भूले बिसरे गीत

गैरों पे करम अपनों पे सितम, ए जाने वफा ये जुल्म ना कर

रहने दे अभी थोडा सा भरम, ए जाने वफा ये जुल्म ना कर॥

 

हम चाहने वाले हैं तेरे, यूँ हम को जलाना ठीक नहीं ।

महफिल में तमाशा बन जाये, इस तरहा सताना ठीक नहीं ।

मर जायेंगे हम मिट जायेंगे हम, ए जाने वफा ये जुल्म ना कर ॥ 1 ॥

 

गैरों के थिरकते शाने पर, ये हाथ गवारा कैसे करे ।

हर बात गवारा है लेकिन, ये बात गवारा कैसे करे?

तुझको तेरी बेदर्दी की क़सम, ए जाने वफा ये जुल्म ना कर ॥ 2 ॥

 

हम भी थे तेरे मंजूरे नजर, जी चाहे तो अब इकरार ना कर ।

सौ तीर चला सीने पे मगर, बेगाऩों से मिल कर वार ना कर ।

बे मौत कहीं मर जाये ना हम, ए जाने वफा ये जुल्म ना कर ॥ 3 ॥

चित्रपट : आँखे (1968)

दिग्दर्शक : रामानंद सागर

गीत : साहिर लुधियानवी

संगीत : रवि

गायक : लता मंगेशकर

कलाकार : धर्मेन्द्र, माला सिन्हा, मेहमूदधुमाळ, जीवन, कुमकुम, नाझिर हुसेन, ललिता पवार .

 

अनेक वेळा – ‘ग़ैरों पे करम अपनों पे सीतम’ असा दुजाभाव कळत किंवा नकळत आपल्याकडून, आपल्याच माणसांवर केला जातो. जे आपल्यावर नितांत प्रेम करत असतात आणि आपल्या भल्यासाठी काही कठोर शब्द प्रसंगी वापरतात, ते लोक, त्यामुळे आपणास आवडेनासे होतात, त्यांना आपण टाळू लागतो, दूर ठेवतो आपल्या सुख दुःखात सहभागी करून घ्यायला हेतूपुरस्सरपणे विसरतो. त्या व्यक्तीची मात्र – ‘काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी..’ अशी गत होत असते.

इतर विषयांमध्ये माणूस थोडा उदारमतवादी असतोही, पण प्रेमामध्ये वाटेकरी? अहं! हे वंचनेचे शल्य, लहान थोर, स्त्री पुरुष, या सर्वांमध्ये कमी जास्त प्रमाणात असतेच. म्हणूनच, कोणतेही रिलेशनशिप जपण्यासाठी त्याची नज़ाकत आणि गोडी टिकवून ठेवण्याचे कसब आधी विकसित करता आले पाहिजे.

राष्ट्रहितासाठी हेरगिरी ही ‘आँखें’ या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना आहे. त्या अनुषंगाने येणारे, त्याग, साहस, हाल, शारीरिक दुखापती, हाणामारी, कटकारस्थानं आणि प्रीतीचा नाजुक धागा, हे सर्व कथानकातून गुंफत नेले आहे.

पण राष्ट्रप्रेम हे वैयक्तिक प्रेमापेक्षा श्रेष्ठ आहे नव्हे असले पाहिजे; हेही तरुण पिढीला पटवून दिले आहे.

नायिका माला सिन्हा, ही सुद्धा एक प्रोफेशनल हेरच असते. तिची नेमणूक आपल्या सरकारने, एका गुप्त कामगिरीसाठी केलेली असते. त्याच मिशनवर नायक धर्मेंद्रही हजर होतो. पण सुरुवातीला नायकाला कल्पना नसते की आपण दोघेही एकाच देशाच्या, एकाच मिशनवर काम करतो आहोत याची.

नायिकेला मात्र त्याच्या संपूर्ण कार्यक्रमाची पूर्वकल्पना असते किंबहुना, त्याच्याकडून, परदेशात, यत्किंचितही चूक घडू नये म्हणूनच ती त्याची काळजी घेत असते. त्याचा पाठलाग केल्यासारखी त्याच्या मागावरच असते.

एकाच देशाच्या तरुण स्त्री-पुरुषांनी, हेरगिरी करत असताना एकमेकांशी भावबंध ठेवायचे नसतात आणि ठेवलेच तर ते स्वत:च्या स्वार्थासाठी कधीही गैर फायदा घ्यायचा किंवा द्यायचे नसतो. हीच खरी कसोटी हेरगिरी करणाऱ्या बहादुरांची असते, त्यांना आपला संयम ढाळून चालतच नाही.

अर्थात्, आपल्याला प्रश्न पडणे साहजिकच आहे की ‘जेम्स बॉण्ड तरुणींना आपल्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ पाडून त्यांच्याकडून टॉप सिक्रेटस् काढून देशाला तारतो म्हणून त्याला सर्व क्षम्य आहे का? आहे बुवा असे, पण ते खरे नाही! असो.

त्याच वेळी, शत्रुपक्षाची दुसरी महिला हेर, आपल्या नायकाला जाळ्यात पकडायला बघत असते. एका धुंद संध्याकाळी मदिरा आणि मदिराक्षींच्या गराड्यात हा वाहवून तर जाणार नाही ना? यासाठी नायिका जो प्रेमालापाचा प्रपंच मांडते, ते हे गीत –

कवी साहिर यांच्या गीतांमध्ये जसे काव्य असते, तसेच मानसशास्त्रीय कार्यकारणभावही खोलवर रुजलेले असतात. त्या शब्दांमधून जेवढा भावनेचा सच्चेपणा उजळत असतो तेवढेच अनुभवाने आलेले परिपक्व सुजाणतेपणही प्रतिबिंबित झालेले आपल्याला दिसते ते असे –

हे सख्या, तू परक्यांना आपले मानतोस, त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतोस, या गोष्टीला माझी काही हरकत नाही, पण आपल्या जवळच्या माणसांवर असा हा अन्याय कसा बरं करतोस? मला, खोट्या का असेना पण, गोड भ्रमात थोडा वेळ तरी राहू दे ना, की, तू माझा आहेस! कधी कधी अज्ञानातही माणूस सुख मानत असतो स्वत:लाच फसवत राहतो. तो ‘बिन पिये ही झूमने लगता है’ स्वत: मध्ये हरवून बसण्यात त्याला सुख वाटू लागते.

कधी कधी अज्ञानातही सुख वाटते रे सख्या! बघ ना, माझी कशी कोंडी होते आहे ती. इकडे मी तुझ्यावर जीव ओवाळून टाकते आहे, तुझ्यासाठी पागल झाले आहे पण तू मात्र हे सगळ गुपित जाणत असूनही नामानिराळा राहतोस, काहीच माहिती नसल्यासारखे माझ्याकडे दुर्लक्ष करतोस, हे बरे नव्हे! माझी भर सभेमध्ये किती फजिती तू करतो आहेस हे लक्षात घेशील तर बरे होईल.

माणसाने मस्करी करावी पण त्यालाही काही मर्यादा हवीच ना. असा जीवघेणा खेळ कशासाठी? माझा जीव तुझ्यावर जडला आहे याची ही सजा असेल तर तर ठीक आहे पण आता ती फार झाली.

तू एवढा कसा कठोर होऊ शकतोस, माया तर सोडच पण भूतदया सुद्धा तुझ्यामध्ये शिल्लक नाही का? तुझे सगळे अपराध मी पचवू शकते पण पुन्हा पुन्हा परक्यांशी सलगी करून मला घायाळ करण्याचा तुझा जो अपराध आहे ना तो सहन करण्यापलीकडे आहे. असा कठोरपणा कुठून भरलाय तुझ्या ठायी. तुला तुझ्या या रूक्षपणाची, कठोरपणाची आण आहे पण हे असे शस्त्राविना वार करून माझ्यावर होणारे जुलूम थांबव कसे ते.

का रे बाबा, काल परवापर्यंत तरी बरा होतास की, असे दुसऱ्यांच्या खांद्यांवर बंदुका ठेवून अचानक का वार करतो आहेस, माझा अपराध तरी काय आहे? या जीवघेण्या छळापायी मी हकनाक जीवानिशी जाईन तेव्हाच तुझे डोळे उघडणार आहेत का? सांभाळ आपल्या वेडेपणाला.

मनुष्य स्वभावाची काय गंमत आहे नाही? जो दूर लोटतो त्याच्यासाठीच जास्त आकर्षण अधिक तीव्र होते.

नायिका, वारंवार आपल्या रेशमी भावबंधांची त्याला आठवण देते – अरे, तुला तर मी चांगलीच आवडले होते, असा माझा भ्रम होता बहुधा! पण मी तर अस्सेच गृहित धरून चालले होते, ठीक आहे, तुला हे मान्य करावेसे वाटले नाही तरी हरकत नाही पण तू माझ्याशी असा तुटक वागू नकोस, असा दूर जाऊ नकोस. नाहीतर माझे मरण मला जवळ करेल आणि दोष तुला लागेल!

प्रत्येक अंतऱ्यातून नायिकेच्या भावनिक आंदोलनांच्या लाटा आपल्यापर्यंत पोचल्या आहेत. कधी राग, कधी अनुराग, अविश्वास तर कधी संपूर्ण एकतानता. ही साहिरजींच्या शब्दांची किमया!

गीतकार साहिर आणि संगीतकार रवी या जोडीने ज्या निर्मिती केल्या आहेत, त्या अप्रतिमच आहेत. रवींनी या गीताच्या सुरुवातीला थोडे अरेबियन बाजाची वाद्ये वाजवून चांगलाच परिणाम साधला आहे.

लताजींच्या स्वरांची पोत तर गीताचा लहेज़ा जरतारी तरीही मुलायम, कोमल करून गेली आहे. ही स्वरांची जादू नव्हे गारूड पिढ्यान्पिढ्या वाढतच आहे.

प्रेमाचे कितीही आणि कोणतेही प्रकार असले तरी तेच खरे प्रेम असू शकते जे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच गुणवत्तेचे राहू शकते. जसे की एखाद्या जास्त किमतीच्या नोटेचे दोन किंवा अनेक तुकडे केले तर तिची किंमत शून्य होते. पण शुद्ध सोन्याचे कितीही भाग/तुकडे केले तरी, त्याच्या प्रत्येक कणाचे गुणधर्म एकसारखेच राहू शकतात. म्हणूनच कोणत्याही गोष्टीला बावनकशी सोन्याची कसोटी लावली जाते ती याचसाठी!

‘प्रेमाला उपमा नाही’ – हे जितके खरे आहे तेवढेच सच्चे प्रेम असणेही महत्त्वाचे आहे.

अस्सा खरा, निर्मळ आणि सच्चा स्नेह लाभणे ही आयुष्याची फार मोठी दौलत असते, म्हणूनच आपली नायिका आपल्या सख्याला विनवते आहे ‘ग़ैरों पे करम अपनों पे सितम’ – नको करू!

कुणीही करू नयेत!

लेखिका – सौ. रंजना पाटील
इमेल – rajana.patil@strapsandbelts.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *