इंदिराजी : करिश्म्याचा शोध

इंदिरा गांधीच्या दीर्घ कारकीर्दीत दहशतवाद, नक्षलवाद अन्नधान्य टंचाई दुष्काळ या सर्व समस्यांना त्या सामोऱ्या जायच्या. किंबहुना त्या स्वतःच पुपुल जयकर यांना म्हणायच्या, ‘कुठल्याही पंतप्रधानाचा दिवस हा संकटाने भरलेला असणारच. संकटे जर दोनतीन असली तर दिवस ठीक आहे म्हणायचा. जास्त असतील तर दिवस कठीण’. आपण काय होतो, याची त्यांना जाणीव होती. आपल्या सामर्थ्याची जाणीव त्यांना हळुहळू होत गेली.

पुढे एका मुलाखतीत त्या सांगतात की, ‘शांतिनिकेतनने मला काय दिले, तर भोवती कितीही गदारोळ चालला असला तरी आपण आतल्या आत संतुष्ट राहायचे, समाधानी राहायचे हे शांतिनिकेतनने मला शिकवले’. मोठे झाल्यावर जवळपास नेहरू पंतप्रधान झाल्यापासून ते जवळपास नेहरूंच्या मृत्यूपर्यंत सर्व काळ त्या त्यांच्या सहाय्यक म्हणून काम करत होत्या. साहजिकच अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांचा परिचय होता. अनेक कार्यकर्त्यांना त्या लहानपणापासून ओळखत होत्या. अनेकांबद्दल नेहरूंची मते त्यांना माहीत होती. नेहरू गेल्यानंतर खरेतर त्यांना राजकारणात रहायचे नव्हते. किंबहुना पाच सहा महिने वेगळे कुठेतरी जावे असे त्यांना वाटत होते. पण लाल बहादूर शास्त्रींनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले. माहिती आणि नभोवाणी मंत्री म्हणून त्या काम करू लागल्या. डॉम मोराईस यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मला मंत्रिपदात रस नव्हता. पण मला घेणे त्यांना आवश्यक होते कारण एखादा नेहरू मंत्रिमंडळात असल्याशिवाय ते टिकू शकले नसते’. हा त्यांचा आत्मविश्वास पुढे त्यांना पंतप्रधान पदापर्यंत घेऊन गेला.

त्यापूर्वी एक वर्षासाठी त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून काम केले होते. या काळात त्यांनी पक्षाला बरीच शिस्त लावली. किंबहुना काही वर्षांनी जेव्हा ‘रीडर डायजेस्ट’साठी प्रसिद्ध इंग्रजी पत्रकार त्यांच्यावर लिहीत होत्या. तेव्हा त्यांनी उषा भगत यांना सूचना केली, की त्या माझ्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी विचारतील, तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मेळ घालवलेल्या काळात पक्षाला शिस्त लागल्याचे असे सगळे म्हणत होते असे त्यांना सांग. असे त्यांनी आपल्या लेखासाठी ब्रीफही केले. त्यांचा मुत्सुद्दीपणा, चातुर्य, स्वप्रतीमेबद्दलची जागरूकता यात लक्षात येते.

ण संसदेत त्यांचा फारसा प्रभाव पडत नव्हता. ‘गुंगी गुडीया’ असे त्यांचे वर्णन राममनोहर लोहिया यांनी केले होते. मद्रासमध्ये 1966 च्या सुमारास दंगे सुरू झाले. कारण हिंदी भाषा लादली जाणार असे त्यांचे म्हणणे होते. स्वतः लाल बहादूर शास्त्री यांनी शांततेचे आवाहन केले पण त्या आव्हानाला दक्षिणेतल्या लोकांनी विशेषतः मद्रासमधल्या लोकांनी जुमानले नाही. तेव्हा इंदिरा गांधी विमानाने  मद्रासमध्ये गेल्या. भोवताली दंगे जाळपोळ चालू असताना त्या निर्भयपणे वावरल्या आणि त्यांनी शांततेचे आव्हान केले. आणि चक्क म्हणजे लोक शांत झाले. नेहरू घराण्याचा हा करिश्मा होता, असे डॉम मोराईस लिहितात. आणि इंदिरा गांधींना स्वतःतल्या करिश्म्याची जाणीव झाल्याची ही पहिली घटना होती.

नंतरची घटना होती ती म्हणजे त्या काश्मीरला गेल्या तेव्हा. खरेतर त्या सुट्टीवर होत्या पण अचानक त्यांना दिल्लीहून कळले की, काही पठाणांनी खिंडीतून प्रवेश केलेला आहे. अर्थात् हे काही पठाण मारेकरी आहेत असे वाटत होते असा अंदाज दिल्लीचा होता. इंदिरा गांधी यांचा मग सिक्स सेन्स इथे जागा झाला. त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना एकत्र बोलावले आणि पाहणी केली प्रत्येक लष्करी ठाण्यापाशी त्या गेल्या त्यांच्या लक्षात आले की धोका जेवढा वाटतोय तेवढा नाही आहे. त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांना फोनवरून वेळोवेळी माहिती देत असताना सांगितले की, धोका मोठा आहे. काही निवडक लोक खिंडीतून येऊन हल्ला करतील याची शक्यता कमी आहे. कदाचित ही युद्धाची पूर्वसूचना असावी.

नंतर झालेही तसेच. दोन महिन्यांत युद्ध झाले आणि भारताने त्यात विजय मिळवला. इंदिरा गांधी यांच्या करिश्म्याचा हा दुसरा प्रसंग होता. आपण निर्भयपणे वावरू शकतो, वेळ आली तर कठोर होऊ शकतो याची त्यांची त्यांनाच जाणीव झाली. मला वाटते इंदिरा गांधींच्या कुठल्याही चरित्रात हे दोन प्रसंग या प्रकारे आढळत नाहीत. म्हणून ते महत्त्वाचे आहेत.

पराभव झाल्यानंतर सतत डॉम मोराईस यांना इंदिराजींनी सूचना केली की, तुम्ही पुस्तक लिहावे. मी शक्य असेल तितका वेळ काढेन कारण आता मला वेळच वेळ आहे असे त्यांनी सांगितले. पुढे त्या असेही म्हणाल्या की, मी राजकारण सोडणार आहे. मात्र त्यानंतर दिल्लीतील गर्दी त्यांच्याभोवती गोळा झाली. डॉम मोराईस यांना प्रवेश मिळेनासा झाला. किंबहुना ते जेव्हा जेव्हा जात तेव्हा इंदिरा गांधी लोकांनी घेरलेल्या असत. तरीही अनेक गोष्टींवर त्यांनी इंदिरा गांधींनी बोलते केले. विशेषतः कुटुंबाबद्दल फिरोज गांधी यांच्याबद्दल त्या म्हणाल्या की फिरोज गांधी आणि माझे संबंध बिघडले तरीही कधीही त्यांनी त्याबाबत चिडचीड दाखवली नाही, त्यांचे इंग्रजी वाक्य होते –  he didn’t fuss about it. फिरोज गांधी यांना हार्ट अटॅक आल्यानंतर इंदिरा गांधी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होत्या. ज्या रात्री फिरोज गांधी मरण पावले तेव्हा त्यांचा हात इंदिरा गांधी यांच्या हातात होता. त्या अगोदरची काश्मीर सहल त्यांनी एकत्र केली होती आणि दोघे अतिशय जवळ आले होते, असेही एक डॉम मोराईस सांगतात.

पुपुल जयकर यांच्या चित्रपटात याला दुजोरा मिळतो. मात्र हे खरे आहे की फिरोज गांधी यांना इंदिरा गांधी यांच्या घरात परके वाटत असे. आणि बराच काळ ते दिल्लीला तीन मूर्ती भवनमध्ये न राहता इतरत्र राहत. इंदिरा गांधी यांना लहानपणापासून नेहरूंची बहीण विजयालक्ष्मी पंडित हिने वाईट वागवले. किंबहुना इंदिरा गांधींना कुरूप किंवा काहीतरी म्हणाल्या त्याचा इंदिरा गांधींच्या मनावर याचा खूप मोठा ओरखडा राहिला. पुपुल जयकर सांगतात की, पन्नास वर्षांनंतरही त्या हे बोलून दाखवत की, लहानपणी त्यांनी अपमान केला होता. नंतर नेहरूंनी आनंदभवन आणि त्यातली इंदिरा गांधींची आवडती खोली विजयालक्ष्मी पंडित यांना देऊन टाकली. यामुळे इंदिरा गांधीजी खूप अस्वस्थ झाल्या. कारण लहानपणापासून त्यांची स्वतंत्र अशी एक खोली होती. जिथे त्यांना शांत वाटत असे. नंतर त्या पंतप्रधान झाल्यावर आनंदभवनचे रूपांतर संग्रहालयात झाले. तेव्हा विजयालक्ष्मी पंडित यांनी एकदिवस रात्री त्या घरात राहण्याची परवानगी मागितली. इंदिरा गांधींनी त्यांना तीही नाकारली. त्या कुठलाही अपमान विसरत नसत आणि समोरच्याला त्याची योग्य वेळ येताच त्याची जागा दाखवत असत. हा त्यांचा स्वभाव होता अनेक वेळा तो त्यांनी दाखवून दिला. विशेषतः संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याबाबत हे तनखे रद्द करण्याचा ठराव लोकसभेत पास झाला. पण राज्यसभेत त्या ठरावला एक बहुमत कमी पडले तेव्हा त्यांनी राष्ट्रपतींच्या अध्यादेशाद्वारे संस्थानिक नावाचे पदच रद्द केले, जेणेकरून तनखेही आपोआप रद्द झाले.

इंदिरा गांधीच्या दीर्घ कारकीर्दीत दहशतवाद, नक्षलवाद अन्नधान्य टंचाई दुष्काळ या सर्व समस्यांना त्या सामोऱ्या जायच्या. किंबहुना त्या स्वतःच पुपुल जयकर यांना म्हणायच्या, ‘कुठल्याही पंतप्रधानाचा दिवस हा संकटाने भरलेला असणारच. संकटे जर दोनतीन असली तर दिवस ठीक आहे म्हणायचा. जास्त असतील तर दिवस कठीण.’ आपण काय होतो, याची त्यांना जाणीव होती. आपल्या सामर्थ्याची जाणीव त्यांना हळुहळू होत गेली. आपल्या करिश्म्याची जाणीव जेव्हा त्यांना झाली तेव्हा त्यांनी सर्व राजकीय विरोधकांना जरी ते ज्येष्ठ असले तरी चित केले. पण याचीच परिणती एका हाती हुकुमशाहीत झाली. सल्लागारांचे म्हणणे न ऐकणे, सहकाऱ्यांना स्थान न देणे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना त्यांच्या मतातील किंमत न देणे. आणि शेवटी एका हाती एकवटलेल्या सत्तेचा शेवट हुकूमशाहीत झाला. आणीबाणीनंतरच्या इंदिरा गांधी बऱ्याच वेगळ्या होत्या. यानंतर खरेतर त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घ्यायचे होते पण दुर्दैवाने पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे काहीजण सोडले तर कोणीही त्यांच्या समोर मनमोकळे बोलत नसे. त्या स्वतः पी. सी. अलेक्झांडर यांना म्हणत की, अनेक विषयांवर त्यांनी मते व्यक्त करावीत असे मला वाटते. पण सहकारीच बोलत नाहीत, मते देत नाहीत अशा त्यांची तक्रार होती. अर्थात ही संस्कृती त्यांचीच तयार केली होती. हे जसे त्यांचे चित्र होते तसेच कविमनाच्या, संवेदनशील आणि चित्र काढणाऱ्या साहित्य आणि संस्कृतीत रस घेणाऱ्या असेही त्यांचे एक रूप होते. म्हणूनच पुपुल जयकरसारख्या अनेकांशी त्यांची मैत्री होती. त्या आदिवासींबरोबर नृत्य करत असत. अत्यंत शिवराळ भाषेत लिहिणाऱ्या बिटनिक कवींची मैफीलही त्या एन्जॉय करू शकत. सोबतची त्यांनी काढलेली चित्रे याची साक्ष देतील.

(क्रमश:)


लेखक : शशिकांत सावंत
ईमेल : swatantranagrik@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *