नवाझ शरीफ यांच्या नंतरचा पाकिस्तान

मागच्या महिन्यांत पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोषी मानत पायउतार होण्याचा हुकूम दिला. त्यानुसार नवाझ शरीफ यांना राजीनामा द्यावा लागला. सुरुवातीला असे वाटत होते की, ते त्यांचा धाकटा भाऊ व पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदी बसवतील. दक्षिण आशियातील लोकशाही परंपरेनुसार राजकीय सत्ता एखाद्या घराण्याच्या मालकीची समजली जाते. त्या परंपरेनुसार शरीफ आपले बंधू शाहबाज शरीफ यांच्या हाती सूत्रं देतील अशी अपेक्षा असतांनाच नवाझ शरीफ यांनी शहीद अब्बासी यांना पंतप्रधानपदी बसवले. तेव्हा सुरुवातीला असेच वातावरण होते की, ही तात्पुरती व्यवस्था आहे व लवकरच शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली जाईल. आता मात्र असे दिसते की, शहीद अब्बासीच नवाझ शरीफ यांच्यानंतर पुढच्या वर्षी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत पंतप्रधानपदी असतील.

या बदलामागे पाकिस्तानातील घराणेशाहीतील ताणतणाव आहेत. शहबाझ शरीफ यांची पत्नी  तेहमिना दुराणी यांचे व नवाझ शरीफ यांचे मुळीच पटत नाही. जेव्हा मागच्या वर्षी पनामा पेपर्सद्वारे नवाझ शरीफ यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत होती, तेव्हा दुराणी यांनी एका ट्वीटद्वारे त्यांना  देशासमोर सर्व वस्तुस्थिती मांडण्याचे आवाहन केले होते. या दुराणी तशा वादग्रस्त व्यक्ती आहेत. काही वर्षांपूर्वी म्हणजे जून 1991 मध्ये त्यांनी ‘माय फ्युडल लॉर्ड’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले होते. हे पुस्तक तेव्हा फार गाजले होते. यात दुराणी यांनी स्वतः च्या वैवाहिक जीवनाबद्दल अतिशय मोकळपणाने लिहिले होते. यात त्यांचे दुसरे पती गुलाम मुस्तफा खार यांच्याबद्दल लिहिले होते. दुराणी यांचे म्हणणे होते की, पाकिस्तानसारख्या देशात स्त्रियांना काहीही स्वातंत्र्य नसते. कारण येथे इस्लामचा फार चुकीचा अर्थ लावला आहे. त्यानंतर दुराणी यांनी पाच लग्नं केली. शाहबाज शरीफ हे त्यांचे पाचवे पती आहेत. हा विवाह होऊ नये म्हणून नवाझ शरीफ यांनी जंगजंग पछाडले होते. लग्न झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी दुराणींना स्वतःच्या घरात येऊ दिले नाही. दुराणी यांना जबरदस्त राजकीय महत्त्वाकांक्षा आहे.

दक्षिण आशियातील राजकीय संस्कृतीनुसार नवाझ शरीफ यांनी लाहोर शहरात मोठी रॅली आयोजित केली होती. दक्षिण आशियातील राजकारणी वर्गाला जेव्हा न्यायपालिका दणका देते तेव्हा ते जनतेच्या कोर्टात दाखल होतात व ‘जनताच आमचा न्याय करेल’ अशी सोयीस्कर भूमिका घेतात. त्यानुसार शरीफ यांनीसुद्धा पंजाब प्रांताची राजधानी लाहोर शहरात रॅली आयोजित केली होती. याद्वारे त्यांना एका दगडात दोन पक्षी मारायचे होते. एक म्हणजे माझ्या मागे किती जनता आहे हे राजकीय विरोधकांना दाखवून देणे व दुसरे म्हणजे एवढी मोठी रॅली भरवून मुख्यमंत्रिपदी असलेल्या आपल्या धाकट्या भावासमोर रॅलीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ढकलणे. रॅलीदरम्यान जर काही गडबड झाली असती तर त्याचे खापर नवाझ शरीफ यांनी मुख्यमंत्री शाहबाज शरीफच्या डोक्यावर फोडले असते.

नवाझ शरीफ यांचे राजकीय विरोधक व माजी क्रिकेटपटू इमरान खान यांनी शरीफ यांच्या रॅलीची टिंगल केली आहे. इमरान खान यांच्या मते शरीफ यांची रॅली म्हणजे ‘मी केलेल्या भ्रष्टाचाराला मान्यता द्या’ अशी मागणी करणारी रॅली होती. आजच्या पाकिस्तानातील राजकारणी वर्ग एकमेकांची उणीदुणी काढण्यात गर्क आहे. पुढच्या वर्षी पाकिस्तानात लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानात गेल्या 70 वर्षांपैकी निम्मा काळ लष्करशाही होती. त्या देशात आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. खुद्द नवाझ शरीफ तीनवेळा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते; पण एकदाही त्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

सध्या तर पाकिस्तानात एवढे राजकीय अस्थैर्य आहे की पुढच्या वर्षीचे सोडून द्या, येत्या सहा महिन्यांत तेथे काय होईल याचासुद्धा अंदाज बांधता येत नाही. भारताच्या दुर्दैवाने असा अण्वस्त्रधारी देश केवळ आपला शेजारीच नाही तर आपल्याला उघडपणे शत्रू समजत आलेला आहे. म्हणूनच पाकिस्तानात होत असलेल्या उलथापालथींचे आपल्यावर काय परिणाम होतील, याचा विचार करणे गरजेचे ठरते.

या चर्चेच्या सुरुवातीलाच एक बाब स्पष्ट केली पाहिजे की, पाकिस्तानात लष्करशाही असो व लोकशाही, ‘भारतविरोध’ फारसा कमी होत नाही. त्या देशाच्या डीएन्एमध्येच ‘भारतविरोध’ मुरला आहे. फक्त यात तीव्रतेचा मुद्दा आहे जी कमीजास्त असू शकते. शिवाय असेही दाखवता येते की जर पाकिस्तानात लोकशाही असेल तर भारत-पाकिस्तान संबंध बरे असतात व घुसखोरी कमी असते. लष्करशाही असेल तर सीमेवर सतत ताणतणाव असतो व घुसखोरी जास्त होत असते. यातील तर्कशास्त्र अगदी साधे आहे. लष्कराला पाकिस्तानी जनतेला सतत जाणवून द्यायचे असते की आमच्या हातात सत्ता आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. या भावनेसाठी त्यांना सतत देशात युद्धखोर वातावरण ठेवावे लागते.

याचा अर्थ नवाझ शरीफ लष्कराला दुखवून काही महत्त्वाचे निर्णय घेत होते किंवा घेऊ शकत होते, असा अर्थातच नाही. तरीही लष्कराला युद्धखोर वातावरण निर्माण करता येत नव्हते हेही तितकेच खरे. आता सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांना पदमुक्त केले आहेत. ही परिस्थिती लष्कराच्या पथ्यावर पडली आहे. लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बज्वा यांनी स्वतःचा धाक निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. याचे उदाहरण म्हणून भारतीय नागरिक कुलभूषण जाधवला हेरगिरी केल्याबद्दल झालेली अटक व नंतर त्याला लष्करी न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा, यांचे देता येईल. कुलभूषण जाधव प्रकरण चर्चेत होते तेव्हासुद्धा हे स्पष्ट दिसत होते की नवाझ शरीफ सरकारला हे काहीही मान्य नव्हते. पण ते बोलू शकत नव्हते.

एका बातमीनुसार ऑक्टोबर 2016 मध्ये उच्च लष्करी अधिकारी व पाकिस्तानातील निवडक मंत्री यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी लष्कराला चांगलेच धारेवर धरले व तुमच्या कारवायांमुळे देशाची जागतिक पातळीवर सतत नाचक्की होत असते असे सुनावले. तेव्हापासून लष्कर व मुलकी सरकार यांच्यातील संबंध ताणलेलेच आहेत. याच प्रकारे मुलकी सरकार लष्कराला डोईजड होत होते. दुर्दैवाने तेवढ्यात पनामा पेपर्स उघडकीस आले व सर्व समीकरणेच बदलली. आता तर शरीफ यांनाच पायउतार व्हावे लागले आहे.

यातील विसंगतीकडेसुद्धा बोट दाखवले पाहिजे. नवाझ शरीफ यांचे नेतृत्व लष्कराच्या आशीर्वादाने समोर आले होते. शरीफ तीनदा पाकिस्तानचे पंतप्रधान होते त्यातील दोनवेळा ते लष्कराच्या मदतीने या पदावर विराजमान झाले होते. मात्र तिसऱ्यांदा म्हणजे 2013 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाले व ते पंतप्रधान झाले. याचा सरळ अर्थ असा की, तिसऱ्यांदा ते लष्कराचे उपकृत म्हणून पंतप्रधान झाले नव्हते. म्हणूनच ते लष्कराला प्रसंगी चार शब्द ऐकवू शकत होते. नेमके याच कारणासाठी लष्कर त्यांना पाण्यात पाहत होते. पनामा पेपर्स उघडकीस आल्यावर लष्कराचे काम अगदीच सोपे झाले.

शरीफ यांनी धीम्या गतीने भारत-पाक संबंध सुधारण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. त्यांनी 2017 साली होळीच्या दिवशी पाकिस्तानातील हिंदू मंडळींशी संवाद साधला होता. त्यांच्या कारकीर्दीत घुसखोरी बरीच कमी झाली होती. भारताच्या दृष्टीने पाकिस्तानात लोकशाही शासन असणे केव्हाही चांगले. पण आपल्या दुर्दैवाने तेथील राजकारणी वर्ग एकमेकांना एवढा पाण्यात पाहतो की दुसऱ्या राजकीय पक्षावर/ नेत्यांवर कुरघोडी करण्यासाठी एखादा पक्ष लष्कराशी छुपी हातमिळवणी करायला तयार असतो व करत असतोसुद्धा. इमरान खान यांनी नवाझ शरीफ यांच्या विरोधात काढलेल्या अनेक मोर्चांना लष्कराने सर्व प्रकारची मदत केली होती असे उघड बोलले जात आहे. यात आपण लोकशाही शासनप्रणालीचा गळा दाबत आहोत एवढेसुद्धा भान नसते. हेच प्रकार खुद्द नवाझ शरीफ यांनीसुद्धा सुरुवातीला दोनदा केलेले आहेतच. थोडक्यात म्हणजे पाकिस्तानातील राजकारणी वर्गाला जेव्हा त्यांच्या हातातील सत्ता जातांना दिसते तेव्हाच त्यांना लोकशाहीची आठवण होते. यातील मतलबी राजकारण जनतेच्या लक्षात येत नाही असे त्यांना का वाटत असेल?

यामुळे पाकिस्तानात कधी लोकशाही तर लष्करशाही असते. यात सामान्य जनतेच्या निष्कारण बळी जातो. पण नेहमीप्रमाणे ‘लक्षात कोण घेतो?’

लेखक – अविनाश कोल्हे
संपर्क – swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *