महाराष्ट्रात सबकुछ फडणवीस

राजकारणात काय किंवा जगण्याच्या लढाईत काय, एकाच वेळी अनेक शत्रूंना/हितशत्रूंना/स्वकीय विरोधकांना अंगावरघेऊ नये असं म्हणतात. बर्‍याच वेळा या सगळ्यांना एकाच वेळीअंगावर घेतल्यानंतर किती शक्तिपात होईल याचाअंदाज फारसा अचूक वर्तवणंअशक्य असल्यानं असा पोक्त सल्ला कदाचित बुजुर्गांकडून दिला जात असावा. व्यावहारिकदृष्ट्या तो तसा हिताचाही म्हणावा लागेल. पण काळानुसार इतर अनेक क्षेत्रांप्रमाणं राजकारणही बदललं आणि त्यातली गणितंही बदलली. भ्रष्टाचार, जातीयवाद, प्रांतवाद, पक्षनिष्ठेचा अभाव, प्रचंड स्वार्थ आणि सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी या सगळ्यामुळं अगोदरच राजकारणाचा इतका चिखल झालेला की त्यात स्वच्छतेसाठी हात घालायचा म्हटला तरी मनगटावरच्या घड्याळापर्यंत चिखलाने सारा हात बरबटून जाण्याची भीती! पण हे सगळं बाजूला ठेवून, कधी पाठीशी ठेवाव्या लागणार्‍या मित्राला फाट्यावर सोडून पुढे जाण्याची तयारी ठेवत सगळी राजकीय गृहीतकं आणि विचारांच्या/तत्त्वज्ञानाच्या रत्नाकरांचे जुनाट अंदाज काखोटीला मारत देवेंद्र फडणवीस या तरुण नेत्यानं या अशा चिखलातसुद्धा स्वपक्षीय कमळ फुलवण्याचा जो पराक्रम केला आहे, त्या पराक्रमाला (काही आक्षेपार्ह अपवादांसह) नक्कीच दाद द्यावी लागेल. ‘काट्यानं काटा काढावा’ अशी मराठीत प्रभावशाली म्हण आहे. तद्वतच ज्यांना पराभूत करायचं आहे, त्यांच्याच उमेदवारांच्या गळ्यात पक्षद्रोह करण्याचं बक्षिस म्हणून भाजपाची होलसेलमध्ये तयार करून घेतलेली उपरणी घालायची आणि ‘पदरी पडलं, पवित्र झालं’ असं म्हणत त्यालाच त्याच्या ‘काल’ पूर्वीच्या जवळच्या माणसांशी लढायला प्रवृत्त करायचं, असं सूत्र स्वीकारून ‘कुणीही निंदा, कुणीही वंदा ’असं म्हणत म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जो राजकीय चमत्कार करून दाखवलाय, त्याला तात्त्विक आणि नैतिक अधिष्ठान किती आहे, हा चर्चेचा रास्त मुद्दा बाजूला ठेवून का असेना नक्कीच दाद द्यावी लागेल. निदान आयुष्यभर रात्रंदिवस राजकारण करणार्‍यांनी आता तरी सन्मानाने चिंतन करीत, जुन्या आठवणी आणि त्याच त्याच मुलाखतींची, त्याच विनोदांची उजळणी करीत समवयस्कांशी शिळोप्याच्या गप्पा मारत, उर्वरित आयुष्य स्वान्तसुखाय घालवावं, एवढा इशारा या निवडणुकीनं संबंधितांना दिलाय एवढं मात्र नक्की.

काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात 15 वर्षे सलगपणे सत्तेत असताना विरोधकांमधील म्हणजे भाजपा-सेना युतीकडील अत्यंत अभ्यासू, तरुण, आक्रमक आणि बहुआयामी नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा होती. ती तशीच राखण्यात आणि प्रत्यक्ष तशी ठेवण्यात देखील ते यशस्वी झालेच, पण दीर्घ काळ विरोधात राहून सुद्धा सत्ता चालवण्याची वेळ आली तर ती देखील प्रभावीपणे चालवता येऊ शकते. याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. अन्यथा इतकी वर्षे सत्तेत अन् विरोधात राहिल्यानंतर आपापल्या भूमिकांची इतकी सवय झालेली असते की, आता आपली भूमिका आणि डायलॉग हे सगळंच बदललंय याचंच भान बर्‍याच जणांना पाच वर्षांची मुदत संपत आली तरी येत नाही. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची केलेली निवड त्यावेळच्या आणि आजच्या परिस्थितीत सुद्धा किती योग्य होती, त्याचं प्रत्यंतर येऊ शकतं.

देशभरात नरेंद्र मोदींनी निर्माण केलेला राजकीय झंझावात, अत्यंत वेगवान पद्धतीनं निर्माण केलेली देशव्यापी सत्तांतराची लाट आणि पंतप्रधानपदांची जबाबदारी घेतल्यानंतर जगभरात भारताच्या बदलत्या प्रतिमेची करून दिलेली प्रभावशाली ओळख या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा आणि मित्रपक्षांना राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील लक्षणीय यश मिळालं. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात सुद्धा 25 वर्षांची राजकीय युती तोडून सुद्धा स्वतंत्र लढलेल्या भाजपा-शिवसेनेला जनमताचा कौल लक्षात घेऊन सरकार चालवण्यासाठी एकत्र यावं लागलं. मुख्यमंत्रिपद न मिळाल्यानं अनेक ज्येष्ठ आणि बरोबरीच्या नेत्यांची छुपी आणि जाहीर नाराजी लक्षात घेता, त्यांच्या कारवायांना तोंड देत, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारखे चाणाक्ष आणि धूर्त राजकारणी 50 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीच्या अनुभवासह आपल्याला जोरदारपणे विरोध करणार याची मनाशी खात्री बाळगत, शिवसेनेसारखा मित्रपक्ष सोयीनुसार विरोधी पक्षाचीही भूमिका करू लागल्यानं उद्भवणारी विचित्र परिस्थिती, काँग्रेसचा पारंपरिक भाजपा विरोध, डाव्या आणि तथाकथित पुरोगाम्यांचा समाजवाद्यांसह होणारा सोयीस्कर वैचारिक हल्ला, अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती, त्यानंतरच्या पावसाळ्यात महापुराने उद्भवलेली आपत्कालीन स्थिती, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, राज्यभरातील वाढती गुन्हेगारी आणि दीर्घकाळ ‘काहीही करा, रेटून करा, पण आम्ही म्हणतो तेच झालं पाहिजे’ हेच ऐकून घेण्याची आणि त्याप्रमाणं वागण्याची प्रशासनाला लागलेली सवय, जातीयवादाची तेढ वाढवत-वाढवत अधिक टोकदार करण्यासाठी आणि त्यायोगे सरकारविरोधात वातावरण तापवतानाच ‘फडणवीस’ यांना एकट्याला टार्गेट करून, त्यांच्या जातीचा निर्देश करून स्वकीयांना भडकवण्याचे केलेले अनेक ‘जाणत्या’ राजकारण्यांचे महाराष्ट्राला मागे नेणारे उद्योग या सगळ्या आव्हानांना अतिशय प्रगल्भपणे, संयमी भाषेत, आवश्यक तिथे आक्रमक होऊन देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसमावेशकतेची भूमिका घेत घेत ज्या प्रकारे तोंड दिलं, त्यावरून हे नक्कीच अनुमान काढता येईल की, या नेत्यामध्ये भविष्यकाळात देशपातळीवरील महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलण्याची फार मोठी क्षमता आहे. सर्वात तरुण नगरसेवक आणि महापौर ते महाराष्ट्राचे प्रभावशाली मुख्यमंत्री अशी त्यांची 25 वर्षांची कारकीर्द ही राजकारणात नव्याने येणार्‍या सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्वच्छपणे काम करू इच्छिणार्‍या कुणालाही दिलासा देणारी ठरावी अशी नक्कीच आहे. राजकारणात केवळ एवढ्या भांडवलावरच जाता येत नाही, गेले तर टिकून राहता येत नाही, इतक्या उच्चपदावर फार काळ ठेवले जात नाही. पण यापुढं या पारंपरिक राजकीय समजुतींनाही धक्का बसेल अशा पद्धतीने देशाचे आणि राज्याचे राजकारण बदलताना दिसत आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.

याखेरीज ‘जलयुक्त शिवार’ योजनेपासून ते बेरोजगार तरुणांसाठी कौशल्याधारित शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राने टाकलेले पुढचे पाऊल, सरसकट कर्जमाफी करून शेतकर्‍यांच्या नावे दुःखाचा बाजार मांडून बँकांच्या माध्यमातून आपापली घरं भरण्याचं पाप करणार्‍यांना पुन्हा संधी न देता, प्रश्‍नाच्या मुळाशी जात शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी टाकलेली पावलं, विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करून उद्योग-व्यवसाय वाढवण्याची घेतलेली भूमिका, प्रशासन अधिकाधिक पारदर्शी करण्याचा प्रयत्न, त्याच्याच जोडीला 18-18 तास काम करत प्रशासकीय यंत्रणेलाही लावलेला चाप, मेव्हण्या-पाव्हण्यांच्या राजकारणाला लांब ठेवत घराणेशाहीला फारसा थारा न देता खडसे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या स्वपक्षीय आक्रस्ताळ्या मडळींना शिकवलेला राजकीय धडा आणि हे सगळं करताना रिपब्लिकन पक्षासहित बरोबर येणार्‍यांसह बेरजेचं राजकारण करत भाजपाची राजकीय प्रतिमा अधिक व्यापक करण्यात मिळालेलं यश यामुळंच फडणवीस हे राजमान्य आणि लोकमान्य नेते होऊ शकले हे अगदी नि:संशय!

एकीकडं शरद पवार यांच्यासारखे देशपातळीवर ज्येष्ठ नेते सुद्धा छत्रपती आणि पेशवाईची जाणीवपूर्वक उदाहरणं देऊन, आवश्यक तिथे सूचक जातीय संदर्भ देऊन देवेंद्र फडणवीस यांना सर्वार्थानं एकटं पाडण्यासाठी सर्व सामर्थ्यानिशी प्रयत्नशील होते. अशा वेळी खडसे-भुजबळांवर एकाच वेळी कारवाई करत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीतच फोडाफोड करून आपल्यालाही सत्तेचं राजकारण कसं करता येतं हे फडणवीस यांनी दाखवून दिलं यात शंका नाही. सत्तेच्या राजकारणात तसे नवखे असूनही, एकदाही राज्याचं मंत्रीपदसुद्धा भूषवलेलं नसताना त्यांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्रीपद आणि पक्षनेतेपद सांभाळलं, ज्या पद्धतीनं पक्ष आणि सरकारची ध्येयधोरणं प्रभावीपणे मांडत त्यांनी एकहाती राज्यभरात जो प्रचारसभांचा धडाका लावला, नगरपरिषदांमधील यशापाठोपाठ मुंबईसह राज्यातील अन्य मोठ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या माध्यमातून शहरांपासून ते गावपातळीपर्यंत भाजपाला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्यापर्यंत जी मजल मारता आली त्याचे मोठे श्रेय फडणवीस यांनाच देण्यात येते, ते किती रास्त आहे याची प्रचीती त्यांनी आणून दिली आहे.

खरा प्रश्‍न यापुढेच….. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर यापुढं भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिका लक्षात घेऊनच घटना घडत राहतील हे नि:संशय. पण त्याचवेळी मुख्यमंत्र्यांसमोर जी नवी आव्हानं उभी राहिली आहेत, त्यातलं सर्वात मोठं आव्हान आहे, ते म्हणजे भाजपाचं वेगानं होत असलेलं राजकीय अध:पतन नियंत्रित करण्याचं. निवडणुकीतील यशासाठी फक्त निवडून येण्याची क्षमता एवढाच निकष ठेवून त्यांनी ज्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षांमधील नेते, कार्यकर्ते आणि राजकारण्यांना होलसेल पद्धतीनं प्रवेश दिला आहे. त्यामुळं अप्रत्यक्षपणे भाजपाच्या चिन्हावर बर्‍याच ठिकाणी आज राष्ट्रवादीची मंडळी सत्तेवर पुन्हा आली असल्याचं दिसत आहे. इतकंच काय पण गुन्हेगारी क्षेत्रातील म्होरक्यांनाही भाजपामध्ये घेऊन आपलं राजकारण यशस्वीपणे विस्तारता येईल आणि येईल ती परिस्थिती कशीही निस्तरता येईल अशा (गैर) समजामध्ये मुख्यमंत्र्यांसह सेना-भाजपाने राहून चालणार नाही. अन्यथा पूर्वी हीच मंडळी आपापल्या पक्षात सोयीनुसार राहून गांधी-नेहरू-सोनियांची नावं घेत, भ्रष्टाचार करत आपलं साम्राज्य प्रस्थापित करायची. त्यातूनच अण्णा, दादा, तात्या, राव तयार व्हायचे. तीच जागा गळ्यात भाजपाचे उपरणे घालून भाषणात जी, जी असं म्हणायला शिकून हेडगेवार-गोळवलकर-मोदींची नावं घेत गैरकारभार करत हे नवे सुभेदार घेतील हे सर्वात मोठं आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. ते यशस्वीपणे पेलले गेले तर भविष्यात ‘दिल्लीतही देवेंद्र’ हे चित्र नक्कीच आपल्याला दिसू शकेल. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!!

– डॉ. सागर देशपांडे

jadanghadan@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *