आर्जवी गायक : चेस्टर बेनिंग्टन

Tell me what I’ve gotta do

There’s no getting through to you

The lights are on but nobody’s home (nobody’s home)

You say I can’t understand

But you’re not giving me a chance

When you leave me, where do you go? (Where do you go?)

-Talking to myself

 

‘टॉकिंग टू मायसेल्फ’ हे ‘वन मोअर लाइट’ या अल्बममधले गाणे इंटरनेटवर उपलब्ध झाले आणि त्यानंतर काही मिनिटांनी चेस्टर बेनिंग्टन याने आत्महत्या केल्याचे वृत्त प्रसारित झाले. जगभरातील रसिकांची मने जिंकणाऱ्या गायक चेस्टर बेनिंग्टनने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘टॉकिंग टू मायसेल्फ’ या व्हिडीओमध्ये शेवटी चेस्टर माईकपासून दूर जातो आणि तो व्हिडिओ संपतो. जणूकाही चेस्टर आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहे असा भास होतो, असे अनेक चाहत्यांचे मत आहे.

चेस्टरचा 20 मार्च 1976 रोजी फोनिक्स, अ‍ॅरिझोना येथे जन्म झाला. चेस्टर अकरा वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले. सुरुवातीच्या काळात तो आपल्या वडिलांसोबत राहत असताना तो अनेक व्यसनांच्या आहारी गेला. बऱ्याचदा त्याच्या हाडकुळ्या शरीरामुळे त्याची चेष्टा होत असे. लहानपणी त्याला लैंगिक शोषणालाही सामोरे जावे लागले.  पुढे तो आपल्या आईसोबत राहू लागला. सुरुवातीच्या काळात त्याने ‘बर्गर किंग’ येथे नोकरी केली. नैराश्य, लहानपणीचे कटू अनुभव आणि आत्मघाती विचारांपासून सुटका मिळवण्यासाठी तो चित्र रेखाटत असे. या काळातच त्याला कविता आणि गाणी लिहिण्याचे छंद जडले.

सेन डॉवडेल या बँडसोबत चेस्टरने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. पण त्यापुढील काळात त्याला चांगल्या बँडसोबत काम मिळवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. खूप प्रयत्नांनंतरही चांगला बँड मिळत नसल्याने संगीत क्षेत्र सोडून देण्याचे त्याने ठरवले होते. ‘वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ या उक्तीप्रमाणे चेस्टरच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण आला. जेफ ब्लू यांनी त्याला ऑडिशनची संधी दिली. ‘डिजीटल सर्व्हिस फर्म’ येथील आपली नोकरी सोडून तो आपल्या कुटुंबासमवेत कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झाला. ऑडिशनमध्ये यश मिळाल्यानंतर ‘लिंकिंन पार्क’चा यशस्वी प्रवास सुरू झाला. शून्यातून निर्माण झालेला हा बँड आज करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ‘हायब्रीड थिअरी’ हा चेस्टरचा पहिला अल्बम रसिकांच्या पसंतीस उतरला आणि दहा लाख सीडी विकल्या जाण्याचा विक्रम बनला. ‘हायब्रीड थिअरी’ या अल्बमनंतर एकापेक्षा एक धमाकेदार अल्बम चेस्टरने निर्माण केले आणि करोडो चाहत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

‘इन द एन्ड’ (2002), ‘बर्न इट डाऊन’ (2002), ‘समव्हेअर आय बिलाँग’(2003), ‘ब्रेकिंग द हॅबिट’’(2004), ‘नम्ब’ (2004), ‘व्हॉट आय हॅव डन’ (2007), ‘शॅडा ऑफ द डे’ (2008), ‘न्यू डिव्हाइन’ (2009), ‘वेटिंग फॉर द एण्ड’ (2011) या गाण्यांना बरेच यश मिळाले. ‘मेटेओरा’, ‘वन मोअर लाईट’, ‘लिव्हिंग थिंग्ज्’, ‘अ थाउझंड सन’ यांसारख्या संगीत अल्बमची भेट त्याने जगाला दिली. अप्रतीम बँड रॉकसाठी ‘लिंकिंग पार्क’ने ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड जिंकला आहे. यामध्ये चेस्टरचा सिंहाचा वाटा आहे. पीढीच्या भावनांचा वेध घेणारी रचना हे या गाण्यांचे प्रमुख आकर्षण आहे. ‘क्राऊलिंग’ आणि ‘इन द एन्ड’ ही दोन्ही गाणी आपल्याला तरुणांच्या वेगवेगळ्या तीव्र भावनांचा परिचय घडवून आणतात. या गाण्यांची शब्दरचना आपल्याला अंतर्मुख करते. हार्ड रॉक, हिपहॉप आणि विविध मेटल वाद्यांचा सुरेख संगम आपल्याला पाहायला मिळतो. ‘स्टोन टेम्पल पायलट’ या बँडसोबत 2013 ते 2015 दरम्यान चेस्टरने अनेक कार्यक्रम केले. ‘आऊट ऑफ टाइम’ हे गाणे या बँडसोबतचे पहिलेच गाणे होते. पुढे करारानुसार तो पुन्हा ‘लिंकिंग पार्क’सोबत काम करू लागला. संगीताचे एक अनोखे जग आपल्याला चेस्टरसोबत अनुभवायला मिळते. बऱ्याच जणांच्या मते रॉक संगीत हे अगदी धांगडधिंगा असते पण त्यातही आपल्या सुरांनी आणि आपल्या शब्दांनी रसिकांना मोहात पाडणारा चेस्टर आज सगळ्यांना खूप मोठा धक्का देऊन या जगातून नाहीसा झाला. जगभरात एक दुःखाची लाट पसरली. आपल्या चाहत्यांना पोरके करून हा दिग्गज गायक काळाच्या पडद्याआड निघून गेला. चेस्टरच्या आत्महत्येच्या वृत्ताने सगळीकडून हळहळ व्यक्त केली जाते आहे. ट्वीटर, फेसबुक अशा अनेक माध्यमांमधून त्याचे चाहते आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या मुलाखतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आपल्या अनेक चुकांची त्याला जाणीव झाली असून आयुष्य संपवण्याचा विचार तो करत असल्याचे त्याने म्हटले होते. मानसिक ताण आणि नैराश्य यांना झुंज देणारा हा जागतिक ख्यातीचा संगीतकार आपल्या वेदनांना शब्द देण्यात यशस्वी ठरला होता. त्याच्या स्वरांमध्ये आणि शब्दांमध्ये सर्व भावना प्रकट होत असत. त्याच्या आवाजात कमालीचे दुःख होते आणि आनंदही होता. बंडखोरीही होती आणि आर्जवसुद्धा होता. द्वेषही होता आणि प्रेमही होते. तो गेला पण त्याचे संगीत मागे ठेवून गेला. त्याच्या गाण्यातील संगीतासोबत, शब्दांसोबत त्याची आठवण दृढ होत जाते. रेडिओवर त्याचे गाणे वाजू लागले की, आता अर्थ नव्याने लागायला लागतात. डोळे बंद करून गाणे ऐकतच राहावे असे वाटू लागते.

रॉबिन विल्यम्स, क्रिस कॉर्नेल आणि आता चेस्टर बेनिंग्टन यांच्या आत्महत्येमुळे ‘लिंकिंन पार्क’ या बँडने आपल्या वेबसाइटवर अनेक लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. नैराश्य आणि आत्महत्येचे विचार ज्यांच्या मनात येतात त्यांच्यासाठी हा मदतीचा हात ठरणार आहे. www.linkinpark.com या वेबसाइटवर करोडो चाहत्यांनी चेस्टरसाठी भावूक संदेश लिहिले आहेत. RIPCHESTER या हॅशटॅग सोबत चाहत्यांच्या मोबाईलच्या फ्लॅशलाईटमध्ये उभ्या चेस्टरची प्रतिमा झळकते. त्याखाली दिलेल्या लिंक आत्महत्या प्रतिबंधासाठी काम करत आहेत. लिंकिंन पार्कचे हे पाऊल बरेच जीव वाचवण्यास उपयोगी पडेल अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *