‘तीन साल बेमिसाल, पण तरीही’

16 मे, 2014 रोजी भारताच्या राजकीय इतिहासामध्ये एक नवीन आणि सर्वार्थाने वेगळा अध्याय लिहिला गेला. समस्त राजकीय तज्ज्ञांना आणि पत्रपंडितांना बुचकळ्यात टाकून तब्बल तीस वर्षांनी भारतात बहुमताचे सरकार आणि ते सुद्धा भारतीय जनता पक्षाचे अस्तित्वात आले. 2013 च्या उत्तरार्धा- मध्ये एके दिवशी भाजपा मुख्यालयात झालेल्या एका दैनंदिन पत्रकारपरिषदेमध्ये पक्ष प्रवक्ते शाहनवाझ हुसैन जेव्हा म्हणाले, ‘आम्ही ‘मिशन 272 +’ आखलेले आहे आणि त्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करू;’ त्यावेळी देशातील तमाम राजकारण्यांना, या क्षेत्रातील धुरीणांना, मोठमोठ्या पत्रकारांना तसेच माझ्यासारख्या अतिसामान्य जनांना या विधानाचे खूप कुतूहल वाटले. तसेच त्या विषयापेक्षा या उद्गारामागील आत्मविश्वासाचे आश्चर्य वाटले होते. अर्थातच एका राजकीय पक्षासाठी ही एक खूप दिलासाजनक बाब होती. पुढे कालांतराने म्हणजेच 16 मे, 2014 रोजी हा आत्मविश्वास आणि दिलासा जेव्हा वास्तवात उतरला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

आज तब्बल तीन वर्षांनंतर, सरकारला मिळालेल्या अवधीचा अर्धा कालावधी उलटून गेल्यानंतर ‘हाफ वे मार्क’नंतर या तीन वर्षांचा साधकबाधक आढावा घेतल्यास, सरकारी कामकाजाच्या आणि ध्येयधोरणाच्या दृष्टीने, प्रगतीच्या वाटेवर आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे नीतिमत्तेच्या अनुषंगाने एक उज्ज्वल ठरत चाललेला कालखंड नजरेसमोर येतोय. राजकारणाची वेगळी वाट चोखाळणाऱ्या, कर्मठ आणि संन्यस्तवृत्तीच्या नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदी येण्याने देशाला ‘अच्छे दिन’ आलेत यात वादच नाही. या विधानाशी जे असहमत असतील, ते नक्कीच एखादा ‘सुपरमॅन’ किंवा ‘सुपर नॅचरल पॉवर’ असणारी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी आरूढ होण्याची वाट पहात असतील.

16 मे 2014 रोजी आलेल्या निकालानंतर तब्बल दहा दिवसांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ पदारूढ झालेत. या दहा दिवसांचे दरम्यान सुरुवातीच्या कामाकाजावर विषयपत्रिकेवर तसेच आचरणपद्धतीवर विचारमंथन झाले. त्यावेळी 64 वर्षीय नरेंद्र मोदींनी पाऊणशे वयोमान गाठलेल्या राजकीय धुरीणांना प्रत्यक्ष सरकारमधील सहभागापासून लांब ठेवण्याच्या दूरगामी आणि कठोर निर्णय घेतला. अशाच आचरणप्रणालीच्या अनुषंगाने ‘एका घरात एक पद’ या तत्त्वानुसार राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या स्वतःच्या मुलासाठी मंत्रिपरिषदेत स्थान मिळवण्याचा आग्रह नाकारला गेला वरिष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा यांना सुद्धा वयाच्या कारणाने मंत्रिमंडळात स्थान नाकारले गेले. त्याऐवजी कालांतराने त्यांचे पुत्र जयंत सिन्हा यांची मंत्रिपरिषदेवर वर्णी लागली. मोदी सरकार केंद्रामध्ये पदारूढ झाल्यापासून हा लेख प्रकाशित होईपर्यंत तब्बल 1111 दिवसांचा कालावधी लोटलेला असेल. यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी नमूद करण्यायोग्य असण्याने नरेंद्र मोदींनी अनेक दिग्गजांना आणि वरिष्ठांना मागे टाकले. फक्त पाचच वर्षांपूर्वी दुरान्वयानेही जी व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता सुद्धा कुणी व्यक्त केली नव्हती, त्या व्यक्तीने आज माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, व्ही. पी. सिंग, एच्. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल यांच्या बरोबरच चौधरी चरणसिंग, चंद्रशेखर यांच्या कार्यकाळापेक्षा जास्त कालावधी पंतप्रधानपदी व्यतीत केला आहे. (त्यामध्ये लालबहादूर शास्त्रीजींचे नाव सुद्धा समाविष्ट होऊ शकते. परंतु दुर्दैवाने शास्त्रीजींचे पंतप्रधानपद जाणे हे त्यांच्या अचानकपणे झालेल्या मृत्यूमुळे घडले.)

पंतप्रधान मोदींचा कालखंड अनेक अर्थांनी आणि अनेक घटनांनी आगळावेगळा ठरवला जाऊ शकतो. वानगीदाखल सुरुवातीच्या शंभर दिवसांमध्ये घडलेल्या तीन घटनांचा येथे उल्लेख करतोय. तेव्हा पर्यावरण खात्याचा स्वतंत्र अधिभार असणारे राज्यमंत्री प्रकाश जावडेकर परदेश प्रवासाला म्हणून निघालेले होते. त्यावेळी त्यांनी पारंपरिक आणि औपचारिक पोशाख (म्हणजेच कुर्ता-पायजमा) परिधान केलेला नसल्याने विमानतळावरून परत बोलावले गेले. दुसरी घटना ऊर्जामंत्री पीयुष गोयल यांचे संदर्भातील आहे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ऊर्जामंत्री रात्रीकालीन भोजनाच्या निमित्ताने एका बैठकीसाठीच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवेश करण्याच्या बेतात असतानाच, यावर पी. एम्. ओ. (पंतप्रधान कार्यालय) कडून आक्षेप नोंदविण्यात आला. तिसरे उदाहरण मोदी सरकारमधील दोन क्रमांकाचे  समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांचेबद्दलचे आहे. गृहमंत्रालयाशी संबंधित काही प्रकरणांमध्ये, सुरुवातीला गृहमंत्र्यांच्या पुत्राचा पंकजसिंह यांचा फायली हाताळण्यातील सहभाग लक्षात आल्याने पी.एम्.ओ.ने त्यावर विरोध दर्शवला. या सर्वच उदाहरणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची कर्मठ आणि आदर्श कार्यशैली लक्षात आल्याशिवाय रहात नाही. केंद्रामध्ये मोदी सरकार पदारूढ झाल्यापासून देशात झालेल्या अनेक विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड यश मिळाले. अपवाद फक्त बिहार आणि दिल्ली विधानसभांचा. नुकत्याच पार पडलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने तीन चतुर्थांश बहुमत मिळवून नेत्रदीपक यश प्राप्त केलेय. हा विजय बऱ्याच अर्थाने विशेषात्मक ठरतो. यामुळे देशातील सर्वात मोठ्या तसेच राजकीयदृष्ट्या सजग आणि संवेदनशील राज्यात भाजपची सत्ता 2022 पर्यंत असणार आहे. देशातील 20 कोटींच्या वर जनता असणाऱ्या राज्यावर भाजपचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नियंत्रण असणार आहे.

या विजयानंतर सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान ‘जीत के बाद हमें और नम्र होना पडेगा’, यात त्यांचे व्यक्तित्व दर्शवते. या वर्षी बारा मार्च रोजी पार पडलेल्या भाजपा सांसदीय पक्षाच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी सदस्यांना वही आणि पेन काढण्याची आदेशवजा सूचना केली. मागे एकदा संसदेचे अधिवेशन सुरू असताना अचानकपणे ते संसदेच्या उपाहारगृहामध्ये दुपारच्या भोजनासाठी दाखल झाले आणि इतर सदस्यांसमवेत दैनंदिन जेवण केले. मागील एप्रिल महिन्यात भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे बरोबरच्या भेटीमध्ये त्यांचे तोंडून ‘जो खेले, वहीं खिले’ असे उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडलेत. याच वर्षी पार पडलेल्या ‘इंडिया टुडे’ कॉन्फ्लेक्टमध्ये महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नरेंद्र मोदींबद्दल काढलेले उद्गार यथार्थतेची जाणीव करून देतात. त्यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, ते एक मोठे संवादक आहेत. कुठलाही विषय शीघ्र गतीने शिकण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. दस्तूरखुद्द राष्ट्रपतींनी त्यांच्या आर्थिक धोरणांची आणि परराष्ट्र धोरणाची तारीफ केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखीन कित्येक अजोड पैलू आहेत. पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी देशबांधवांना आकाशवाणीद्वारे संबोधित करण्याचा पायंडा पाडला. महिन्यातून एकदा ते आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी दिलखुलास संवाद साधतात. अशाच एका ‘मन की बात’ द्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा दबाव (परीक्षेच्या तोंडावर) न घेण्याचा सल्ला दिला. याबरोबरच उत्तमोत्तम सवयी अंगी बाणवून चांगला नागरिक बनण्याचे आवाहन केले. पूर्वी अशाच एका ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये त्यांनी वाचनाविषयी जाणीव घडवण्याचा प्रयत्न केला. या सर्वांमुळे त्यांच्यावरील स्वामी विवेकानंदांचा पगडा लक्षात येतो.

आजवरच्या कुठल्याही पंतप्रधानांनी परदेशस्थ भारतीयांना नरेंद्र मोदींसारखी साद घातलेली नाही. पंतप्रधान मोदींनी परदेशस्थ भारतीयांना संबोधित करण्याचा आणि यथायोग्य आवाहन करण्याचा, आपल्या परदेशभेटींमध्ये पायंडाच पाडलाय. जपानमध्ये अशाच एका समारंभामध्ये त्यांनी प्रत्येक मूल भारतीय नागरिकाला, इतर 5 परदेशी नागरिकांना भारतभेटीवर येण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले, ज्यामुळे भारताची प्रतिमा उंचावेल आणि आपल्या पर्यटकसंख्येमध्ये वाढ होईल. 25 जानेवारी 2015 रोजी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे बरोबर हैदराबाद हाऊसच्या हिरवळीवर भेट आटोपल्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेमध्ये त्यांना ‘बराक’ असेही एकेरी नावाने संबोधन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग आहे, यात वादच नाही.

त्याचमुळे डावे विचारवंत आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सुद्धा पंतप्रधान मोदींबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणतात की, ‘आपण  मोदींच्या कालखंडामध्ये वावरतो. यामुळे गौरवान्वित असायला हवे.’

लेखक – प्रितिश पंडित
इमेल – pritishpandit@gmail.com

One thought on “‘तीन साल बेमिसाल, पण तरीही’

  • August 11, 2017 at 9:59 am
    Permalink

    Khupch chhan saptahik aahe aaple..
    Tumchya saptahikala mazyakdun shubhechha

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *