शंकर आणि श्रावण

हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिना इंग्रजी कॅलेंडर जुलै-ऑगस्टच्या सुमारास येतो. श्रावणात नागपंचमी, राखीपौर्णिमा ते दहीहंडीपर्यंत अनेक सण येतात, तर ऑगस्टमध्ये क्रांतिदिन आणि स्वातंत्र्यदिनासारखे राष्ट्रीय दिवसही साजरे केले जातात. माझ्या लहानपणी श्रावण महिन्याला एक वेगळे महत्त्व होते. घरात जिवत्यांचे चित्र देवघरात लावलेले असायचे. त्यामध्ये हिरण्यकश्यपूला मारणाऱ्या नरसिंहाचे चित्रही असे. ‘आघाडा, दुर्वा, फुलं’ असं ओरडत भल्या सकाळी बायका दारात त्या गोष्टी विकायला येत. कृष्ण, विष्णू, शंकर आणि नंतर गणपती यांचे हे पूजा करायचे दिवस. आता काळ बदलला आहे, तरी निसर्ग बदलला नाही. ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’ ही कविता वाचताना किंवा ऐकताना रोज चाललेला ऊन पावसाचा खेळ पाहून मात्र आता श्रावण महिना चालू आहे याची प्रचीती येते!

ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यापैकी महेश म्हणजेच शिव किंवा शंकर. त्याची पत्नी पार्वती किंवा उमा. या दोघांना आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. त्यामुळेच विरक्ती आणि पार्वतीचा पती यांचा अजब मिलाफ असणाऱ्या भोलानाथ शंकराबद्दल वाटणारे माझे कुतूहल आजही कायम आहे. स्मशानात राहून अंगाला भस्म लावणाऱ्या शिवाची देवळे ही आपल्या संस्कृतीत शक्तिपिठे मानली गेली आहेत. असे म्हणतात की, एखाद्या गावाची सुरुवात ही एखाद्या देवळाने होत असे. हे पहिले आणि निर्जन ठिकाणी असणारे देऊळ प्रामुख्याने शंकराचे असे. त्यानंतर मारुतीच्या मंदिरांचा क्रमांक लागतो. मग गणपती, विष्णू आणि रामाची देवळे येतात. त्यामुळेच विविध देवी देवता ही केवळ आपली धार्मिक ओळख नसून आपल्या सांस्कृतिक अस्मिता आहेत.

त्यामुळे मला पहिल्यापासून पुण्यातील देवळे व त्यातील शंकराची देवळे हा अभ्यासासाठी एक महत्त्वाचा विषय वाटत आला आहे. एरव्ही काहीसा एकांतात असणारा शंकर देव हा श्रावणात मात्र  महिला आणि बालकांच्या समवेत असतो. शंकराच्या देवळात याच दिवसांत गर्दी असते. ब्रह्मा आणि विष्णूसोबत विश्वनिर्माता म्हणून शिवाची असणारी ओळख ही अनन्यसाधारण आहे. ती पार्वतीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पार्वती ही त्या अर्थाने आपण आदिशक्ती मानतो!

हे सारे धार्मिक व सांस्कृतिक संदर्भ शंकराच्या देवळांमध्ये शांत बसल्यावर जाणवतात. देऊळ त्यातील घंटांचा आवाज, आतल्या गर्भागारातील शिवालय, त्यातील पिंड आणि त्याला घालायची पाऊण प्रदक्षिणा यांचा प्रभाव आजही माझ्या मनावर पडला आहे. पुण्यातील शंकराची देवळे ही वास्तुरचनाशास्त्राच्या दृष्टीनेही अजोड आहेत. एकतर ही सारी देवळे घडीव दगडांची असून त्यांची रचना व त्यांच्याभोवती असणारे वलय आजही आहे तसेच आहे!

18 वे, 19 वे आणि अगदी विसाव्या शतकाच्या पाऊण कालखंडापर्यंत पुण्याचा परिसर तसेच शहरातील शंकराची देवळे ही ठळकपणे दिसायची, जाणवायची. आज हा साराच परिसर वाढते शहरीकरण आणि लोकवस्तीने व्यापलेली आहे. एखाद्या विरागी  माणसासारखी एकटी असणारी ही देवळे आता वाढत्या गर्दीत हरवून गेली आहेत. त्याच्याभोवती मानवी वस्ती, उद्योग, व्यवसाय यांमुळे तर शिवालयांच्या सांस्कृतिक खुणाच संपत चालल्या आहेत की काय अशी भीती वाटते. श्रावण महिना आला आणि नटून थटून शंकराला पूजायला चाललेल्या महिला दिसल्या की आपली ही संस्कृती आजही जोपासली जाते आहे याचा आनंद होतो!

शिव आणि पुण्यातील शिवालये :

ऐंशीच्या दशकात मी जेव्हा पत्रकारितेचा अभ्यास करत होतो, तेव्हा शिव आणि शिवालय हा विषय मी खास अभ्यासासाठी घेतला होता. शिव ही देवता व त्याचे मूळ स्वरूप तसेच त्याच्यासाठी बांधलेल्या देवालयांची रचना यावर मी एक छोटा निबंध सादर केला होता. माझा वर्गमित्र संजय कांबळे याने त्यात मला मदत केली होती. निर्गुण निराकार देवापेक्षा पूज्य असा आकार माणसाला हवा होता. त्यातून देवाची व देवालयांची निर्मिती झाली असावी. मूर्तीपूजा त्यातून आली. विशेषत: पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने देवालये ही तत्कालीन संस्कृतीचा वेध घ्यायला उपयोगी ठरली. शिवालये ही शिवाची – जो देवांनाही वडीलधारा.

– विश्वाची निर्मिती करणाऱ्यातील शिवाचा एक डोळा सूर्याचा तर डोक्यात त्याने चंद्र बसवला आहे. त्याचा तिसरा नेत्र हा त्यानेच निर्माण केलेल्या विश्वसंहाराचा मानला जातो. पुराणातील त्याचे रौद्र आणि सौम्य रूपही तितकेच विलोभनीय आहे. कैलास पर्वतावर वस्तीला असणारा, पार्वती ही पत्नी तसेच गजानन आणि षडानन किंवा कार्तिकस्वामी ही दोन अपत्ये असणारा आणि नंदी हे वाहन असणारा भैरवादी गण सेवक असणारा देव आहे. शिव हा शब्द बश धातूपासून निर्माण होतो. त्याचा अर्थ प्रकाशणे. तो विश्वालाही प्रकाश देतो! भारतीय संस्कृतीमधील अनेक जातींनी शिवाला देव मानले आहे. शिवाला वैदिक काळात रुद्र मानले आहे, शिवतर, शंकर, महादेव पशुपती आणि त्र्यंबक अशी त्याची विविध नावेही आहेत. ही नावे जशी माणसाने दिली तशी दानवानेही दिली असे मानले जाते!

– आपल्याकडे फक्त 33 कोटी देव आहेत! देवांची ही विविध रूपे दुष्टांचा तसेच वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी निर्माण झाली. शैव पुराणात शंकराचे एकंदर दहा अवतार असून प्रत्येक आवतारातील त्याची पत्नी ही स्वतंत्र आहे व तीही देवतेसमान तितकीच पूजनीय आहे. शिवपूजा ही लिंगस्वरूपातील असून त्या पूजेचा वार सोमवार आहे. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र असते. उपासनेचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्या दिवशी पूर्ण उपास करायचा. शिवपूजेत शिवाला बिल्वदल व शुभ्रकमळ वाहतात. तसेच महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या दिवशी शिवलिंगावर मुकुट चढवतात. शिवाचा पुजारी तो गुरव. शिवपूजा ही तमिळ, तेलुगू, कन्नड या दक्षिणेकडच्या द्राविडीयन प्रांतात आर्या काळापासून चालू आहे. दक्षिण भारतात इसवीसनाच्या सहाव्या शतकापासून शिवमंदिरे निर्माण झाली असून त्यांचे बांधकाम चालुक्य, राष्ट्रकूट व चोळ या राजघराण्यांनी व तत्कालीन धनिकांनी पूर्ण केले. आंध्र प्रदेशातील गुडिमलम् हा भाग शिवमंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.

– पुण्यातील देवालये आणि शिवालये यांचाही असणारा परस्परसंबंध पाहाण्यासारखा आहे. ओंकारेश्वर, पाताळेश्वर, अमृतेश्वर, पांचाळेश्वर, सोमेश्वर, रामेश्वर, नागेश्वर अशी असंख्य मंदिरे खूप जुनी आहेत. त्या काळातील शिवाचे अधिष्ठान, त्याची पूजा करणारा समाज, त्याची सर्व व्यवस्था सांभाळणारा वर्ग या पार्श्वभूमीवर आजच्या यंत्रयुगातील धर्म, देव आणि संस्कृती यांचे वेगळे अर्थ जाणणारा शहरी समाज. काळानुसार यात मोठा बदल होत जाणे अपरिहार्य होते पुण्यातील सर्व देवळे याला अपवाद नाहीत.

– शंकराच्या देवालयातही नागर देवालये, अष्टकोनी आकाराच्या द्राविडी शैलीची देवालये आणि वर्तुळाकृती वेसर शैलीची देवळे पूर्वी राजामुळे तर नंतर धनिकांमुळे बांधली गेली आहेत. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात नगररचनेसह देवालयांचाही विचार करण्यात आला आहे. मुख्यत: देवालयाची दिशा, मंदिराचा मुख्य भाग, त्यातली देवतांची संख्या, गर्भगृह, पुढचा चौकोनी मांडव आणि या दोघांना जोडणारा अंतराळ. गर्भगृह किंवा गाभारा, यावर निमुळते होत जाणारे शिखर या साऱ्यांचा आकार ठरलेला आहे. गाव, शहरातील त्याचे स्थानही ठरलेले आहे. त्यामुळेच शिवालये ही बांधली तेव्हा गावाबाहेर, साधू, बैरागी आणि योगी लोकांच्या ध्यानधारणेचे ठिकाण म्हणून नीरव शांत असत. आता त्यातली बहुतेक देवळे शहरात आली आणि शांतता गेली!

ओंकारेश्वर : शिवरामपंत चित्राव शास्त्रीबुवांनी 17 व्या शतकात बांधलेले हे मंदीर. पेशवे राजघराण्यातील चिमाजी अप्पा यांनी स्वत: जातीने लक्ष पुरवून हे देवस्थान 1738 मध्ये बांधून काढले. एकेकाळी शहराबाहेर असणारे व जवळच स्मशानभूमी असणारे हे ठिकाण आता बालगंधर्व पुलाजवळ भरवस्तीत आहे. सुरुवातीला या देवळातील प्रवेशासाठी आत शिरायला एक मोठी कमान होती. त्यावर सुसज्ज नगारखानाही होता. खाली मोठा नंदी असून त्यावर घडवलेल्या दगडांचा मंडपही होता. आत मुठा नदीच्या समोर एकच दरवाजा असलेले पण आकाराने मोठे असणारे शिवालय ताठ उभे असल्याचे जाणवते! मंदीर आणि नंदी यांच्या बाजूने छोटी दुमजली इमारत नंतर झाली व तिथे पुजारी, नोकरदार, गुरव व व्यवस्थापकीय कर्मचारी रहातात. मंदिराच्या वातावरणात गांभीर्य, पावित्र्य आणि टापटीप असून चित्राव शास्त्र्यांच्या सात पिढ्या तिथे नांदल्या आहेत. चित्राव शास्त्रांना दृष्टांत झाल्यानुसार गणेशखिंडीत त्यांना सोन्याच्या नाण्याने भरलेले सात हंडे मिळाले. ते त्यांनी पेशव्यांना देऊ केले. पेशव्यांनी ते न घेता या देवळाच्या उभारणीसाठी खर्च केले.

1961 मध्ये आलेल्या पानशेत पुरामुळे नंदीच्या डोक्यावरील मंडप आणि दुमजली वास्तूची वाताहत झाली. पेशवेकाळानंतर या मंदिराला सरकारी ग्रँट मिळत आलेली आहे. त्यातून हे मंदिर आणि पाषाण येथील सोमेश्वराच्या मंदिराचा खर्चही त्यातून भागवावा लागतो. हा पैसा कमी पडतो. गुरवांचा वाढता खर्च पाहता त्याची तोंडमिळवणी करणे अवघड होते असे सध्याचे वंशज सांगतात. पुण्यातील बहुतेक देवळांची स्थिती यापेक्षा फार वेगळी नाही. भाविकांच्या देणग्यांवर ही मंदिरे सध्या चालू आहेत.

पातळेश्वर : जंगली महाराज मंदिराशेजारी त्याच रस्त्यावर कोरलेली पाताळेश्वर लेणी हा स्थापत्यशास्त्रातील वेगळा चमत्कार मानला जातो. कौरवांशी द्यूतात हरल्यावर अज्ञातवासात असताना पांडवांनी ही लेणी कोरली असल्याचे सांगितले जाते. तर काही अभ्यासकांच्या मते ती इसवीसनाच्या नवव्या शतकात कोरलेली असून अर्धवट अवस्थेत सोडून दिलेली आहेत. दख्खन भागातील कणखर बेसाल्ट दगडावर कोरलेली लेणी ही त्या काळात एक निर्जन ठिकाण असावे. आता मात्र ते रोरावणाऱ्या रहदारी व इमारतींनी पूर्ण वेढून टाकण्यात आले आहे. पुरातत्त्व विभागाच्या आखत्यारीतील हे शिवमंदिर असतानाही तिथे निरुद्योगी आणि वेळ घालवणाऱ्यांची वर्दळ दुपारीही पाहायला मिळते. तीस वर्षांपूर्वी तिच्या दुरावस्थेपेक्षा आता या ठिकाणाची अवस्था काहीशी सुसह्य झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1936 मध्ये तेव्हाच्या मुंबई सरकारने ही लेणी स्वत:च्या ताब्यात घेतली. तरीही ही वास्तू आज पुरातत्त्व विभागामुळे केंद्र सरकारच्या आखत्यारीत आहे. पुण्यातील एक प्राचीन पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

चिंतामणी शेलार नावाचे गुरव पूर्वी या मंदिरातील शिवलिंगाची पूजा व व्यवस्था पाहात होते. शिवाजीनगर गावठाण भागात राहाणारे त्यांचेच वंशज, हे काम 19 व्या शतकाच्या अखेरपासून पाहात आहेत. त्याआधी शिवपूजेसाठी गुरव आणि बैरागी यांच्यात वाद व भांडणे झाली होती. अखेर त्याचा निकाल शेलार कुटुंबियांच्या बाजूने लागला. पाताळेश्वरातील शिवलिंग हे स्वयंभू असून एक लेणे म्हणूनही त्याला वेगळे महत्त्व आहे, अशी शेलार कुटुंबियांची श्रद्धा आहे. इतर मंदिरांप्रमाणे दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांच्या कृपेवर गुजराण करणे अशीच शेलार घराण्याची परंपरा होती. आता ती कदाचित खंडित झाली असेल अशी अपेक्षा आहे. पुण्यातील कलेक्टर कचेरीच्या ताब्यात हा भाग जेव्हा होता तेव्हा 1956 मध्ये तिथे आलेल्या एका मद्रासी साहेबाने आत एक सुंदर बाग बनवली होती. पण ही बाग नसून ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे 1965 च्या सुमारास ती चक्क जमीनदोस्त करण्यात आली!

वृद्धेश्वर : पांचाळेश्वरापासून 100 मीटर अंतरावर बालगंधर्व पुलाशेजारी काँग्रेस भवन असणाऱ्या रस्त्यावर नदीलगत असणारे हे मंदीर श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर ट्रस्टचे आहे. एका पेशवेकालीन वाड्याच्या आत हे मंदिर बांधलेले होते. 1961 मध्ये आलेल्या पानशेत पुरानंतर वाडा पडला पण त्याच्या काही तटबंदी आजूनही आहेत. महापालिकेचे पूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे या भागात नंतरच्या काळात अतिक्रमणे झाली. विक्रीसाठी तिथे वाहने ठेवलेली आढळतात त्यामुळे या मंदिराचे मंदिरपण हरवून गेले आहे. या मंदिराचे यापूर्वीचे गुरव अण्णासाहेब बाबूराव गुरव यांना पर्यायी उत्पन्नासाठी बाहेर पडावे लागले. त्यामुळे मध्यंतरी या भागात जुगारी दारूबाज आणि निरुद्योगी लोकांनी हैदोस घातला होता. पुणे महापालिकेनेही या वास्तूकडे साफ दुर्लक्ष केले होते. वीज, पाणी हेही दिले नसल्यामुळे गुरव कुटुंबाला तिथे शौचास जाण्याचीही सोय नव्हती. आज आसपासच्या इमारती व व्यवसाय यामुळे ही पवित्र वास्तू झाकली गेली आहे. या मंदिरातही दर श्रावण महिन्यात गर्दी होत असे.

अमृतेश्वर : मुठा नदीच्या जिमखान्याच्या बाजूला एका तीराला वृद्धेश्वर आहे तर दुसऱ्या तीराला शनिवार पेठेत अमृतेश्वर मंदीर आहे. ओंकारेश्वराच्या चित्राव शास्त्र्यांच्या नातेवाईकांनीच अमृतेश्वर मंदिराचा परिसर पानशेत पुरानंतरही चांगल्या स्थितीत जोपासला आहे. शंकराप्रमाणे राम, विष्णू आणि विठ्ठलाची मंदिरेही याच मंदिराच्या परिसरात आहेत. आसपासची चाळवजा इमारत व त्या पार्श्वभूमीवरचे हे जुने मंदीर म्हणजे एक अजब मिश्रण बनले आहे! अमृतेश्वराचे मूळ मालक रंगभट्ट चित्राव असून सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांनी त्याचा जीर्णोद्धार केला. याच चित्रावांचे 18 व्या शतकापूर्वीचे पुण्यातील श्रीराम मंदीर पेशव्यांच्या रोजनिशीत उल्लेखनीय ठरले आहे. पाणी, वीज आणि त्याच्या मदतीने होणारी स्वच्छता तसेच मंदिराची नित्यनेमाने होणारी पूजा व धार्मिक कार्यक्रम यामुळे अमृतेश्वर पुण्यातील भाविकांचे एक आवडते ठिकाण बनले आहे.

नातूंचे महादेव : पेशवाईत सरदार नातू हे एक मोठे प्रस्थ होते. त्यांची पुण्यातली जहागिरी मोठी होती. शहराच्या सांस्कृतिक विकासात भर घालताना त्यांनी देवळे व घरेही बांधली होती. शनिवार पेठेत एकाशेजारी एक असणारी तीन शंकराची देवळे हा त्याचा एक जिवंत पुरावा आहे! याच भागात नातूंच्या चाळीही होत्या. पहिल्या शंकर किंवा महादेवाचे गुरव विनायक वाईकर हे या कामासाठी साताऱ्याहून पुण्याला आले. त्यांच्या पिढ्या मंदिराच्या देखभाल स्वच्छतेची कामे पाहतात. त्या काळात नातू कुटुंबाकडून नैवेद्यासाठी दरमहा दहा रुपये मिळत. सध्या कुलकर्णी नावाचे मंदिराचे मालक व त्यांच्या पुढच्या पिढ्या हे काम पाहतात. दुसरा महादेव अनिल नातूंचा आहे. या मंदिराभोवती चुन्याने रंगवलेली भिंत होती. ऐन केळकर रस्त्यालगत असणाऱ्या या मंदिराच्या भिंतीवरील हत्तीवरून शिकार हे रंगीत चित्र ज्येष्ठ पुणेकरांच्या अजूनही स्मरणात असेल. पुढे ती भिंत रस्तारुंदीत पाडली गेली. त्याच्याजवळ एक  चारमजली कमर्शियल कॉम्प्लेक्स नव्याने उभे राहिले आहे!  त्यामुळे एकेकाळी नातूंचा महादेव म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर आता शोधावे लागते. काळाचा महिमा अगाध आहे. तीस वर्षांपूर्वी तेथे काम करणारे आगलावे हे गुरव जवळच्या बेकरीत काम करत होते! नातूंचे तिसरे मंदिर एकेकाळी सांस्कृतिक व सांगीतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नातूंच्या चाळीतील लक्ष्मी क्रीडा मंदिराच्या परिसरामुळे प्रसिद्ध होता. तिथेच हे मंदिर आहे. ज्येष्ठ रंगकर्मी कै. राजाभाऊ नातू या मंदिराची व्यवस्था पाहात असत. ही चाळ व हा परिसर जाऊन या परिसरात आता उंच सात इमारती झाल्या आहेत!

रामेश्वर : महात्मा फुले मंडईकडून शिवाजी रस्त्याला जाताना चौकात उजवीकडे कोपऱ्यावर सध्या ज्या इमारती आहेत, त्याऐवजी तिथे रामेश्वर मंदिराचा सभामंडप होता. या चौकासही रामेश्वर चौक असे आजही ओळखले जाते, ते या मंदिरामुळेच! या मंदिरापासून मंडईतील टिळक पुतळा हा भाग पूर्वी खासगीवाले बाग या नावाने परिचित होता. मंडईची आजची अवस्था बघितल्यावर 100-125 वर्षांपूर्वी इथे एक बाग होती यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. ही बाग पूर्वी मंदिराच्या उत्पन्नाचे साधन होती. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वी गोविंदपंत शिवराम लिमये यांनी हे मंदीर बांधले. तर बागेची व्यवस्था बाळाजीपंत खासगीवाले यांच्याकडे होती. खासगीवाले यांचे वंशज निळूभाऊ खासगीवाले यांनी त्यांच्या दप्तरातून मिळवली. मंडईसाठी ही जागा वापरली जाऊ नये म्हणून निळूभाऊंचे पणजोबा कृष्णाजी खासगीवाले सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. पण 1910 च्या सुमारास ती जागा त्यांच्या ताब्यातून गेली. तेव्हा या जागेची किंमत त्या काळातील बाजारमूल्यानुसार 63,941 रुपये होती! बाग हातून गेली तरी देवालय व जमिनीचा राहिलेला भाग त्यांनी ट्रस्ट स्थापन करून पुढे 1969 पासून ताब्यात ठेवला. शिवरात्र, दसरा आणि श्रावणी सोमवार हे इथले मोठे उत्सवी दिवस आहेत! त्यावेळी लघुरुद्र होतो आणि देवाला पोषाख घातला जातो.

सोमेश्वर : सोमवार पेठेतला तो सोमेश्वर. या मंदिराची स्थापना किमान 200 ते 250 वर्षांपूर्वी पेशवाईच्या उत्तरार्धात झाली असावी. मंदिराचे पुजारी किंवा गुरव लडकत कुटुंब असून त्यांच्या अनेक पिढ्या हे काम पाहतात. त्यांच्या सांगण्यानुसार 1775 मध्ये त्यांचे पूर्वज शिवाजीमाळी लडकत यांना याच भागातील एका शेतात ही एक पिंड सापडली. तिची प्राणप्रतिष्ठा याच भागात केली. कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला. या मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर संपूर्ण चांदीचे मखर बसवण्यात आले असून 1952 मध्ये सोमेश्वर मंदीर हा एक स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करण्यात आला. या ट्रस्टची व्यवस्था याच परिसरातील मारवाडी व्यापारी भक्तिभावाने करतात. या देवालयाच्या परिसरात पार्वती, गणपती, अन्नपूर्णा, दत्त, मारुती यांची देवळेही आहेत.

नागेश्वर : हे पुण्यातील सर्वांत जुने शिवालय समजले जाते. सुमारे 900 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांच्या हस्ते या देवळाचा कळस बसवण्यात आला! तसेच पुढे संत तुकाराम महाराजांची काही कीर्तनेही याच मंदिरात झाल्याचे सांगितले जाते. तीन चार दशकांपूर्वी गेल्या पिढीचे प्रसिद्ध चित्रकार डी. डी. रेगे या मंदिराची व्यवस्था पाहात होते. ते हयात असताना मला त्यांची भेट घेता आली. ते या मंदिराच्या आवारात राहात होते. त्यांच्या सांगण्यानुसार या मंदिराचा जीर्णोद्धार एकंदर तीन वेळा झाला. 1780 च्या सुमारास पेशवे यांचे सावकार आबा शेलूकर यांनी ही सुरुवात केली. मूळ मंदिराचा घाट हा मुस्लिम पद्धतीचा आहे. कारण विजापूरच्या आदिलशाहीला दृष्टांत झाला व त्यांतून या मंदिराची उभारणी झाली, अशी आख्यायिका रेगे यांनी तेव्हा सांगितली. पुढे 1974 मध्ये नागेश्वर मंदिर जीर्णोद्धार समिती स्थापन झाली व 24,000 रुपये खर्चून मंदिराची डागडुजी करण्यात आली.

देवदेवेश्वर आणि पुण्याची पर्वती : पेशवेकालीन वैभवाचे एक महत्त्वाचे चिन्ह मानले गेलेले पर्वती आज पुणेकरांचे फिरण्याचे व सकाळच्या व्यायामाचे ठिकाण आहे. 1960 नंतर या भागातील झोपडपट्टी वाढत इतर डोंगरांवरही पसरत गेली आहे. पूर्वी पर्वतीच्या पायथ्याशी आंबील ओढ्याच्या सीमेवर बाळाजी विश्वनाथ पेशवा यांनी नौकाविहारासाठी एकेकाळी एक कृत्रिम तलावही खोदला होता. पुढे नानासाहेब पेशवे यांनी 1749 मध्ये पर्वती संस्थानची स्थापना केली. भौगोलिकदृष्ट्या पर्वती टेकडी पुण्याच्या नैर्ऋत्येला असून तिची उंची समुद्रसपाटीपासून 640 तर पुण्यात ती 80.62 मीटर उंच आहे. त्यावर चढून जाण्यासाठी 108 पायऱ्या असून वर देवदेवेश्वराचे मंदिर, नंदी व आसपास प्रशस्त गच्ची आहे. या मंदिराच्या आवारात सूर्यनारायण, गणपती, देवी, पर्वती किंवा पर्वताई आणि विष्णूची चार देखणी देवालये आहेत. याशिवाय पर्वतीवर कार्तिकस्वामी आणि विठ्ठलाची देवळे आहेत. वर्षभर येथे भाविकांची ये-जा चालू असते.

देवदेवेश्वर संस्थानाकडे पर्वतीसह एकंदर 34 मंदिरांची व्यवस्था आहे. त्यात गणपती, राम,  मारुती, विठ्ठल आणि शंकराची देवालये आहेत. शंकराच्या देवळांमध्ये ओंकारेश्वर, नागेश्वर, हरिहरेश्वर, केदारेश्वर, रामेश्वर, सोमेश्वर, अमृतेश्वर, नीळकंठेश्वर आणि भांबुर्डा येथील वृद्धेश्वर तसेच कोथरूडचा मृत्युंजयेश्वर यांची जबाबदारी आहे. पुण्यातील 23 शिवालयांपैकी दहा शिवालयांची व्यवस्था देवदेवेश्वर संस्थानाकडे आहे.

पुण्यातील इतर देवांची माहितीही तितकीच  मनोरंजक आहे. त्यात गणेशमंदिरे 21, मारुतीची 40, विष्णूची 19, शंकराची 23, रामाची 16, देवींची 17, कृष्णाचे 1, बालाजीची 5 आणि इतर मंदिरे 33 आहेत. ही संख्या एकंदर 185 पर्यंत जाते. तर शहरात 18 ते 20 मशिदी आणि तितकीच चर्चेसही आहेत. याशिवाय पारशी देवालयेही आहेत.

मध्यंतरीच्या काळात पुण्यातील देवालयांची दुरवस्था आता काहीशी सुधारली आहे. पुणे हे जसे संस्कृती, शिक्षण व कलेचे माहेरघर आहे, तसेच या ठिकाणी देवालयेही खूप आहेत. सर्व धर्माची देवालये ही त्या समाजाचा एक आत्मा या रूपकात स्वत:चे स्थान निर्माण करत असतात. आज 21 व्या शतकातही या मनोभूमिकेत फारसा फरक पडलेला नाही. आपण देवाला मानत असो वा नसो पण देवालये ही शहराची एक आध्यात्मिक अस्मिता आहे यात शंका नाही. मग तो कालखंड कुठलाही असो!

लेखक – विवेक सबनीस 

इमेल – swatantranagrik@gmail.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *