मृत्यूवरही हसणारे तेंडुलकर


मंगेशकाकांची वाणी, लेखणी आणि त्यांचा ब्रश सडेतोड फटकारे मारत असे. कुणाचाही मुलाहिजा ठेवता आपल्याला पटणारी गोष्ट स्पष्टपणे मांडूनही त्यांच्याबाबत बहुसंख्य मंडळींना त्यांचा कधी राग आला नाही. याचं कारण त्यांच्या मनातील सार्वजनिकहिताची आणि उपेक्षितांबाबतची आंतरिक तळमळ. ती त्यांच्या जगण्यावागण्यातून आणि शब्दचित्रांमधून प्रकट होत असे.

एखादा (विनोदी म्हणवणारा) लेख वाचून, वात्रटिका ऐकून, व्यंगचित्रं पाहून खळखळून हसायला येईल, अशी संधी अलिकडच्या काळात लोकांना क्वचितच मिळते. त्यातही सूक्ष्म विनोदाबरोबरच विधायकतेवरही सूचक भाष्य करणारी प्रबोधनात्मक कलाकृती पहायला मिळणं आणखी दुर्मिळ. अशा काळात स्वतःला व्यंगचित्रांसाठी अनेक विषय पुरवणाऱ्यांशी मनोमन कृतज्ञ राहून ज्यांनी आपल्याला जे म्हणायचे आहे ते स्पष्टपणे म्हणावे, अशी आपल्या हातातील रेषांनाही सवय लावली होती, असे प्रतिभावंत भाष्यकार आणि व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं अचानक जाणं खरोखरीच धक्कादायक आहे. वयाच्या 81 व्या वर्षी (एकाच व्यक्तीचे प्रत्येक वृत्तपत्रात वेगवेगळे वय देण्यात आले आहे – हाही आता नक्कीच व्यंगचित्राचा विषय ठरावा) एका शस्त्रक्रियेनंतर त्यांनी या जगातून एक्झिट घेतली. पण अखेरपर्यंत त्यांचा उत्साह अक्षरशः 18 व्या वर्षातल्या युवकासारखाच होता. पुणे शहरात हेल्मेटसह बुटेलवरून फिरणारे आणि परगावी स्वतःची इंडिका शेकडो मैल दामटवत नेणारे तेंडुलकर हे अक्षरशः एखाद्या निर्मळ खळाळत्या झऱ्याप्रमाणे हसत आणि हसवत राहिले, अगदी अखेरपर्यंत!

तेंडुलकर या आडनावाला देशभरातच, पण विशेषतः मराठी मनात एक वेगळंच वलय आहे. त्यातही मंगेश तेंडुलकर यांचं घराणं आणखी विशेष. थोरले बंधू प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर. दुसरे बंधू सुरेश तेंडुलकर हे विख्यात अर्थतज्ज्ञ. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर पुतणी. अशा नामांकित कुटुंबातल्या मंगेशकाकांनी या कोणत्याही मोठेपणाचा कधी बडेजाव तर मिरवला नाहीच. उलट स्वतःची वेगळी नाममुद्रा उमटवली. अन् तीही अगदी सहजपणे. ओढून ताणून नव्हे. प्रगल्भ विचारांसह मोठी शारीरिक उंची, स्वतःवरच चित्रं रेखाटून दुसऱ्याचं व्यंग दाखवण्याची लाभलेली किमया, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता स्वतंत्रपणे आपले विचार आणि आपल्या रंगरेषा मांडण्याची वृत्ती, केवळ कागदी विचारवंत न होता प्रबोधनाच्या कार्यात सक्रियपणे आघाडीवर राहण्याचा स्वभाव, संपूर्ण पांढऱ्या दाढीतूनही मोकळेपणाने बाहेर येणारे निर्व्याज खळाळते हास्य आणि या सगळ्याला वय विसरून लाभलेली अभिजात उत्साहाची जोड यामुळे मंगेशकाका हे आपल्याच घरातलं एक वडीलधारं व्यक्तिमत्त्वच असल्याची अनेकांची भावना होती. वास्तविक वयाची साठी उलटली की, उपदेशांच्या मार्गावर अनेकांची आत्मप्रौढीची गाडी अनेक पुरस्कार अजूनही मला कसे मिळाले नाहीत, आपला समाज सद्गुणवंतांकडे कसं दुर्लक्ष करतो हे सांगण्यातच या मंडळींची शिल्लक असलेली ऊर्जा खर्ची पडत असते. पण चित्रकलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या, इतकंच नव्हे तर या विषयात नापास झालेल्या मंगेशकाकांनी निवृत्तीच्या वयात घट्टपणे कुंचला हाती धरला आणि तेंडुलकरी स्ट्रोकचा चमत्कार अनेकांना दाखवून दिला. काहीही हातचं राखून न ठेवता रंगरेषांमधून व्यक्त होणारे तेंडुलकर शब्दांमधूनही तितकंच प्रभावीपणे व्यक्त होत असत. विशेषत: त्यांच्या व्यंगचित्रांची मालिका असेल तर त्यासंबंधीचं त्यांचं मार्मिक चिंतन काही ओळींच्या समूहात व्यक्त झालेलं असायचं. त्यांच्या शब्दांना आणि रेषांना त्यांच्या स्वभावाची जणू सवयच झालेली असावी, इतक्या नैसर्गिकपणे, सहजसुलभपणे ते शब्द अन् त्या रेषा व्यक्त होत असत. भ्रष्टाचार, गैरव्यवहार, गुन्हेगारी, जाती-पातींवरून समाजात दुही माजवणारे काही गलेलठ्ठ राजकारणी यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या घटनांवरही त्यांचं मार्मिक भाष्य त्यांच्या शब्दचित्रांमधून पहायला मिळत असे. अर्थात् गेंड्याची कातडी लाभलेल्या मंडळींवर – (हा गेंड्याचाही अपमान असल्याने त्या प्राण्याविषयी सहानुभूती बाळगूनसुद्धा) त्यांच्या शब्दचित्रांचा किती अन् काय परिणाम झाला असेल कुणास ठाऊक. उलट आपण तेंडुलकरांसारख्या नामवंत व्यंगचित्रकारालाही आपल्यासाठी सवड काढून आपल्याबाबत चित्रं काढायला लावली, अनेकांनी ती छापली यातही आपला मोठेपणा अन् लोकप्रियतेची साक्षच अनेक जण काढत असतील. याबद्दलची त्यांच्याही मनात कधीकधी खंत असायची, पण ती बाजूला ठेवून ते पुन्हा नव्या उत्साहानं आपल्या कामात गुंतून जायचे. त्यांच्याशी गप्पा मारणं हाच एक विनोदाचा प्रसन्न शिडकावा असायचा. स्वत:सह समोरच्याला त्यामुळं ते सतत ‘फ्रेश’ ठेवायचे.

मंगेश तेंडुलकर यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1936 चा. त्यांच्या वडिलांनी न्यूयॉर्कच्या लॅरिए या व्यंगचित्रकाराचे ‘हाऊ टू बी अ कार्टूनिस्ट’ हे पुस्तक घरी आणले होते. त्या पुस्तकात ते रमून गेले. त्यामुळं त्यांना रंगरेषांची गोडी लागली आणि चित्रकलेमध्ये फारसं प्राविण्य नसतानाही ते पुढं प्रख्यात व्यंगचित्रकार झाले. पुण्यातील स. प. महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी घेतली. त्यानंतर काही काळ त्यांनी खडकी येथील लष्कराच्या दारुगोळा कारखान्यातही काम केलं. मात्र त्याचवेळी व्यंगचित्रकलेसाठी वेळ काढला. 1954 मध्ये त्यांचं वयाच्या 18 व्या वर्षी पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं. खडकीतील नोकरी सोडल्यावर वैद्यकीय उपचारांसाठी आणि रुग्णालयांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणं बनवण्याचा व्यवसाय त्यांनी केला. 1960 ते 75 च्या दरम्यान त्यांनी काही नाटकांमध्ये भूमिका केल्या. त्यानंतर ते नाट्यसमीक्षणाकडं वळले ते अखेरपर्यंत. पण व्यंगचित्र ही त्यांची पॅशन होती. सामान्यांच्या मनातील प्रेम, राग, द्वेष, मत्सर, संताप, हतबलता, व्यथा, वेदना त्यांनी तत्त्वज्ञानाची जोड देत देत आपल्या रंग, रेषा, शब्दांतून सातत्याने मांडल्या. त्यामुळं सामान्य लोकांच्या व्यथा-वेदना-भावनांना ‘आवाज’ मिळाला आणि परिस्थितीशी ‘सामना’ करण्याचं त्यांना बळही मिळत गेलं.

मंगेशकाका हे कर्ते कलावंत आणि भाष्यकार होते. केवळ आपले विचार प्रबोधनापुरते न मांडता, केवळ उपदेशात्मक होऊ न देता त्यांनी ते आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वांपुढं आणलेच. पण त्याही पुढं जाऊन पुण्याच्या वाहतूक समस्येकरिता आणि पुण्याच्या पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी अनेक वर्षे भर वाहतुकीत चौकाचौकात तासन्‌तास उभे राहून स्वतःच्या खर्चानं छापलेली, स्वतः रेखाटलेली चित्रं वाहनचालकांना भेट म्हणून दिली, आणि वाहतुकीचे नियम पाळा असंही प्रेमानं बजावलं. या प्रश्नाच्या जागृतीबाबत त्यांनी अनेक वर्षे पुणे पोलिसांसोबत काम केलं. त्यामुळंच वाहतूक शाखेच्या साध्या पोलिसापासून ते पुण्याच्या पोलीस आयुक्तांपर्यंत अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी वैकुंठ स्मशानभूमीत जातीनं हजर राहून त्यांना आदरांजली वाहिली. वाहतूक समस्येबरोबरच पुण्याच्या (सर्वच क्षेत्रातील) बिघडलेल्या पर्यावरणाबाबत त्यांना अत्यंत काळजी होती. त्या बाबतच्या व्यथा आणि उपाययोजना ते संबंधित बैठकांमध्ये स्पष्टपणे व्यक्त करत. पुणेकरांच्या सार्वजनिक हिताशी संबंधित अनेक प्रश्नात त्यांनी कुणाच्याही आमंत्रणाची आणि मान-सन्मानाची वाट न पाहता स्वतःच्या बुलेटवरून वेळेत हजर राहून आपली जबाबदारी कर्तव्यभावनेनं निभावली. मग तो नाट्यगृहांमधील गैरव्यवस्थापनाचा मुद्दा असो की पुण्याभोवतीच्या टेकड्यांची वाट लावणाऱ्या निसर्गावरील दरोडेखोरांबाबतचा प्रश्न असो, मंगेशकाकांची वाणी, लेखणी आणि त्यांचा ब्रश सडेतोड फटकारे मारत असे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आपल्याला पटणारी गोष्ट स्पष्टपणे मांडूनही त्यांच्याबाबत बहुसंख्य मंडळींना त्यांचा कधी राग आला नाही. याचं कारण त्यांच्या मनातील सार्वजनिक हिताची आणि उपेक्षितांबाबतची आंतरिक तळमळ. ती त्यांच्या जगण्या-वागण्यातून आणि शब्द-चित्रांमधून प्रकट होत असे.

संडे मूड, अतिक्रमण, कुणी पंपतो अजून काळोख अशा मोजक्या पुस्तकांसह व्यंगचित्रांच्या ठीकठिकाणच्या प्रदर्शनांमुळे ते सर्वदूर पोचले. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरातील त्यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचं उद्‌घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर सरांच्या हस्ते व्हावं अशी त्यांची इच्छा होती. माझ्याजवळ त्यांनी ती आग्रहपूर्वक बोलून दाखवली. सरांची पूर्वनियोजित वेळ घेऊन त्यांच्यासोबत आम्ही एन्. सी.एल्. मध्ये पोचलो. सरांनीही मोकळेपणानं त्यांचं स्वागत केलं आणि प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाला येण्याचं मान्य केलं. मला अजूनही तो दिवस आठवतो. सरांनी सकाळी-सकाळीच बालगंधर्वच्या कलादालनात प्रदर्शनाचं उद्‌घाटन केलं. मंगेशकाकांची ताजीतवानी करणारी मार्मिक व्यंगचित्रं पाहून ते भरभरून हसले आणि हा हास्यठेवा बरोबर घेऊन आम्ही दोघं पोचलो ते थेट पंडित भीमसेन जोशी यांच्या घरी. बऱ्याच दिवसांपासून माशेलकर सरांना अण्णांना भेटायचे होते. तो योग या निमित्तानं  जुळून आला. माशेलकर सरांसारख्या एका विज्ञानेश्वराच्या बरोबरीची रंग, रेषा आणि स्वर्गीय सुरांच्या सहवासातील ती प्रसन्न सकाळ आजही माझ्या तश्शीच आठवणीत आहे.

मंगेशकाकांच्या अचानक जाण्यामुळं अशा सगळ्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ लागल्या. तोच आपापला ठेवा आहे. त्यांच्या स्मृतीस मनः पूर्वक आदरांजली.

डॉ. सागर देशपांडे

संपर्क – ९८५०८८५९३६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *