सुवर्णयुगाच्या स्वप्नांसाठी

एक राष्ट्र म्हणून आपल्याला अजून खूप लांबची वाट चालायची आहे. मानवी समाजाचे काही मूलभूत प्रश्नसुद्धा अजून आपल्याला छळतायत. ज्यामध्ये भ्रष्टाचार, जातीयता, विषमता, दारिद्र्य, बेरोजगारी या सगळ्यांसहित काही प्रमाणात राष्ट्रीयत्वाच्या वृत्तीचा अभाव हे सगळंच आज दिसून येतं. तरीसुद्धा स्वातंत्र्याची ७० वर्षं पूर्ण करणारा भारत हा एक तरुण, उत्साही, भविष्यकाळाकडे एका विश्वासानं आणि खात्रीनं पाहणारा असा आशावादी देश आहे. मी म्हणेन की ७० वर्षांच्या वाटचालीचं मला कळलेलं हे सारांश रूप. भारत भविष्याकडं अत्यंत आशेनं पाहणारं राष्ट्र आहे.
तशी ७० वर्षं एखाद्या राष्ट्राच्या, समूहाच्या आयुष्यातला फार दीर्घ काळ नाही. ७० वर्षं म्हणजे कदाचित तीन किंवा चौथी नवी पिढी चालू होतेय. विशेषतः भारतासारखं राष्ट्र की ज्याला अखंड हजारो वर्षांचा इतिहास आहे. सर्व आक्रमणं, सर्व अपयशं, पतनांचे सर्व कालखंड हे सगळं पार करत हजारो वर्षं या देशानं एकाच वेळी आपली मूळ संस्कृती जतन करत तरी काळानुसार ती बदलत आपला आत्मा टिकवला आहे, असं आपलं राष्ट्र. त्याला ७० वर्षं हा काही फार दीर्घ काळ नाही.
तरीही ७० वर्षं एकत्रित विचारात घेताना राष्ट्राच्या, संस्कृतीच्या जीवनातला हा पुरेसा कालखंड ठरतो. हे ७० वर्षांचं स्वातंत्र्य आधीच्या सुमारे १२००-१४०० वर्षांपासूनची कमीअधिक प्रमाणातली सततची आक्रमणं आणि परकीयांच्या राज्यव्यवस्था यावर महाकष्टानं मात करून, एक देदीप्यमान स्वातंत्र्यलढा लढवून मिळालेलं आहे. मिळताना ते स्वातंत्र्य रक्ताळलेलं होतं. आपला देश तुटला. फाळणी झाली. भारताच्या उरावर एक शाश्वत शत्रू उभा राहिला. हे सर्व दुःखद असलं तरीसुद्धा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कोहीमापर्यंतचा अखंड भारत एकसंध आणि स्वतंत्र झाला हेही एक आनंददायक सत्य आहे. हे स्वातंत्र्य प्राणपणानं जपलं पाहिजे ही आपली सगळ्यांची जबाबदारी बनते.
एकत्रितपणे ७० वर्षांकडं पाहिलं तर दोन्ही बाजूंनी बोलता येईल. अनेक मुद्दे सांगून म्हणता येईल की १९४७ साली जो भारत देश साध्या टाचणीचंही उत्पादन करत नव्हता, तो आज ७० वर्षांच्या प्रवासानंतर एक आधुनिक अर्थव्यवस्था, एक आधुनिक राज्यव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती यांच्यासहित आजच्या जगात सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था इथपर्यंत पोचला. म्हणजे भारतानं ७० वर्षांत खूप मोठी वाटचाल केली. तर दुसऱ्या बाजूला हेही म्हणता येणं शक्य आहे की जेवढी वाटचाल करायला हवी होती आणि जेवढी वाटचाल करता येणं शक्य होतं ते आम्हाला चुकीच्या धोरणांमुळं जमलं नाही. आपण दृष्टिकोन कसा घेतो त्यावर काहीसं अवलंबून आहे. उदा. भारताबरोबर आणि आसपास भारताच्या प्रभावामुळं नव्यानं स्वतंत्र झालेले आफ्रो-आशियाई किंवा लॅटिन अमेरिकेतले देश – त्यातल्या काही देशांनी भारतापेक्षा प्रचंड प्रगती साधली. त्या देशांकडे जर बोट दाखवलं, उदा. दक्षिण कोरिया. भारतासमोर दक्षिण कोरिया टीचभर देश आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या विदर्भाएवढं भौगोलिक क्षेत्र असलेला देश. १९८१ पर्यंत दक्षिण कोरियासुद्धा दरिद्री, दलदलीनं भरलेला, शिक्षण आणि सर्वच बाबतीत मागासलेला देश होता. त्या दक्षिण कोरियाचा take-off १९८१ च्या पुढं आहे. आज तो दक्षिण कोरिया जगात दरडोई जीडीपीमध्ये अगदी वरच्या वर्तुळात आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीत पुढं आहे. औद्योगिक प्रगतीत पुढं आहे. सॅमसंग आणि ह्युंदाईसकट जागतिक दर्जाच्या, जागतिक बाजारपेठ काबीज करणाऱ्या वस्तू आणि सेवा दक्षिण कोरिया देऊ शकतो. दक्षिण कोरियाकडं बघून भारताचं ७० वर्षाचं विश्लेषण करायचं झालं तर असं म्हणता येणं शक्य आहे की ही प्रगती साधणं भारताला अशक्य नव्हतं. पण आपण मागे पडलो.
दुसऱ्या बाजूला त्याच भारत देशाच्या बरोबर स्वतंत्र झालेले अनेक आफ्रो-आशियाई, बऱ्याच प्रमाणात बांगलादेश, दुर्दैवानं आफ्रिका तर अंधारलेलाच महाखंड म्हणून आजही ओळखला जातो. दक्षिण अमेरिकेतले देश जिथं लोकशाहीनं कधीच पाळंमुळं धरली नाहीत. त्यातल्या सुद्धा काही अर्थव्यवस्था उदा. अर्जेंटिना एकेवेळी एक जागतिक आर्थिक महासत्ता होईल या मार्गावर होती. पण अर्जेंटिनाची स्टोरी कुठंतरी बिनसली आणि आर्थिक विकासाची सगळी कहाणी नासून गेली. अनेक देशांमध्ये लष्करशाही आली. जातीय, धार्मिक, वांशिक कारणांवरून भयानक रक्तपात झाला. त्या तुलनेत भारताकडं पाहिलं तर अनेक तज्ज्ञांना अशक्य वाटत असताना भारतातली लोकशाही टिकली. राष्ट्रीय एकात्मता वाढत गेली. या सगळ्यांसहित या देशानं विज्ञान तंत्रज्ञानाचं एकही क्षेत्र असं सोडलं नाही की ज्यात आज प्रगती केलेली नाही. तेव्हा म्हणता येईल की हे ७० वर्षांत जमलं. म्हणजे ७० वर्षांत भारताची एकूण वाटचाल चांगली झाली का, समाधानकारक झाली का याचा प्रत्येकाचा निष्कर्ष काहीसा तो कोणत्या दृष्टिकोनातून या ७० वर्षांकडं पाहतो, असा राहील. मला म्हणायचंय की एका भारावलेल्या तटस्थपणानं आपण या ७० वर्षांकडं पाहून, त्याचा जमाखर्च लक्षात घेऊन दृष्टी भविष्यकाळावर ठेवली पाहिजे. इथून पुढची ३० वर्षं किंवा ७० वर्षं – तेव्हा भारत कुठं असेल आणि तसा तो भारत होण्यामागं एक भारतीय नागरिक म्हणून माझा काय वाटा असेल याचा विचार प्रत्येकानं करायला हवा.
मला या ७० वर्षांमधल्या अनेक आनंददायक गोष्टी दिसतात. तिच्यामध्ये मी नंबर एकवर ठेवीन आपल्या देशात स्थिरावलेली आणि पाळंमुळं पक्की झालेली लोकशाही. ते पण प्रजासत्ताक. सामान्य मतदाराला हक्क असणे, त्या हक्कांची त्याला जाणीव असणे. आपले सत्ताधारी आपण ठरवतो आणि त्यांनी योग्य कारभार न केल्यास त्यांना आपण बदलू शकतो. भारतात लोकशाहीची पाळंमुळं इतकी पक्की झाली आहेत की आता कुठलाच पक्ष, संघटना, विचारधारा या लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्याचा विचारही करू शकणार नाहीत. केला तर ते टिकणार नाहीत. एकदाच इंदिराजींनी १९७५ मध्ये आणीबाणी लावताना असा काही विचार केला; पुढच्या निवडणुकीत त्यांना त्याची मोठी किंमत चुकती करावी लागली. अभ्यासाअंती माझी तयार झालेली श्रद्धा आहे की आपल्या देशात लोकशाहीची पाळंमुळं पक्की झाली याचं कारण भारतीय संस्कृतीच्याच पायामध्ये लोकशाही रुजण्यासाठी आवश्यक असलेली एक सहिष्णू आणि सर्वसमावेशक वृत्ती आहे. मला हे म्हणताना आपल्या आंतरिक समस्यांचं पूर्ण भान आहे. तरीसुद्धा या संस्कृतीचं मूळ सूत्र – एकं सद् विप्राः, बहुधा वदन्ति – सत्य एक आहे. जाणकार लोक त्याला अनेक नावानं ओळखतात. आपली वाटचाल वेगवेगळ्या मार्गानं आहे म्हणून आपण एकमेकांचे शत्रू नाही तर आपण एकाच ध्येयानं चाललो आहोत, हे या संस्कृतीच्या पंचपंच उषःकाली आपल्याला समजलं आहे. अनेक बहुविधतेतील एकता म्हणून आपण बहुविधतेचंही स्वागत करतो. आपल्याला बहुविधता म्हणजे फुटीरता वाटत नाही. एकत्व म्हणजे monoculture – one size fits for all असंही नाही. त्या बहुविधतेतील एकतेची मूळ जाणीव एकं सद् विप्राः या सूत्रातून येते. म्हणूनच सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता हे या संस्कृतीचं defining feature बनतं. त्यात लोकशाहीच्या यशाची पाळंमुळं मला दिसतात.
त्याच्या बरोबरीनं या ७० वर्षांतलं आपलं फार मोठं यश म्हणजे आता भारत हे एक राष्ट्र आहे, यावर आपल्या देशात राष्ट्रीय मतैक्य आहे. मला भान आहे की अजूनही देशात काही विचारधारा. उदा. डाव्या – विशेषतः साम्यवादी व कदाचित काही समूह किंवा घटक हे भारताच्या एक राष्ट्रीयत्वाशी सहमत नाहीत. पण खरोखरच ते इतके अल्पसंख्य आहेत की राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या मताला फार आदर नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करताना मला सतत जाणवतं की आज भारत हे एक राष्ट्र आहे याबाबतचं मतैक्य कोटीकोटी भारतीयांमध्ये आहे. भले काही पॉकेट्स – कदाचित सगळा काश्मीर तर निश्चितच नाही पण श्रीनगर खोऱ्यामधले काही पॉकेट्स, ईशान्य भारतामधली काही पॉकेट्स, तीही सगळी नाहीतच – तिकडे भारतीयपणाचा अजूनही संघर्ष चालू असेल. तो प्रत्येक संस्कृती, राष्ट्राच्या वाट्याला येतो. तरी सर्वसाधारणपणे राष्ट्रीय मतैक्य यावर देशात सहमती आहे. पुन्हा मला पूर्ण भान आहे की त्या राष्ट्राला काय म्हणायचं यावरचा ऐतिहासिक debate अजूनही चालू आहे. इतिहासाच्या आखाड्यात त्याचा निकाल लागणार आहे. कारण तुम्हाला त्या राष्ट्राला नाव काय द्यायचं आहे याच्या निरपेक्ष – आहे ते एक राष्ट्र आहे यावर आज भारतात गेल्या ७० वर्षांपासून मतैक्य झालं आहे. धावता आढावा घ्यायचा झाला तरी उदा. स्वातंत्र्य मिळताना तर इंग्रजांचा डाव होता की या देशाचे किमान सहाशे छोटे छोटे तुकडे व्हावेत. पण सरदार पटेलांच्या – खरोखर लोहपुरुषाच्या कर्तृत्वानं सगळं एकसंध राष्ट्र उभं राहिलं. आपल्याला खरंच आश्चर्य वाटेल की भारतात आधी सामील व्हायला जोधपूर आणि बिकानेर संस्थानांचा विरोध होता. त्यानंतर भोपाळच्या नवाबाच्या नेतृत्वाखाली विशेषतः काही मुस्लिमधर्मीय संस्थानांचा विरोध होता. पण क्रमाक्रमानं त्या सगळ्यांनी आपणहून आनंदानं आपला विरोध मागं घेत या देशाशी एकरूपत्व स्वीकारलं. पुढे दक्षिणेमध्ये आवाज उमटला. आम्ही भारतीय नाही, वेगळेच आहोत. विशेषतः तामिळनाडू. पण त्या द्रविड मुन्नेत्र कळघमनं अण्णा दुराई यांच्या नेतृत्वाखाली १९६४ च्या पुढं भूमिका बदलून आम्ही भारतात आहोत, भारतीय आहोत आणि आम्हाला जे काही तामिळ माणूस, तामिळ भाषा, तामिळ संस्कृतीचं भलं करायचं आहे ते भारतात राहून राष्ट्रीय चौकटीत करू आणि तसं ते होईल याचा आम्हाला विश्वास आहे, असं म्हटलं.
हीच कहाणी मिझोरामची आहे. हीच कहाणी एके वेळी उभं राहिलेल्या खलिस्तान आंदोलनाची की ज्याला आजच्या तारखेला पंजाब आणि शीख समाज यांचा अजिबात पाठिंबा नाही. आपल्याला कळणाऱ्या भविष्यकाळात कधीही पुन्हा शीख समाजाचा घटक म्हटला नाही की आम्ही भारतीय नाही, आम्हाला फुटून निघायचे आहे. संकट आलं पण ते दूर झालं. मला पूर्ण विश्वास आहे की या तऱ्हेने काश्मीरचा प्रश्नही आपल्याला सुटलेला दिसेल. उलट आपण जेव्हा शेजारील राष्ट्राकडे पाहू ते पाकिस्तान – मुस्लिम म्हणून आमचं राष्ट्र वेगळं या निकषावर निर्माण झालं, प्रचंड रक्तपात झाला. पण २५ वर्षांच्या आत ते फुटलं. त्यांचा धर्मांध इस्लाम त्यांना एकत्र ठेवू शकला नाही. उलट भारताची सहिष्णू, सर्वसमावेशक संस्कृती, अनेक तर्हांचे संघर्ष, भाषांचे, जातींचे, प्रदेशांचे…तरी ते समजावून घेऊन, लवचिकपणे सोडवून आपलं राष्ट्रीयत्व बळकट करण्यात यश आलं. ७० वर्षांतली ही आपली मोठी मिळकत म्हणावी लागेल.
भारताच्या विकासाच्या कहाणीबद्दलसुद्धा अशाच प्रकारे आनंदानं बोलता येईल. खरंच आहे की १९४७ मध्ये आपण एक दरिद्री अर्थव्यवस्था आणि जवळजवळ टाचणीचंही उत्पन्न देश करत नव्हता. स्वातंत्र्यानंतरच्या आर्थिक धोरणांची स्वतंत्रपणे चिकित्सा जरूर करता येईल तरी ७० वर्षांच्या एकत्रित वाटचालीनंतर या देशाकडे आर्थिक विकासाचा स्वतःचा पायाभूत ढाचा उभा राहिलाय. म्हणून आता भारत एक जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि ही गती आपल्याला आणखी ३० वर्षं टिकवता आली तर आपण अमेरिका आणि चीनच्या बरोबरीनं आणि जगातली क्रमांक एक किंवा दोनची अर्थव्यवस्था होऊ शकतो ही क्षमता देशात आहे. हा आपल्यामध्ये एक विश्वास आहे आणि पुढच्या ३० वर्षांच्या वाटचालीत जे करू त्याची पायाभरणी या ७० वर्षांत आहे असं मी त्या विकासाच्या कहाणीला नाव देतो.
असाच ७० वर्षांच्या राष्ट्रीय जीवनाचा अत्यंत आनंददायक घटक म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानामध्ये भारतानं केलेली प्रगती. त्याच्या आधीच्या १२००-१५०० वर्षांची ही उणीव आपल्याला बरोबर कळली की आम्ही जगाच्या मागं पडलो. दरवेळी येणाऱ्या आक्रमक शत्रूकडे विज्ञान तंत्रज्ञान आणि त्यामुळं तयार झालेलं प्रगत युद्धशास्त्र, युद्धसाहित्य होतं. त्यामुळं दरवेळी आम्ही हरत राहिलो. भारतानं गेल्या ७० वर्षांत ती ऐतिहासिक चूक निश्चितपणे दुरुस्त केली. आणि विज्ञान तंत्रज्ञानाची आज सर्वच्या सर्व क्षितिजं – बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी. आता क्वांटम कॉम्प्युटर, सॅटेलाईट, स्पेस रिसर्च, आण्विक संशोधन सगळ्यात भारत, भारतीय शास्त्रज्ञ यांनी जागतिक पातळीची तोडीस तोड प्रगती करून दाखवली आहे. एतद्देशीय विज्ञानातून आपण ही प्रगती साधली. पुन्हा मला जरून भान आहे की विज्ञानाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला अजून खूप प्रगती करायची आहे. मुळातलं संशोधन – रिसर्च आणि डेव्हलपमेंट इथं आपण काहीसे मागे आहोत. याचं भान ठेवूनही विज्ञानात केलेल्या प्रगतीबद्दल भारतीय नागरिक म्हणून आनंद वाटावा अशी स्थिती आहे.
अर्थातच सगळंच चित्र गुलाबी गुलाबी नाहीये. मी सुरुवात करतानाच म्हणालो, तसं तुमच्या-माझ्या देशातल्या जातीपाती, त्यामधून तयार होणाऱ्या माणसा-माणसातल्या भिंती, उभे राहणारे जातींचे संघर्ष की ज्याच्यामध्ये एखादी ठिणगी आंतरिक गृहयुद्धाचा, जातींचा, हिंसाचाराचा वणवा पेटवू शकेल अशी शक्यता आणि त्या तलवारीच्या धारेवरूनच आपली संस्कृती, आपलं राष्ट्र वाटचाल करत आहे. अजूनही देशामध्ये अनेक अराष्ट्रीय – राष्ट्रविरोधी घटक आहेत. आपल्याला दिसेल की अनेक मूलभूत मुद्द्यांवर देशात मतैक्य नाही. उदा. वंदे मातरम्, काश्मीर भारताचा अविभाज्य घटक असणे, एका देशाला एक समान कायदा पाहिजे जो घटनाकारांनी सांगितला होता. पण मला विश्वास आहे की कुठल्याही प्रकारची सक्ती, धाक, दडपशाही न करता एका उत्क्रांतीच्या गतीनं हृदयपरिवर्तनाच्या रस्त्यानंसुद्धा राष्ट्रीय मतैक्य क्रमाक्रमानं उत्क्रांत होत जातील. आपल्याला अजून खूप तऱ्हांच्या विषमतेचा सामना करायचा आहे. अजूनही प्रादेशिक जाणिवांची आव्हानं आहेत. ज्या राष्ट्रीय एकात्मतेबद्दल मी फार आशेनं आणि श्रद्धेनं बोलतोय तिला दर क्षणाला आव्हान असतं याचं मलासुद्धा भान आहे. खरं म्हणजे जरा प्रामाणिकपणानं विचार केला तर प्रत्येकाला लक्षात येईल की प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक समूहसुद्धा मग त्या समूहाला त्या त्या वेळचं नाव काहीही द्या. उदा. राष्ट्र. या सर्वांमध्येच एक प्रकारची आंतरिक विसंगती दिसून येते. हे एक वैश्विक मानवी सत्य आहे. त्या विसंगतीकडे पाठ फिरवणं हा ढोंगीपणा किंवा अप्रामाणिकपणा होईल. आपलं काम आहे जाणवणाऱ्या त्या विसंगतीच्या नजरेस नजर भिडवून पाहणे, ती मान्य करणे आणि प्रामाणिकपणे त्या दूर करण्यासाठी सतत काम करत राहणे. तेव्हा कुठल्याच – ना व्यक्ती ना देशाच्या कोणत्याच कालखंडात अशी स्थिती असत नाही की जिथं सर्व समस्या सुटल्या आहेत, सारं कसं छान आहे – म्हणून ते सुवर्णयुग आहे. नव्हे नव्हे तसं असू शकत नाही. उदा. जसं समाजाच्या कोणत्याही कालखंडातल्या कोणत्याही स्थितीमध्ये गुन्हेगारी किंवा रोगराई शून्य झाली, असं म्हणणं शक्य नाही. पण म्हणून काही आपण गुन्हेगारी आणि रोगराई यांच्याविरुद्धचे संघर्ष थांबवत नाही. त्याबद्दलचं संशोधन कमी करत नाही. कितीही कायदे आणि पोलीस असले तरी गुन्हे होतात तर कशाला पाहिजेत पोलीस अन कायदे असं आपण म्हणत नाही. तसंच व्यक्ती आणि राष्ट्राच्या जीवनाबद्दल आहे.
७० वर्षांच्या वाटचालीनंतर आपण इथपर्यंत पोचलो हे शांतपणे लक्षात घेऊन आपलं काम आहे, आज वर्तमानात असलेल्या समस्या एका शुद्ध प्रामाणिक मनानं कबूल करून त्यांच्यासाठी कामाला लागणं. उदा. मला असलेली सर्वात मोठी काळजी सांगतो – फार आशेनं जेव्हा जेव्हा मी म्हणतो की आजपासून भारताचं भविष्य उज्ज्वल आहे आणि पुढच्या ३० वर्षांत (मीच एकटा नाहीये म्हणणारा) भारत जगातली पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. दरवेळी हे वाक्य बोलताना कायम कंसात एक न बोललेलं वाक्य माझ्या मनात असतं – जग टिकलं तर! कारण पर्यावरणाचं आव्हान! जाणकार असं सांगतात की आता तर पर्यावरणाचा समतोल ‘ढासळलेला’ आहे. तेव्हा विकासाची, एकात्मतेची सगळीच कहाणी, सगळंच मुसळ केरात जाईल असं एक आव्हान – ते जागतिक आहे. त्यासाठी जगानं एकत्र येणं आवश्यक आहे. ते आव्हान पर्यावरणाचं आहे. तरी मला तिथं वाटतं की एक भारतीयपणा आणि भारत जगाला जो दृष्टिकोन देऊ इच्छितो ते पुन्हा जगाचं बळ ठरू शकतं. कारण जगानं एकत्र येणं आवश्यक आहे. सगळं जग एक आहे, असं पहिल्यांदा म्हणणाऱ्या संस्कृतीचे आपण घटक आहोत. वेदांमधली आपली प्रार्थना आहे – ‘पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराट् इति ।’ – या साऱ्या पृथ्वीचं एक राष्ट्र आहे. आपण वसुधैव कुटुम्बकम् म्हणणाऱ्या संस्कृतीचे घटक आहोत. आपल्याकरता विश्व ही एक बाजारपेठ नसून एक कुटुंब आहे. म्हणजे आपण आपलं राष्ट्रीयत्व न विसरता किंवा डळमळीत न करता वैश्विक ऐक्य आणि विश्वबंधुत्व याचा मेळ घालू शकतो. यामध्ये मला भविष्यकाळाचं फार मोठं आश्वासन दिसतं. आधुनिक जग हे म्हणत चाललंय की विकासाचा मध्यवर्ती बिंदू पश्चिमेकडून आता पूर्वेकडे सरकू लागलाय. येणाऱ्या काळात जगाच्या विकासाचं इंजिन भारत आणि चीन असणार आहेत. आपल्याला मानवी संस्कृतीला देण्याचं फार मोठं योगदान आहे आणि करण्याची वाटचाल खूप मोठी आहे. मला हा विश्वास आहे की आपला भारतीय आत्मा न हरवता आणि हजारो वर्षांपासून या देशात चालत आलेली संस्कृती – तरीसुद्धा नुसती भूतकाळाची पूजा नाही, नुसतंच परंपरांचं पालन नाही तर काळानुसार त्या बदलाव्या लागतात. वर्तमानकाळात काय पाहिजे आणि नजर भविष्यकाळाकडे असेल ही शक्ती भारतीय संस्कृतीकडे आहे. आपण काळानुसार बदलतोसुद्धा. तरी आपला मूळ भारतीय आत्मा आपण टिकवतोसुद्धा. हे कळल्यामुळेच ७० वर्षांच्या वाटचालीनंतर एक भारतीय नागरिक आणि मुख्य म्हणजे कार्यकर्ता म्हणून मी भारताच्या भवितव्याबद्दल अत्यंत आशावादी आहे. फक्त अशा भवितव्यामध्ये आपला वाटा आपण काय उचलणार हेच आपल्यासमोरचं आव्हान आहे. या आव्हानाचं उत्तर म्हणजे भविष्याकाळातला भारत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *