शताब्दीच्या वाटेवरील संकल्प!

ज्येष्ठ इतिहास संशोधक, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतंच गुरुवारी, नागपंचमीच्या दिवशी वयाची 95 वर्षे पूर्ण करून 96 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यांची जन्मतारीख 29 जुलै 1922. पण आपल्याकडील सण-वार, रीतिरिवाज आणि वाढदिवससुद्धा पूर्वीच्या काळापासून तिथीनं साजरे होतात. बाबासाहेबांचाही वाढदिवस त्यांचे हजारो चाहते समक्ष पुण्यात येऊन दरवर्षी तिथीनुसार नागपंचमीला साजरा करत असतात. अनेकांचे वाढदिवस समाजात साजरे होत असतात. कुणाची एकसष्ठी, कुणाची पंच्याहत्तरी तर कुणाचे 81 व्या वाढदिवशी सहस्रचंद्रदर्शन! पण वयाच्या शंभरीकडे वाटचाल सुरू असतानाही आपला वाढदिवस एका नव्या संकल्पानं आणि राहिलेले अपूर्ण संकल्प पूर्ण करण्याच्या ओढीनं प्रचंड ऊर्जेनिशी कार्यरत होण्यासाठी करणारी बाबासाहेबांसारखी व्यक्तित्वं आज दुर्मिळ होत आहेत, म्हणून त्यांची मुद्दाम दखल घ्यावीशी वाटते.
राजा शिवछत्रपती हा महाग्रंथ, जाणता राजा हे महानाट्य आणि अन्य ग्रंथसंपदा, तमाम शिवभक्तांना राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून देणारी त्यांची प्रेरणादायी व्याख्यानं … या साऱ्या प्रचंड खटाटोपातून त्यांनी समाजात शिवप्रेमाचं एक बीज रुजवलं. अनेक व्यक्ती, संस्था, प्रकल्पांच्या उभारणीमुळं हे बीज आज वटवृक्षाच्या स्वरूपात विस्तारल्याचं दिसतं. इतिहास संशोधक निनादराव बेडेकर म्हणायचे, मी इयत्ता दुसरीत असताना बाबासाहेबांचं ‘दख्खनची दौलत’ हे पुस्तक माझ्या हाती लागलं नसतं तर मी इतिहासाच्या अभ्यासाकडे वळलो नसतो.
‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे तीन शब्द म्हणजे महाराष्ट्रात आणि जगभरात वास्तव्याला असणाऱ्या विशेषतः मराठी माणसांचं शाश्वत प्रेरणास्थान! इतकंच काय पण मराठी भाषकांशिवाय इतर जात-पात-धर्मप्रांत-भाषा भेदून अन्य लक्षावधी राष्ट्रप्रेमी मंडळींनाही शिवाजी महाराजांचा इतिहास आजही स्फूर्तिदायी असतो. बाबासाहेबांसाठी तर हे तीन शब्द म्हणजे जणू त्यांच्या आयुष्याचाच मंत्र झाले आहेत. प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे हे तेव्हा पुण्यात डीफेन्स अकौंट्स्मध्ये नोकरीला होते. सायकलवरून ते रोज कामावर जात. पण उरलेल्या वेळात त्यांचा गायनाचा रियाज अखंडपणे सुरू असे. एकदा पु. ल. देशपांडे यांनी त्यांना विचारलं, ‘अरे वसंता, या एवढ्या धावपळीच्या नोकरीत तू गाण्याचा रियाज करतोस तरी केव्हा?’ त्यांना उत्तर देताना वसंतराव म्हणाले, ‘म्हणजे भाई, तू श्वास तरी केव्हा घेतोस असे मला विचारण्यासारखे आहे!’ गाणं आणि त्याचा रियाज हाच वसंतरावांचा श्वास होता अन् ध्यासदेखील. बाबासाहेबांचंही नेमकं तसंच आहे. शिवचरित्र हाच त्यांचा श्वास आहे. तीच त्यांची जगण्याची प्रेरणा आहे.
पुरंदरे घराणं मूळचं सासवडजवळचं! पण त्यांचे पूर्वज पुण्यात येऊन स्थायिक झाले. सरदार पुरंदऱ्यांचं घराणं तसं शिवचरित्र पूर्व काळापासून नामांकित घराणं! आपल्या घराण्यातील पूर्वजांचं आडनाव ‘वाघ’ असं होतं, इथंपासून हे घराणं सासवडजवळ कसं गेलं आणि पुढं पुण्यात कसं स्थायिक झालं याचा साद्यंत, तपशीलवार इतिहास खुद्द बाबासाहेबांच्याच तोंडून ऐकण्यात वेगळीच गंमत आहे. त्यांचं ऐकताना आपण केंव्हा शिवकाळात पोहोचतो, ते आपल्याला कळतच नाही. इतकंच काय पण वेदवाङ्मयापासून ते शास्त्र-पुराणांपर्यंत आणि रामायण-महाभारतापासून ते शिवचरित्रापर्यंत, एवढंच काय जगभरातील अनेक देशांच्या स्वातंत्र्ययुद्धापासून ते तिथल्या भव्य-दिव्य राष्ट्रउभारणीच्या कथांपर्यंत आणि प्राचीन भारतापासून ते वर्तमान स्थितीपर्यंतचे अनेक तपशील त्यांच्या बोलण्यात, गप्पांत आणि भाषणांमध्ये इतक्या चपखलपणे येत असतात की आपण त्या ऐकण्यानेच श्रीमंत होत जातो.
शिवचरित्रातल्या अनेक बारीक-सारीक वर्णनांसह, या तपशिलांचे पुरावे कुणी, कधी, कोणत्या स्वरूपात दिले आहेत हे ते अचूकपणे सांगतात. पण त्याचबरोबर त्या काळातील घटना, प्रसंग, त्यातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, महाराजांच्या शत्रूपक्षातील मंडळींची बरी-वाईट वैशिष्ट्ये, त्यावेळची भौगोलिक परिस्थिती, प्रथा-परंपरा, जीवनपद्धती, त्यावेळची भाषा, वेषभूषा, दाग-दागिन्यांचे तपशील, त्यावेळचे सण, कला, साहित्य, संस्कृती, त्यावेळचे क्रीडाप्रकार, त्यावेळच्या लोकप्रथा, लोकगीतं, त्यावेळचे खाद्यपदार्थ, त्यावेळच्या माणसांच्या तऱ्हा या साऱ्यांचं अचूक वर्णन त्यांच्या बोलण्यात इतक्या सहजपणे येत असतं की आपण इतिहासाचा वैभवशाली भरजरी जरीपटका डोक्यावर ठेवून वर्तमानकाळात वावरत आहोत, असं वाटू लागतं. त्याचं कारण याच सगळ्या बोलण्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून ते गोवा मुक्तीच्या आंदोलनापार्यंत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते सचिन तेंडुलकरच्या एखाद्या अविस्मरणीय क्रिकेट सामन्यापर्यंत, जगभरात गाजलेल्या अनेक इंग्रजी नामवंत चित्रपटांपासून ते आजच्या तरुणांनी सादर केलेल्या मराठीतील अनेकविध कलाकृतींपर्यत सगळ्यांचा परामर्ष बाबासाहेब अगदी सहजपणे, पण अत्यंत रसिकतेने घेत असतात. म्हणूनच हरी, हरी करत अनेकांना उपदेशांचं च्यवनप्राश देत बसण्याच्या वयातसुद्धा आजही वयाच्या 96 व्या वर्षी त्यांचा रात्रंदिवस अखंड भारतभर कुठेही प्रवास होत असतो आणि सतत त्यांच्याभोवती तरुणांचा गराडा पडलेला असतो. इतिहासातली असो की पुराणातली, अगदी वर्तमानकाळातली काल-परवा घडलेली गोष्ट असो, बाबासाहेब पुराव्याशिवाय कधीच बोलत नाहीत. अन् जिथे बोलतात तिथे स्पष्टपणे आधी सांगतात की, एक संशोधक-विद्यार्थी या नात्यानं, अभ्यासाच्या आधारे काढलेला हा माझा निष्कर्ष आहे. अंदाज आहे. म्हणूनच खुद्द राजमाता सुमित्राराजे भोसले यांनीही बाबासाहेबांचा प्रामुख्यानं हाच गुण त्यांना दिलेल्या मानपत्रात कौतुकानं नमूद केला आहे.
पुण्यातील भावे स्कूलमध्ये चित्रकलेचे शिक्षक असलेले वडील मोरेश्वर पुरंदरे यांनी बाबासाहेबांमधील एक ‘वेगळा मुलगा’ ओळखला. त्या मुलाच्या मनातील भाव-भावना आणि आकांक्षा जाणल्या. अबोलपणे त्या आकांक्षांना फुलवण्याचं एका सजग पालकाचं काम त्यांच्या वडिलांनी अत्यंत मार्मिकपणे केलं. ‘पेरेंटिंग’ वगैरे शब्दाचा तेव्हा मागमूसही नव्हता. पण इतिहासातल्या अनेक कथा, गोष्टी, हकिकती अगदी दुसऱ्या महायुद्धाची वर्णनं ते आपल्या मुलांना काळ्या घोंगडीवर, चित्रांसह, नकाशे काढून दाखवत असत. बाबासाहेबांना त्यातूनच नकळतपणे इतिहासाचं वेड लागलं. विशेषतः शिवचरित्राचं! ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हाच जणू त्यांचा रक्तगट असावा इतकं हे शिवचरित्राचं वेड त्यांच्या रोमारोमात भिनलेलं दिसतं. ‘इतिहासात चंदनही खूप आहे आणि कोळसाही खूप आहे. आपण चंदन उगाळूया. कोळसा नको. चंदनाचा कोळसा करून उगाळण्याचा उपद्व्याप तर नकोच नको.’
राजा शिवछत्रपती हा महाग्रंथ, जाणता राजा हे महानाट्य आणि अन्य ग्रंथसंपदा, तमाम शिवभक्तांना राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून देणारी त्यांची प्रेरणादायी व्याख्यानं … या साऱ्या प्रचंड खटाटोपातून त्यांनी समाजात शिवप्रेमाचं एक बीज रुजवलं. अनेक व्यक्ती, संस्था, प्रकल्पांच्या उभारणीमुळं हे बीज आज वटवृक्षाच्या स्वरूपात विस्तारल्याचं दिसतं. इतिहास संशोधक निनादराव बेडेकर म्हणायचे, ‘मी इयत्ता दुसरीत असताना बाबासाहेबांचं ‘दख्खनची दौलत’ हे पुस्तक माझ्या हाती लागलं नसतं तर मी इतिहासाच्या अभ्यासाकडे वळलो नसतो. बाबासाहेबांची नि माझी ओळख झाली नसती तर मोडीचे आणि कागदपत्रं वाचनाचे धडे मी गिरवले नसते. दुर्ग भटकंतीदेखील कदाचित केली नसती. बाबासाहेब हे आमचं प्रेरणास्थान आहे. ते द्रोणाचार्य आहेत.’
बाबासाहेबांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला हा परीसस्पर्श जाणवतो. स्वतः बाबासाहेबांना तर विश्वभरातील दिग्गजांचा आत्मीय सहवास लाभला. बाबासाहेबांच्या अलौकिक प्रतिभेचा आणि वज्रलेपी शिवभक्तीचा आविष्कार तर जात, धर्म, भाषा, प्रांत, देश ओलांडून गेला आहे. प्रख्यात दाक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन् यांना बाबासाहेबांचा परिचय करून देताना पं. हृदयनाथ मंगेशकर, अगदी निःसंकोचपणे लतादीदींसमोरच म्हणाले, ‘हे वक्तृत्वातील लता मंगेशकर आहेत.’
अलिकडच्याच काही वर्षांपूर्वीची गोष्ट. उर्दू साहित्य परिषदेच्या वतीनं सय्यद आसिफ नावाचे गृहस्थ बाबासाहेबांना भेटायला आले. त्यांनी ‘जाणता राजा’ हे महानाट्य उर्दू भाषेतून साकारण्याची इच्छा व्यक्त केली. बाबासाहेबांनी आनंदानं विनाअट ती देऊन टाकली. त्याचवेळी त्यांनी बाबासाहेबांना उर्दू साहित्य परिषदेचं मानद सदस्यत्वही बहाल केलं.
बाबासाहेबांनी स्वतःहून स्वीकारलेल्या शिवकार्यासाठी घेतलेले अफाट कष्ट पाहिले की, हे सारं एका जन्मात कसं शक्य होईल? असं आपल्याला वाटून कदाचित नसला तरी पुनर्जन्मावरचा आपल्या मनातला विश्वास दृढ होऊ लागतो. एकदा ते नाशिकच्या वाटेवर सायकलनं प्रवास करत होते. एकटेच. मध्यरात्र झाली. शीणभार वाटल्यानं शेतातच एका झाडाला सायकल बांधली अन् राजवाड्यांची परंपरा सांभाळणारा हा संशोधक, राजमातांनी गौरवलेला हा शिवशाहीर चक्क नांगरलेल्या शेतातील माती अंगावर ओढून निद्राधीन झाला. मातीशी नातं सांगणाऱ्या, महाराष्ट्ररसात शिवचरित्र सांगणाऱ्या बाबासाहेबांना आपल्या मातीची ऊब अधिक जवळची वाटली. आजही वाटते.
‘बाबासाहेब आपलं व्याख्यान तीन सप्तकांत गातात. म्हणूनच ते गद्यगंधर्व आहेत.’ असं साक्षात् भारतरत्न पं. भीमसेन जोशी म्हणाले होते. पण हाच नेमस्त संशोधक प्रेमळ अन् हळवा माणूस म्हणूनही आपल्याला ठायी ठायी भेटतो. ‘जाणता राजा’चे बार्शीला प्रयोग सुरू असताना दमलेल्या कलाकारांचे पाय चेपत बसणारा हा माणूस ‘बाबासाहेब’ पण विसरतो अन् आपण त्यांच्यातलं हे देवपण अनुभवून आपल्या पूर्वपुण्याईबद्दल कृतज्ञ होतो.
बाबासाहेब मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते. होय. आणि आजही. पण विचारांचा बुरसटलेपणा आणि संशोधकीय विचारांतर मुळातच नसल्यानं त्यांना सर्वपक्षीय, सर्व विचारधारांच्या मंडळींचा, त्या त्या विचारांच्या दिग्गजांचा स्नेहजिव्हाळा लाभला. तो आजही कायम आहे. श्रीरामपूर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहवासात राहिलेले अॅड. रावसाहेब शिंदे यांच्याबाबतची बाबासाहेबांची एक आठवण इथं आवर्जून सांगण्याजोगी आहे. मूळच्या कम्युनिस्ट विचारधारेतल्या रावसाहेबांनी बाबासाहेबांची व्याख्यानमाला श्रीरामपूर इथं आयोजित केली होती. त्यावेळी अचानक एक दुय्यम वतनाचा लोकल फुडारी व्यासपीठावर आला अन् बरळू लागला. ‘बाबासाहेबांच्या या व्याख्यानाचं उत्पन्न त्या संघाकडं जातं’ वगैरे. अजिबात विलंब न लावता रावसाहेबांनी ध्वनिक्षेपक हाती घेऊन त्या बरळणाऱ्या धर्मनिरपेक्ष फुडाऱ्याला सुनावलं. ‘ठीक आहे. ते त्यांना मान्य असलेल्या विचारांसाठी जीव तोडून काही तरी विधायक करत आहेत. तुम्ही तुमच्या विचारधारेच्या पक्षासाठी आजपर्यंत काय केलंत आणि काय करता?’ अर्थातच तो निरुत्तर झाला. पण इथं रावसाहेबांमधील हा विचारी अन् विवेकी विचार बाबासाहेबांना भावला. आजही ते आवर्जून त्याची याद देत असतात.
या माणसानं आयुष्यभर शिवचरित्रासाठी केलेलं काम एका जन्मात अभ्यासणंही अवघड. मिळालेल्या पैशातून कोट्यवधी रुपये इस्पितळ, शिक्षणसंस्था, मंदिरं, मशिदी, दर्गे, गरीब मुलांची शिक्षणं, त्यांना नोकरी-रोजगार अनेक संस्थांच्या उभारणीसाठी त्यांनी उदारपणे दिले आहेत. आजही वयाच्या 96 व्या वर्षी इतिहासाच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून ते शिवछत्रपतींविषयी लेखन करणाऱ्या थॉमस निकोलस, जॉन फ्रायर, रॉबर्ट जीन्स, अॅबे कॅरे, जेम्स डग्लस, हेन्री ऑक्झिंडेन, निकोलो मनुची यांच्या लेखनाचा अभ्यास करत आहेत. शिवचरित्रातले प्रसंग कथन करून त्यावर प्रतिभावंत तरुण चित्रकार अनेक चित्रं साकारत आहेत. मूळचा कोल्हापुरचा असलेला अभय ऐतावडेकर हा युवक सध्या त्या कामात गुंतलेला आहे. तर मुंबईतील नामवंत वजिबदार स्टुडिओतील कलाकारांनी तयार केलेली शिवचरित्रावरील सुमारे साडेतीनशे भव्य पेंटिंग्ज प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. मुंबईत काही काळापूर्वी झालेलं हे चित्रप्रदर्शन आता दिवाळीनंतर दिल्लीमध्ये होणार आहे. छत्रपती शिवरायांच्या चरित्राच्या म्हणजेच इतिहासाच्या अभ्यासातून वर्तमानाचे भान ठेवत भविष्याकडे जाण्याची प्रेरणा घ्यायची असते हेच बाबासाहेबांच्या संकल्पांचे आणि जीवनाचे सूत्र आहे. तरुणांनी हा आदर्श घ्यायला हवा.

लेखक – डॉ. सागर देशपांडे
इमेल – jadanghadan@gmail.com
संपर्क – 9850885936

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *