संपादकीय : देवेंद्र फडणवीस असण्याचा अर्थ (भाग 1)

ऑक्टोबर 2014 मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुकीचे निकाल येत होते त्यावेळेला मी एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयात होतो. खरं म्हणजे मे 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीच स्पष्ट होते की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यावेळी सत्तेत असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार हरणार आहे. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात मोडतोड होऊन युत्या आणि आघाड्या तुटल्या. तेही बहुधा परस्पर समजुतीनेच झाले. तरीही त्यानंतर हे स्पष्ट होते की काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जाणार. प्रश्न होता की भाजप आणि सेनेला किती जागा मिळतात? लोक यांच्यातल्या कोणालाही स्पष्ट बहुमत देतात का? किंवा त्याच्या जवळपास नेतात का? आणि अंतिमतः लोकांचा कौल भाजप आणि सेनेने एकत्र येऊन सरकार चालवावे असे असणार का? साधारणतः ऑक्टोबरच्या 2014 च्या मतमोजणीच्या दिवशीच्या दुपारपर्यंत स्पष्ट झाले की महाराष्ट्रात प्रथमच भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येतो आहे. आजपर्यंत भाजप एका ‘लांबच्या’ चौथ्या क्रमांकावर असायचा आणि भाजप-सेना युतीमध्येही भाजप ‘ज्युनिअर पार्टनर’ असायचा. त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात उदय झाला. राज्यातला क्रमांक एकचा पक्ष म्हणून. ऑक्टोबर 2014 मध्ये तो होताना मुख्यतः ती मोदी मॅजिक आहे,  महाराष्ट्राला नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यामुळे ते घडून आले, लोकसभा निवडणुकीचा प्रभाव आणि पुढल्या काळात मोदी सरकारचा वाढत गेलेला प्रभाव यांमुळे हे घडले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राला मोदींनी सांगितलं आणि लोकांनी मतदान करून भाजपच्या हातात 122 जागा दिल्या. अर्थात हे होताना काही पक्षांशी आयाराम गयाराम हे सुद्धा भाजपने होऊ दिले. ही एक प्रकारची अपरिहार्य राजकीय चाल किंवा चातुर्य असे मानले जरी तरी एक वस्तुनिष्ठ सत्य अंतिमतः त्या ऑक्टोबर 2014 तल्या दुपारपर्यंत स्पष्ट झाले की-राज्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष. 122 जागा. तेव्हा चर्चेला सुरुवात झाली की आता मुख्यमंत्री कोण?

त्यावेळी वृत्तवाहिनीच्या स्टुडिओत बसूनच मी विधान केले होते की मुख्यमंत्री पदावर जाण्यासाठी जे व्यक्तिमत्त्व, जी प्रतिमा, जो अभ्यास, स्टेटस, आवाका असावा लागतो तो भाजपकडे आता शिल्लक असलेल्यांपैकी देवेंद्र फडणीसांच्या रूपाने आहे. याची काहीशी हिंट निवडणुकीच्या काळात मोदींनी राज्यात घेतलेल्या सभेत दिली होती. ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ हा शब्दही पसरला होता. गोपीनाथ मुंडे जर असते तर भाजपचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्नच उद्भवला नसता इतके मुंडेंचे निर्विवाद स्थान होते. मात्र त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणातला आणि राज्यव्यापी प्रतिमा असलेला चेहरा देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने भाजपकडे होता. पुढे राजकीय हालचालींना आवश्यक ते दिवस लागलेही असतील. भाजपतल्या बहुधा वयाने आणि कदाचित राजकीय अनुभवाने सुद्धा थोडे जास्त असलेल्या नेत्यांना आपण मुख्यमंत्री व्हावे किंवा मुख्यमंत्री पदावर आपला दावा आहे असे जरूर वाटलेले असू शकते. तसे वाटण्यात काही चूक नाही आणि तो लोकशाहीतला हक्कही आहे. केंद्रातल्या सुद्धा काही नेत्यांना राज्यात परतावे आणि मुख्यमंत्री व्हावे असे वाटले असेल. पण तरीही पक्षाने म्हणजे भाजपने त्यांना ठामपणे सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील. त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि अंतिमतः स्वच्छ प्रतिमा असणारे, कसलाही राजकीय जीवनातला कलंक नसणारे आणि मुख्य म्हणजे अत्यंत अभ्यासू लोकप्रतिनिधी ख्याती असणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले.

इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता; पण तरीही त्यापेक्षा पुढची आव्हानं जास्त गंभीर होती. मोदी मॅजिकने निवडून येणे आणि संघाने बळ दिल्याने मुख्यमंत्री होणे इथपर्यंत ठीक आहे; पण एकदा पदावर आल्यानंतर कारभार करणे, त्यामध्ये शिवसेनेला बरोबर घेता येणे किंवा अखंडपणाने चाललेल्या भाजप-सेना कुरबुरीतून सरकारचा कारभार पुढे नेणे, त्यातही प्रशासनावर पकड बसवणे आणि महाराष्ट्राचे पुन्हा एकदा चित्र देशामधील एक प्रगत राज्य असे निर्माण करणे हे आव्हानात्मक होते. आजवर देशासमोरच्या प्रश्नांची मूलभूत पावले आपण पहिल्यांदा उचलत होतो आणि देश म्हणायचा की या प्रश्नात महाराष्ट्रात काय केले आहे हे आम्हाला पाहायचे आहे. दुर्दैवाने मधल्या काळात हे हरवल्यासारखे झाले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या- समोरचे आव्हान ते गतवैभव परत मिळवून देणे हे होते. त्यातच ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणजे वेगळ्या विदर्भाचा मुद्दा. पक्ष म्हणून भाजपची अधिकृत भूमिका छोट्या राज्यांची असल्यामुळे स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा होता. तो वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांनीही जाहीर केला होता. तरीसुद्धा मुख्यमंत्री झाल्यावर विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सर्वांना बरोबर घेत राज्याचा कारभार सांभाळणे हे त्यांच्या समोरचं कमालीचं गुंतागुंतीचे आव्हान होते.

खरं म्हणजे मनात एक वेदना ठेवून पण नाईलाज म्हणून सांगायचे झाल्यास महाराष्ट्रातील सामाजिक जीवनातील दुर्दैवी सत्य आहे की देवेंद्र फडणवीसांकडे राज्याच्या राजकारणात यशस्वी ठरण्याची सोयीची जात नाही. दिलगिरीपूर्वक किंवा इलाज नाही म्हणून हा मुद्दा सांगावा लागतोय. गेली अनेक वर्षं महाराष्ट्रामध्ये पद्धतशीरपणे ब्राह्मणद्वेष पेरण्यात आलाय. पसरवण्यात आलाय. काही संघटना, काही पक्ष, काही नेत्यांचे राजकारण व समाजकारणच टोकाच्या कट्टर ब्राह्मणद्वेषावर चालते. त्यातला प्रश्न चातुर्वण्य आणि जातिव्यवस्थेचा विरोध करणे हा नाही. तो विरोध व्हायलाच पाहिजे. पण एखादी व्यक्ती केवळ जन्माला ब्राह्मण जातीत आली म्हणून तिचा द्वेष करणे या दुर्दैवी संस्कृतीची जोपासना गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्रात झाली आहे. मी संयमाने आणि दुःखाने म्हणतो की, त्याला राजकीय पाठबळही होतं. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आज तीन वर्षे लोटली असली तरी आजही काही घटकांना ते मुख्यमंत्री पदावर बसलेले सहन होत नाहीत. केवळ त्यांच्या आडनावाकडे बघून. अशावेळी सर्वांना बरोबर घेता येणे आणि सर्वांना आपलंसं करता येणे, जिंकून घेता येणे, जात, पात, धर्म निरपेक्ष सर्वांना वाटणे की हा आमच्या राज्याचा नेता आहे, हे सुद्धा एक मोठं आव्हान होतं. आज तीन वर्षांनंतर पुन्हा काही थोडे आणि दुःखद अपवाद सोडले तर फडणवीसांनी ते आव्हान पेलण्यात यश मिळवलेले आहे. त्यांची प्रतिमा राज्यव्यापी असून यामध्ये जातपात धर्म किंवा पंथ भेद आडवे नाहीत. किंबहुना, ते वशिल्याने कारभार करतात, एखाद्या विशिष्ट जाती किंवा धर्माला अनुकूल आहेत असे नसून शासन प्रशासन चालवण्यासाठी आवश्यक असणारी सर्वांप्रतीची समानत्व बुद्धी ठेवून ते काम करतात. त्यामुळेच त्यांनी ही प्रतिमा मिळवली आहे.

मधल्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक अभिसरण झालं. एका बाजूला त्या मोर्चाचे संचलन आणि नेतृत्व करणाऱ्यांच्या प्रगल्भतेला दाद दिली पाहिजे. कारण त्यांनी याचे कुठेही विषारी रूपांतर होऊ दिले नाही. कोपर्डी प्रकरणाने कमालीचे दुःख होऊन, कमालीच्या संतापाने आपले हे सर्व बांधव रस्त्यावर उतरले. अशा वेळी त्यांना सामोरे जाण्यामध्ये जराही काही वावगं झालं असतं तरी महाराष्ट्रात वणवा पेटला असता. तिथे ज्या संयमी तऱ्हेने देवेंद्र फडणवीस  सामोरे गेले आणि कोणत्याही विशिष्ट जातीला योग्य किंवा अयोग्य झुकतं माप न देता भूमिका मांडली ती अत्यंत योग्य होती. कोपर्डी प्रकरणात न्यायही मिळाला पाहिजे पण म्हणून दलितांना संरक्षणासाठी असणारा अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट तसाच राहिला पाहिजे यावर ते ठाम राहिले. थोडक्यात हा समतोल देवेंद्र फडणवीसांनी योग्य रीतीने सांभाळला. काही शक्तींनी जाहीरपणाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फडणवीसांच्या जातीकडे बोट दाखवून काही चिखलफेक करता येते का हे चाचपण्याचा प्रयत्न करून पाहिला. म्हणून मध्ये उल्लेख झाले छत्रपतींचे. फडणवीसांनी विधान केले की, आम्ही छत्रपतींचे सेवकच आहोत. आता यात एकाच वेळी राजकीय चातुर्यपण आहे आणि राजकीय स्वाधीनतापण आहे. राजकारणात वावरणाऱ्याकडे हे दोन्ही आवश्यक आहे. त्याचीही आपल्याकडे क्षमता असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *