संपादकीय : देवेंद्र फडणवीस असण्याचा अर्थ – भाग 2

मुख्यमंत्री झाल्या झाल्या लगेच आणि आता काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांनी म्हटले की प्रशासन  माझे ऐकत नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्याने असे म्हणणे किंवा त्यांच्यावर हे म्हणायची वेळ येणे हे एकाचवेळी आश्चर्यकारक आणि धक्कादायक, दुःखदायक आहे. पण ते खरे आहे. मला सुद्धा या ना त्या तऱ्हेने ते सतत कानावर येत राहाते की लोकप्रतिनिधी किंवा मंत्री इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्या तरी दुर्दैवाने प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही किंवा काही वेळा ते धुडकावून लावतात. हे आपल्या राजकीय, सामाजिक जीवनाचे दुर्दैवी सत्य आहे. हे एकट्या फडणवीस सरकारचे होतेय असेही नाही. मी आठवण करून देतो की एके वेळी स्वतः शरद पवारांनी त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त करत ‘काही जणांचे हात फायलीवर सही करताना थरथरतात’ असं म्हटलं होतं. म्हणजेच कामं अडून पडली आहेत, फायली क्लिअर होत नाहीत. प्रशासन चालवायला प्रशासनावर मांड टाकायला हवी.  ती वाघाची स्वारी आहे, प्रशासनावर पकड हवी आणि ती एकूण आत्ताचं भाजप-सेनेचे सरकार आणि त्याचा नेता या नात्याने मुख्यमंत्र्यांची आहे का असा प्रश्न जरूर निर्माण होतो आणि त्यावर मुख्यमंत्र्यांना म्हणण्याची वेळ येते की प्रशासन माझं ऐकत नाही.

आणखी एक जरासा बोचरा मुद्दा आहे. प्रशासनाचेही अनेक तऱ्हांचे राजकीय, वैयक्तिक, जातीपातींचे, आपापले गाव, जिल्हा, बिरादरीचे गुंतलेले हितसंबंध तयार होतात. सलग पंधरा वर्षे आधीचे आघाडी सरकार असताना त्या काळात तयार झालेल्या हितसंबंधांमुळे त्याजागी आलेल्या भाजप सेनेच्या सरकारच्या काळात प्रशासनातल्या काही जणांना या नव्या रचनेत आपल्या निष्ठा नव्या कामावर ठेवणे हे अवघड जाते. कळत नकळत ते आधीच्या सत्ताधाऱ्यांकडून सूचनाही घेत असतात. त्यातून उद्भवणारा हा एक संघर्ष आहे. आपण अशी आशा करुयात की फडणवीस ज्या तऱ्हेने राज्याचा कारभार करताहेत तो पाहता लवकरच हा संघर्ष दूर होऊन प्रशासन आणि सरकार मिळून राज्याच्या विकासाचा गाडा वेगाने पुढे नेताहेत असे दृश्य दिसेल.

फडणवीस यांच्या वाट्याला आणखी एक विचित्र बाब आली. सतत शिवसेनेबरोबर ‘तुझं माझं जमेना तुझ्याविना गमेना.’ त्यामुळे विकास कामांवर विपरित परिणाम होतो, असा संदेश गेला. ही गुंतागुंत सांभाळत राज्य पुढे नेणे हेही आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.

गेल्या तीन वर्षांतील तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे राज्याच्या विकासाचा दर. त्या विकासाच्या दरामध्ये राज्यामध्ये येणारी परदेशी गुंतवणूक ज्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातल्या शेतीच्या विकासाचा दर, हे या देवेंद्र फडणवीस सरकार टिकवू शकले आहे. याचा अर्थच आहे सगळ्या गुंतागुंतीमधून शेवटी आर्थिक विकासावरची पकड घट्ट आहे. मुख्य लक्ष आहे आर्थिक विकास आणि त्याची समतापूर्ण विभागणी. याला फडणवीसांचे नेतृत्व जबाबदार आहे. स्वतः मुख्यमंत्री या नात्याने जलयुक्त शिवार या योजनेला त्यांनी प्राधान्य दिले. काही जण त्यावर टीका करतात. तो प्रत्येकाचा हक्क आहे. त्याची चिकित्सा जरूर करता येईल. मात्र विकास कामांमध्ये पहिलं प्राधान्य दिले आणि ते स्वतः मुख्यमंत्र्यांनी उचलून धरले ही नितांत मोलाची गोष्ट आहे. कारण तो खरोखरच अग्रक्रमाचा विषय आहे आणि असला पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी आंदोलने आणि त्यातील कर्जमुक्तीचा विषयही त्यांनी ज्या तऱ्हेने हाताळला हे सुद्धा एका गुंत्याच्या प्रश्नातून वाट काढणे होते. आजपर्यंत कधीही कोणत्याही राज्याने न घेतलेला मोठा निर्णय घेऊन 34 हजार कोटींची कर्जमाफी करून दाखवली. ती करताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुज्ञता दाखवली. उदाहरणार्थ, कर्जमाफीचे फायदे छोट्या जिरायती शेतकऱ्याला होतील आणि बागायती, धनाढ्य, मुद्दाम कर्ज बुडवणारे किंवा त्यांना वशिल्याने कर्ज देणाऱ्या बँका यांना फायदा होणार नाही याची दक्षता घेतली गेली. ज्या शेतकऱ्यांनी आधी प्रामाणिकपणे कर्जे फेडली त्यांनाही त्याचा फायदा मिळाला पाहिजे याचाही विचार यामध्ये केला गेला.

तिसरी गोष्ट म्हणजे, लोकशाही विकेंद्रीकरण, तळातून लोकशाही, लोकसहभागातून लोकशाही याला फार मोठी चालना देईल असा कमालीचा मूलभूत निर्णय म्हणजे गावपातळीवर सरपंचाची निवड थेट मतदानातून करण्याचा निर्णय. तसेच ग्रामसभेकडचे अधिकार वाढवले आणि उत्पन्नाची साधने निर्माण करून देऊन ग्रामसभा आणि सरपंचाकडे गावाचा अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकार हा निर्णय आपली लोकशाही बळकट करणारा आणि गांधीजींच्या स्वप्नातला ग्रामस्वराज्याकडे नेणारा आहे. याची व्याप्ती फार मोठी आहे. ज्यांना राजकीय टीका करायची त्यांना जरूर करू द्या; पण उद्या यातून महाराष्ट्रासाठी चांगलं घडणार आहे. पुन्हा एकदा वरील उदाहरणाच्या निमित्ताने महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, देशासमोर असलेल्या प्रश्नांना स्वतंत्र बुद्धीने विचार करून महाराष्ट्र उत्तर शोधतो आणि देश म्हणतो महाराष्ट्राने जी अंमलबजावणी केली ती आपण करू, हे आपल्याला चालू होताना दिसतेय.

मी प्रारंभ करताना म्हणालो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले ते मुख्यतः नरेंद्र मोदी मॅजिक आणि संघाने दिलेला पाठिंब्यामुळे. पण आता या म्हणण्याशी कोणी असहमत होणार नाही की दरम्यानच्या तीन वर्षांमध्ये त्यांनी जी प्रतिमा, जे स्थान मिळवले आहे ते ‘अपने बलबूते पे.’ लोकशाहीमध्ये ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ अशी स्थिती असते. एखाद्या नेत्यावर लोकमान्यतेची मोहोर निवडणूक प्रक्रियेतून उमटते. हा नेता पक्षाला निवडणूक जिंकून देऊ शकतो का हा निकष महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ – मोदींचे राष्ट्रीय नेतृत्व हे त्यांच्या ‘मास बेस’वर उभे आहे. केवळ मोदी म्हणतात म्हणून महाराष्ट्रात भाजपला विजय मिळाला. 2014 मध्ये महाराष्ट्रातील मतदाराने मोदींकडे बघून भाजपला मतदान दिले असेल; पण 2019 मध्ये मात्र तो केवळ मोदींकडे बघून देणार नाही. पाच वर्षं इथल्या राज्य सरकारनं काय कामं केली त्यानुसार तो मतदान करेल.  माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की होताना देवेंद्र फडणवीस मोदी आणि संघ या पाठिंब्यामुळे झाले; मात्र आता तीन वर्षांमध्ये त्यांनी ‘अपने बलबुते पर’ अगदी मास बेससहित आपली छाप उमटवली आहे. विविध आंदोलनांची हाताळणी, अर्थव्यवस्थेची हाताळणी या जोडीला लोकशाही जीवनातले एक सत्य असलले निवडणुका जिंकून दाखवणे. देवेंद्र यांनी अगदी नगरपालिका आणि जिल्हा परिषदा म्हणजे अगदी  ग्रामीण भागासकट त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकून दाखवल्या आहेत. याचा अर्थ असा की आज देवेंद्र फडणवीसांचे व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्त्व एक राज्यव्यापी नेता म्हणून आकाराला आले आहे.

परवा त्यांच्याबरोबरच्या एका कार्यक्रमादरम्यान तेथील संस्थाचालक आनंदाच्या भरात म्हणाले की ‘आता तुम्ही कधी एकदा पंतप्रधान होता असे आम्हाला झाले आहे.’ मी मनातल्या मनात म्हणालो, अशा प्रकारची भाषा आत्ता वापरून देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढवणार आहेत. देवेंद्र फडणवीसांनी प्रगल्भ राजकीय व्यक्तीला शोभेल असे तोलून मापून उत्तर दिले. ते म्हणाले की आजपर्यंत ‘मला पंतप्रधान व्हायचेय’ असे जे म्हणाले ते पंतप्रधान होत नाहीत असा इतिहास आहे. मी आत्ता राज्यात काम करतोय आणि मला राज्यात काम करू द्या. एवढ्यावर त्यांनी उत्तर पूर्ण केले. आधी राज्य सांभाळले, मग स्वतःच्या नेतृत्वाखाली एकदा किंवा दोनदा विजय मिळवून दाखवला की केंद्रातील नेतृत्वावर दावा सांगण्याची प्रतिमा निर्माण होते हे नरेंद्र मोदींच्या रूपाने भारतीय राजकारणामध्ये एक नवे चित्र समोर आले आहे. त्याचे प्रत्येक भारतीय नागरिक जरूर स्वागत करेल; परंतु प्रगल्भ राजकीय नेत्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसायचे नसते. ती प्रगल्भता देवेंद्र फडणवीस जरूर दाखवत आहेत. पण अजून त्यांची वाट लांबची आहे. आधी सध्याचे सरकार, नंतर 2019 आणि नंतर गरज असल्यास 2024 पर्यंत देवेंद्र फडणवीसांची वाटचाल जरूर केंद्रीय नेतृत्वापर्यंत होऊ शकते. ती ताकद त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे; पण वाटचाल लांबची आहे आणि आव्हाने खूप मोठी आहेत. राज्याच्या हितासाठी त्यांना यश मिळावे याच त्यांना सततच्या शुभेच्छा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *