राज्यघटना सन्मान मूक मोर्चा

या नव्या भारताच्या जडणघडणीचा मूलभूत आधार आहे, भारताची राज्यघटना. आपण सर्वांनी आपल्या घटनेचं प्राणपणानं संरक्षण, संवर्धन आणि सन्मान केला पाहिजे. मी जेवढा आपल्या राज्यघटनेचा खोलवर अभ्यास करतो, तेवढा माझा ही घटना निर्माण करणाऱ्यांबद्दलचा आदर वाढतो. किंबहुना, घटना समितीबद्दलच्या आणि विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेनं माझं मन दाटून येतं.

अध्याय पहिला :

मी आत्ता कॅलिफोर्नियात आहे आणि तिथूनच सहभागी होतोय. माझं सगळ्या मानवजातीला, विशेषतः तरुणांना एक आवाहन आहे. विशेषतः माझ्या विद्यार्थ्यांकडून माझी अशी अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या परिवारातल्या अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांसह एकजूट दाखवून या मोर्चात भाग घ्यावा, कारण आपण सगळे एकाच परिवाराचे, कुटुंबाचे घटक आहोत, याची मला खात्री आहे.

  1. आरक्षणातून उभे राहणारे संघर्ष, तक्रारी, दुखणी-गाऱ्हाणी यांची मला पूर्ण कल्पना आहे. पण तरीही, आरक्षण चालू रहायलाच हवं. काही बदल आणि सुधारणा करायच्या असल्या तरी त्या घटनेच्या चौकटीत राहूनच व्हायला हव्या.
  2. अत्याचार प्रतिबंधक कायद्यानं मिळणारं संरक्षणही आवश्यकच आहे आणि तेही चालूच रहायला हवं. काही समाजविघातक शक्तींकडून या कायद्याचा कधी कधी दुरुपयोग होतो, ही बाब दुर्दैवानं खरीच आहे, हे मान्य करावंच लागेल. पण त्यामुळे हा कायदाच मुळातून रद्द करावा, असं म्हणणं योग्य नाही. त्याऐवजी, त्याचा दुरुपयोग करताच येणार नाही, अशा प्रकारे त्यात कोणते बदल करता येतील याची खुली चर्चा व्हावी आणि एकमतानं निर्णय घेतला जावा.

माझ्या समजुतीप्रमाणं, ‘मराठा क्रांती मोर्चा’मध्येही हीच मागणी मांडण्यात आली होती. याकडे मी सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो.

आणि अर्थातच, कोपर्डीच्या गुन्हेगारांना, स्त्रियांवर होणाऱ्या सगळ्याच अत्याचाराच्या घटनातल्या गुन्हेगारांना विनाविलंब शिक्षा देण्यात यावी.

तेव्हा, मित्रहो, हे मोर्चे म्हणजे ‘जातीय संघर्ष’ किंवा जातीजातींत पुकारली जाणारी लढाई नव्हे.

काही भारतविरोधी शक्तींना अशा लढाया भडकायला हव्या आहेत आणि त्यासाठी त्यांचे नेटानं प्रयत्न चालू आहेत. पण त्यांनी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले ना, तरी, माझं ऐकून ठेवा, त्यांना कधीही यश मिळणार नाही. भारत तोडायला आपल्याला कुठल्याही बाहेरच्या शक्तींची गरज नाही. आपण स्वतःच स्वतःचे अगदी पक्के शत्रू होऊ शकतो, आणि कधी कधी होतोही!

अध्याय दुसरा :

व्ही.एस्. नायपॉल हे कॅरिबियन बेटांवर वास्तव्य करणारे, मूळ भारतीय वंशाचे लेखक. ‘हयात असलेल्यांपैकी सर्वात थोर इंग्रजी कादंबरीकार’असं त्यांचं यथार्थ वर्णन केलं जातं. त्यांनी त्यांची भारतीय मुळं कधीच नाकारली नाहीत. उलट, त्यांनी ती पूर्णतः जाणूनबुजून जपली आणि प्रसंगी अभिमानानं मिरवली देखील.

नायपॉल ठराविक काळाच्या अंतरानं भारताला भेट देत असत. दर भेटीतून त्यांचं भारतावरचं नवं पुस्तक जन्म घेत असे. साठच्या दशकात भारत त्यांना ‘काळोखाची भूमी’ (Area of Darkness) भासला. सत्तरच्या दशकात, अगदी अचूक सांगायचं तर आणीबाणीच्या कालखंडात ते आले असताना भारत त्यांना ‘एका घायाळ संस्कृती’च्या रूपात दिसला – (India – A Wounded Civilisation). त्यानंतर ते आले गेल्या शतकाच्या शेवटच्या म्हणजे नव्वदच्या दशकात. त्यांच्या या भारतभेटीदरम्यान मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी संवाद साधण्याचं अहोभाग्यही मला लाभलं. या भेटीत भारताचं रूप बदलल्याचं त्यांना जाणवलं. त्याचं वर्णन त्यांनी ‘भारत-लाखो बंडखोरांचा देश’ (India – A million Mutinies Now) अशा शब्दांत केलं.

सद्यस्थितीत भारतात नेमकं हेच घडतं आहे. विविध कारणांवरून होणारी लक्षावधी बंडं किंवा ‘विद्रोह’ आपल्या डोळ्यांसमोर आकार घेत आहेत. त्यातून वेदना जन्म घेते आहे, नाना तऱ्हेचे संघर्ष पेटण्याची लक्षणं दिसताहेत, हे खरंच आहे; पण हे विद्रोह अटळ आहेत. आणि त्यातून अखेरीस काहीतरी चांगलं, भरीव, कल्याणकारक असं निष्पन्न होणार आहे, याविषयी मला खात्री आहे. एक नवा भारत उदयाला येतो आहे. पण तो ‘नवा’ असला तरी त्याचा गाभा तोच आहे, त्याच्या प्राचीन चिरंतन आत्म्याचं अस्तित्व अभंग आहे.

या नव्या भारताच्या जडणघडणीचा मूलभूत आधार आहे, भारताची राज्यघटना. आपण सर्वांनी आपल्या घटनेचं प्राणपणानं संरक्षण, संवर्धन आणि सन्मान केला पाहिजे. मी जेवढा आपल्या राज्यघटनेचा खोलवर अभ्यास करतो, तेवढा माझा ही घटना निर्माण करणाऱ्यांबद्दलचा आदर वाढतो. किंबहुना, घटना समितीबद्दलच्या आणि विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेनं माझं मन दाटून येतं.

डॉ. आंबेडकरांनी जेव्हा घटना ‘आम्ही भारतीय लोक’ असे शब्द वापरून भारताच्या जनतेलाच अर्पण केली, तेव्हा त्यांना एक प्रश्न् विचारण्यात आला होता- ‘ही राज्यघटना काय दर्जाची आहे?’ तेव्हा त्या दूरदृष्टीच्या महान विद्वानानं दिलेलं उत्तर होतं -‘ही घटना अंमलात आणणारे नागरिक जेवढे चांगले अथवा वाईट असतील, ज्या दर्जाचे असतील, तेवढी ही घटना चांगली अथवा वाईट ठरेल.’ फार फार पूर्वी उच्चारलं गेलेलं एक वचन आहे -‘लोकशाहीत लोक ज्या लायकीचे असतील, त्या लायकीचं सरकार त्यांना मिळतं.’ हे जुनं वचन आणि डॉ. आंबेडकरांचं उत्तर, दोन्ही एकत्र लक्षात घेतलंत की तुम्हाला एक धक्कादायक, स्फोटक जाणीव होते.

आपली घटना उत्तम, नव्हे, थोर आहे, असं आपण सारे मिळून सिद्ध करून दाखवू या. कारण, आपण थोर आहोत, आणि म्हणून प्रगल्भ लोकशाहीला लायक आहोत.

शेवटी 26/11 हा दिवस अतिरेकी हल्ल्याचा स्मृतिदिन म्हणून लक्षात ठेवण्यापेक्षा मुळात ‘घटना दिन’ म्हणून साजरा करणं जास्त योग्य ठरेल. अतिरेक्यांचा आणि दहशतवादाचा निःपात होईलच. भारताचा आणि भारतीय लोकशाहीचा विजय होईल!

जय हिंद!

भारतमातेचा विजय असो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *