कोणाचे काय चुकले?

कुठल्याही खेळाचे काही नियम असतात. त्यात दोन बाजू असल्या तर एका बाजूला दुसऱ्या बाजूची कोंडी करून विजय संपादन करायचा असतो. त्यात मग परस्परांवर कुरघोडी केली जात असते. ज्याची फलंदाजी चालू असते त्याला अंगावर येणारा चेंडू अडवून किंवा फटकारून धावा जमवायच्या असतात. तर क्षेत्ररक्षण वा गोलंदाजी करणाऱ्या बाजूला समोरच्या फलंदाजाची कोंडी करून बळी मिळवायचा असतो. त्याचेही अनेक प्रकार असतात. झेल घेऊन वा फलंदाजाला उंच फटका मारण्यास भाग पाडूनही त्याचा बळी घेता येत असतो. कधी चकवणारा चेंडू टाकूनही बळी मिळतो. साहजिकच भारतात जे राजकारण चालू आहे, त्यात मोदी व मोदीविरोधी अशा दोन बाजू आता तयार झालेल्या आहेत. त्यात प्रत्येक बाजू दुसऱ्यावर कुरघोडी करून जिंकण्याचे डावपेच खेळणार यात शंका नाही. नितीशना एन्‌डीएमधून फोडण्याचे डावपेच चार वर्षांपूर्वी पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्ष व जाणत्यांनी खेळले असतील, तर तीच संधी तेव्हा किंवा नंतरही भाजपा व मोदींनाही असते. त्याला लबाडी वा गद्दारी असले नाव देण्यात अर्थ नाही. नितीशकुमार यांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीत मोदींना पाणी पाजण्याचा प्रयोग यशस्वी केला. तेव्हापासून त्यांच्याकडे भावी राजकारणात मोदींचे स्पर्धक म्हणून बघितले गेले होते. पण जसजसे दिवस गेले तसतसा त्यांचा भ्रमनिरास करण्यापेक्षा विरोधकांनी काहीही केले नाही. ताज्या प्रकरणात विरोधकांना पराभूत व्हावे लागले असले, तरी त्याला भाजपा वा मोदींचा विजय मानता येत नाही. तो त्यांच्या विरोधकांनी ओढवून आणलेला पराभव आहे. मग समोर उभा असलेला प्रतिस्पर्धी जिंकलेला दिसणे स्वाभाविक आहे. पण विरोधकांचा पराभव हे निखळ सत्य आहे. कारण त्यांनी नितीश भाजपाच्या गळाला लागणार असे स्पष्ट दिसत असतानाही कोणतीही हालचाल केली नाही. हा मोदींचा दोष कसा मानता येईल?

आखूड टप्प्याचा चेंडू गोलंदाजाने टाकलेला असतो, तेव्हा त्याकडे काणाडोळा करण्यात शहाणपणा असतो. उलट त्याच षट्कार मारण्यात झेल जाण्याचा धोका असतो. तसा बळी गेला मग गोलंदाजावर किंवा झेल घेणाऱ्यावर दोषारोप करण्यात अर्थ नसतो. इथे लालूंच्या कुटुंबावर विविध आरोप झालेले होते आणि त्याविषयी लालूंनी खुलासा करावा, इतकीच मागणी नितीशनी केलेली होती. त्याविषयी स्पष्टीकरण देतानाही नितीशनी तेजस्वीचा राजीनामा मागितला नव्हता. पण जनतेला स्पष्टीकरण द्यावे, इतकीच मागणी केली होती. अन्यथा आपल्याला दोषारोप असलेल्या व्यक्तीसोबत सरकार चालवणे अशक्य असल्याचा इशारा दिलेला होता. या निमित्ताने लालूंची भेट घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली होती व राहुल सोनियांनाही कल्पना देण्यात आली होती. आपणच राजीनामा देऊन सरकार निकालात काढू; असे मात्र नितीश कोणाला केव्हाही म्हणालेले नव्हते. पण तेजस्वीसह सरकारमध्ये बसणे अशक्य असल्याची स्पष्ट कल्पना दिलेली होती. त्यातले गांभीर्य लालू वा राहुलना ओळखता आले नसेल, तर तो नितीशचा दोष नाही की त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या भाजपाचा गुन्हा म्हणता येणार नाही. कुठलाही खेळाडू आपले डाव आणि पेच जगासमोर उघडपणे मांडत नसतो. काही हुकुमाचे पत्ते आपल्या खिशात लपवूनच ठेवत असतो. नितीशनीही आपला राजीनाम्याचा पत्ता तसाच गुलदस्त्यात ठेवलेला होता. आपली मागणी पदरात पडणार नसेल तर सरकार बुडवण्याची खेळी त्यांनी कायम गोपनीय राखलेली होती. अशा वेळी नितीशना कडेलोटावर नेऊन उभे करण्याची गरज नव्हती. उलट तशा निर्णयाप्रत ते जाणार नाहीत, याची सज्जता महागठबंधन चालवणाऱ्यांनीच घ्यायला हवी होती. पण चाणक्य व चंद्रगुप्त दोन्ही आपणच असलेल्यांच्या मेंदूत साध्या गोष्टी शिरत नसतात आणि त्यांचा कपाळमोक्ष अपरिहार्य असतो.

आज लालू किंवा राहुल म्हणतात की, आधीपासून नितीशनी भाजपाशी सौदा केलेला होता. त्याचा आपल्याला संशय होता. त्यात तथ्य असेल, तर नितीशचा तोच सौदा निष्फळ करण्याची खेळी राहुल वा लालू खेळू शकत होते. तेजस्वीने राजीनामा फेकला असता व अन्य कुणाला उपमुख्यमंत्री म्हणून लालूंनी आपल्या सहकार्याला पुढे केले असते, तर नितीशना राजीनामा द्यायला जागाच उरली नसती. त्यांचा
एन्‌डीएत जाण्याचा मार्गच बंद झाला असता व निमूटपणे  महागठबंधनात जखडून पडायची वेळ आली असती. तो भले लालूंचा व्यक्तिगत विजय ठरला नसता. पण त्यात भाजपा नितीशच्या सौदेबाजीचे नाक नक्कीच कापले गेले असते. कारण एका बिहारच्या सत्तेत भागीदारी मिळवणे, हे भाजपाचे वा मोदींचे उद्दिष्ट असू शकत नाही. त्यांचा मतलब भलताच मोठा होता. नितीशनी महागठबंधनातून बाहेर पडणे व एनडीएमध्ये सहभागी होण्याला प्राधान्य होते. तसे झाल्यास 2019 च्या विरोधकांच्या मोर्चेबांधणीला सुरूंग लागणार होता. म्हणूनच नुसते नितीशना फोडणे वा तेजस्वीचा राजीनामा मिळवणे, असा हेतूच नव्हता. सहाजिकच तेजस्वीने राजीनामा दिला असता, तर नितीशना एनडीएत जाण्याचा मार्ग बंद झाला असता. दुसराही एक उपाय होता. लालूंच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे देऊन बाहेरून नितीशच्या सरकारचा पाठिंबा चालू ठेवला असता, तरी नितीशना एनडीएत जाण्याचा मार्ग उरला नसता. कुठूनही नितीश व जदयु यांना महागठबंधनात बंदिस्त करण्याला प्राधान्य होते. पण आपल्या कुटुंब व पुत्राच्या मंत्रिपदापेक्षा पलिकडला विचार लालूंना जमला नाही आणि राहुल-सोनिया यांना तर आपल्या दारात कोणी रांगत येण्यापेक्षा अन्य कशाचेही महत्त्व अधिक वाटत नाही. सहाजिकच त्यांच्यासाठी  मोदी-शहा व भाजपा-नितीशनी लावलेला सापळा पुरेसा होता. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यूपीए वा महागठबंधनाची पात्रे काम करत गेली.

म्हणूनच बुधवार गुरुवारी जे काही नाट्य रंगलेले आहे, त्यात मोदी वा भाजपाने मोठा विजय मिळवला, असे समजण्यात अर्थ नाही. त्यांनी सापळा लावला आणि त्यात नितीश अडकले, असाही दावा करण्यात अर्थ नाही. असे सापळे आपणही आपल्या घरात उंदरासाठी लावतच असतो. पण चतुर उंदीरही त्यात सहजासहजी फसत नाही. अनेक उंदीर अशा सापळ्यापासून कटाक्षाने दूर रहातात. पण ज्यांना पिंजऱ्यातील किरकोळ खाऊचा मोह आवरता येत नाही, ते आयतेच पिंजऱ्यात येऊन फसत असतात. लालू व काँग्रेससहित बाकीच्या मोदी विरोधकांची तीच तर गंमत आहे. त्यांना भाजपा वा मोदींसाठी सापळा लावता येत नाहीच. पण त्यांनी लावलेल्या सापळे व पिंजऱ्यापासून स्वत:चा बचाव करण्याचीही बुद्धी शिल्लक राहिलेली नाही.

राष्ट्रपतिपदाच्या लढतीमध्ये नितीशनी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यावर प्रथम ती हरायची निवडणूक विसरून, बिहारचे महागठबंधन वाचवण्याकडे विरोधकांनी लक्ष देण्याची गरज होती. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करून तमाम मोदी विरोधक राष्ट्रपती निवडून आणण्याच्या वल्गना करण्यात रममाण झाले. त्यांनी महागठबंधनालाच सुरुंग लावण्याचा सापळा तयार करण्याची खुली मोकळीक नितीश व मोदी-शहांना देऊन टाकली. बुधवारी त्या सापळ्याचा चाप ओढला जाईपर्यंत लालू, राहुल वा पुरोगाम्यांना ते कुठल्या सापळ्यात आपल्याच पायांनी चालत आलेले आहेत, त्याचा पत्ताही लागलेला नव्हता. अकस्मात नितीश उठून राजभवनात गेले, तेव्हाही विरोधकांना नितीश एन्‌डीएत चाललेत याचा सुगावा लागला नव्हता. म्हणून तर लालू उठून रांचीला निघून गेले आणि मगच सुशील मोदींसह नितीश राजभवनात पुन्हा गेले. पुढला घटनाक्रम सर्वांपुढे आहे. परिणामी सिक्सर ठोकण्याचा आवेश आणणाऱ्यांचा सोपा झेल गेला आणि आता धावपट्टीवर बॅट आपटण्याचा तमाशा रंगला आहे.

लेखक – भाऊ तोरसेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *