी कशाचेही आपल्याला फारसे सोयरसुतक राहात नाही, असे दिसते.

महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन आणि स्वयंसेवी संस्थांमधून देशपातळीवरचे कधी कधी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे परिसंवाद, चर्चा, सभा, व्याख्याने होलसेल प्रमाणात होताना दिसतात. विशेषतः दरवर्षी जानेवारी ते मार्च या दरम्यान अनुदान निधी संपवण्यासाठी तर असे कार्यक्रम अधिकच, पण त्यामध्ये आपला देश आणि या देशवासियांची जाणीव कितीशी दिसते? ती जर आमच्या शिक्षणात आणि वागण्या, बोलण्यात, जगण्यातच नसेल तर नोटाबंदीच्या सरकारी निर्णयानंतरही बनावट नोटांच्या छपाईचे कारखाने चालवणारे देशद्रोही तयार होणारच की!

आमच्या लष्करातील जवान, तिथले अधिकारी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशात राहणाऱ्या आपल्या बांधवांच्या रक्षणासाठी  सीमेवर सज्ज असतात. वेळोवेळी शत्रूवर हल्ला करताना किंवा तो परतवताना शहीद होतात, हौतात्म्य पत्करतात. आम्ही त्याबाबतही राजकारण करायचे सोडत नाही. एक समाज म्हणून, देशबांधव म्हणून आपण या हुतात्म्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी किती आणि कसे उभे राहतो? याचा विचार करायला हवा. उलट अशा हुतात्म्यांच्या घरी जाऊन, त्यांच्या कुटुंबियांसमवेत फोटो काढून घेऊन फ्लेक्सबाजी करणारे, स्वतःला देशभक्त म्हणून मिरवणारे आणि अशा फोटो-बातम्यांच्या फायली तयार करून कोणत्याही पक्षाकडे तिकिटे मागायला जाणारे पाहिले की, आपला देश स्वतंत्र होऊनही विचारी होण्यासाठी बरेच प्रयत्न पुढची अनेक वर्षे करत राहण्याची गरज पटते. इंग्रजांनी आम्हाला मानसिक गुलामगिरीमध्ये इतके त्यावेळी जखडून ठेवले होते (म्हणजे दोष आपलाच होता) की ते आपल्या देशातून हद्दपार झाले तरी आमच्या डोक्यातील आणि मनातील इंग्रजाळलेली प्रवृत्ती काही लोप पावत नाही. तारखेनुसार कॅलेंडरच्या पानांवर संपणाऱ्या वर्षाच्या अखेरच्या म्हणजे 31 तारखेला आमचे अनेक नागरिक आणि नवीन पिढीतील तरुण/ तरुणी हातात दारुचे ग्लास घेऊन तथाकथित आनंदोत्सव, जल्लोष साजरा करत असतात – घरात, हॉटेलात, मैदानांवर, डोंगरांवर, समुद्रकिनारी, नदीकिनाऱ्यांवर उगीचच नाचावे, धिंगाणा घालावा असे त्यांना वाटत असते, कोणताच विजय झालेला नसताना फटाके वाजवावे असे वाटत असेल, रात्री अपरात्री गडकिल्ल्यांवर जाऊन कोणत्या तरी नशेत रहावे असेही वाटत असेल तर  त्यामुळे नव्या वर्षातील पहिल्या तारखेच्या पहाटे ‘सनबर्न’ झाला तरी तो सूर्य त्यांच्या नजरेला लवकर दिसतच नाही हे कोण लक्षात घेणार? ती पेंगुळलेली रात्र नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीही झिंग आणून ठेवते. नवे वर्ष सुरू झाल्याचा पत्ताच लागत नाही अशांना.

म्हणूनच खाण्यापिण्यापासून ते जगण्यापर्यंत जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आम्ही आमचे देशीपण, आमचे राष्ट्रीयत्व पुन्हा मिळवण्याचा आता प्रयत्न करायला हवा – तो देखील वैश्विक जाणीवेतूनच! साने  गुरुजींप्रमाणे बलसागर भारत होवो – विश्वात शोभूनी राहो असे म्हणत असतानाच

ज्ञानेश्वरांप्रमाणे – आता विश्वात्मके देवे

तुकारामांप्रमाणे – तुका आकाशाएवढा आणि

विनोबांप्रमाणे – जय जगत

असे म्हणणेही आपण विसरता कामा नये.

हे विसरू नये आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाकडे होणारी आपल्या देशाची वाटचाल अधिक नवनिर्मितीक्षम व्हायची असेल, अधिक सृजनशील व्हायची असेल तर ‘गदिमां’च्या शब्दांतील हे ‘नवनिर्माण’ आपण साऱ्यांनीच आत्म सात करायला हवं.

… नव निर्माण

चेतलेल्या मशाली

विझू देऊ नका,

उरातला उत्साह

थिजू देऊ नका.

अजून मार्ग चालायचा आहे

इष्ट काल यायचा आहे,

अंधार गेला नाही

ज्योतीखाली दडला आहे.

अरे,

तुमच्या राष्ट्रावर

तुमच्या स्वकीयांचाच

दरोडा पडला आहे

सावध, भाई सावध

पारध अवघड आहे

श्रीकृष्णाच्या तटस्थेने

एक द्वारका बुडवायची आहे,

नवी नगरी घडवायची आहे.

ती नगरी नीतीची असेल

भीतीचे सावट असणार नाही,

भणंग वा भुकेजलेला

उदाहरणापुरताही उरणार नाही.

जातीगोतींच्या भिंतीचे दगड

वास्तूच्या पायात गाडले जातील,

मानवतेच्या वसाहती

जागोजाग उघडल्या जातील.

हुंडा घेणारा बाप, पोरगा विकेल,

नवऱ्याच्या तोंडावर पतिव्रताच थुंकेल.

शिक्षण कारकुनी प्रसवणार नाही,

चाकरी कोणी करणार नाही,

पदवी हे ज्ञानाचे परिमाण उरणार नाही.

कलावंत अकिंचन असणार नाही

सर्वांच्याच माथ्यावर सावली राहील

आंधळाही डोळसाची दुनिया पाहील.

राबता हात पसरला जाणार नाही,

सत्याग्रहाची ससेहोलपट होणार नाही,

अहिंसेला आव्हान कुणी देणार नाही.

शासनसंस्था सेवेची भूमिका घेईल,

तिरंगा ध्वज सूर्यासारखा प्रकाशित राहील;

म्हणून म्हणतो,

चेतलेल्या मशाली विझू देऊ नका,

उरातला उत्साह थिजू देऊ नका

– ग. दि. माडगूळकर

(‘…पूरिया’ मधून साभार)

 

जातीगोतींच्या भिंतीचे दगड वास्तूच्या पायात गाडले जातील, मानवतेच्या वसाहती जागोजाग उघडल्या जातील. हुंडा घेणारा बाप, पोरगा विकेल, नवऱ्याच्या तोंडावर पतिव्रताच थुंकेल. शिक्षण कारकुनी प्रसवणार नाही, चाकरी कोणी करणार नाही, पदवी हे ज्ञानाचे परिमाण उरणार नाही. कलावंत अकिंचन असणार नाही सर्वांच्याच माथ्यावर सावली राहील, आंधळाही डोळसाची दुनिया पाहील. राबता हात पसरला जाणार नाही, सत्याग्रहाची ससेहोलपट होणार नाही, अहिंसेला आव्हान कुणी देणार नाही. शासनसंस्था सेवेची भूमिका घेईल, तिरंगा ध्वज सूर्यासारखा प्रकाशित राहील; म्हणून म्हणतो, चेतलेल्या मशाली विझू देऊ नका, उरातला उत्साह थिजू देऊ नका.

– ग. दि. माडगूळकर


लेखक : डॉ. सागर देशपांडे
ईमेल : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *