बॉब डिलन : एक अवलिया

टाय लावलेला बॉबी आपण कल्पना करू शकत नाही. मनाने तो भटक्या आहे. त्यामुळेच रस्त्यावर वेगाने प्रवास करणे त्याला आवडते. तो म्हणतो की, ‘‘छोट्या शहरांमध्ये टेबल खेळणारे छोटे क्लब असतात. तिथे जर वेळ घालवलात तर तुम्हाला छोट्या शहरांबद्दल बरीच माहिती मिळू शकते. जो बाझप्रमाणेच तो सगळा स्वतःचा वेळ स्वतः बरोबर घालवतो. तो जास्त काम करत नाही. वर्षभरात तो कायम प्रवास करत असतो आणि त्याच्या व्यवस्थापकांनी घेतलेल्या घरात राहतो. न्यूयॉर्कपासून शंभर मैलांच्या दूरवर तिथे बसून तो गाणी लिहितो. कवितांवर काम करतो. नाटक-कादंबऱ्या लिहितो. मोटार सायकल चालवतो. मित्रांना भेटतो आणि अधूनमधून कोलंबियाच्या कार्यालयात येऊन गाणी रेकॉर्ड करतो.’

 

          बॉब डिलनला नुकतेच नोबेल पारितोषिक मिळाले. पण त्याने नंतर झालेल्या कार्यक्रमात याचा उल्लेख केला नाही, इतकेच नव्हे तर दोन तीन दिवस त्याच्यावर प्रतिक्रियाही दिली नाही. या साऱ्यामुळे एक वेगळी अस्वस्थता निर्माण झाली. बॉब डिलनच्या चाहत्यांना आणि त्याच्या गाण्यावर प्रेम करणाऱ्यांना याचे आश्चर्य वाटले नाही. कारण त्यांच्या दृष्टीने बॉब हा खरा कलावंत आहे. आणि कलावंताला कुठलेही मान-सन्मान किंवा पैशापेक्षा हवे असते ते लोकांचे प्रेम आणि त्याची पोचपावती. ही पोचपावती त्याला बरीच वर्षे आधी मिळाली आहे.

बॉब हा 80 च्या घरात आहे तरीही तो आज बसने आणि स्वतःच्या विमानाने जगभर प्रवास करून मैफिली सजवत असतो. चाहत्यांची तिसरी आणि चौथी पिढी आता त्यांची गाणी ऐकायला येतात. त्याची तिकिटे भराभरा संपतात. पण हा बॉब कोण आहे? कसा घडला? इथपर्यंत त्याचा प्रवास कसा झाला? हे जाणून घेण्यासारखे आहे. स्वतः बॉबने ‘क्रोनिकल’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. ‘डाऊन द हायवे’ सारखे सुंदर चरित्र किंवा आणखी चार-पाच चरित्र त्याच्यावर प्रसिद्ध झाली आहेत.

1964 सालच्या त्याच्या ‘प्रोफाईल’मध्ये न्यूयॉर्करचा लेखक हुंतेन लिहितो की, ‘‘संध्याकाळी आम्ही बसलो. साधारण सहा-सातला रेकॉर्डिंग सुरू व्हायचे होते. बॉबने बारा-चौदा गाणी लिहिली होती. रेकॉर्डिंगला सुरुवात झाली. दोन-तीन गाणी त्याने सलग उत्साहाने म्हटली. एका गाण्याच्या वेळी रेकॉर्डिंग थांबवण्यात आले. तेव्हा तो बॉबला म्हणाला चला आता इथून सुरुवात करा तर बॉब म्हणाला नाही मी पहिल्यापासून सुरुवात करणार. तो म्हणाला असे का? तर तो म्हणतो कधी आपण कादंबरीला प्रकरण आठपासून सुरुवात करतो का? पहिल्यापासून सुरुवात करतो ना. या प्रकारे वेगात त्याने रेकॉर्डिंग संपवले. बॉब प्रचंड वेगाने काम करत असे. त्याने स्वतःच असे लिहिलेय की, मी काय करायचो ते वेगाने करायचो. विचार वेगाने करायचो, वेगाने खायचो. वेगात बोलायचो आणि खूप वेगाने चालायचो. मी माझी गाणी देखील वेगाने म्हणत असे. जर मात्र मला गाणे रचायचे असेल तर मात्र मला वेग कमी करावा लागायचा.

त्या काळात 1964 च्या सुमारास बॉब डिलनला एक पारितोषिक देण्यात आले. बॉब सांगतो मला काहीच कल्पना नव्हती. मी इथे गेलो तर माझ्याबरोबरच्या लोकांना त्यांनी आडवले. आम्ही सगळेच साध्या कपड्यात होतो. उलट ते उच्च मध्यमवर्गीय होते. अनेकांनी मिंगचे कोट चढवले होते. रत्नजडित जवाहरे घातली होती. त्यांनी मला बोलायला सांगितले आणि ते सारे जॉन केनडीच्या खुनाबद्दल बोलत होते. केनडीचा खून करणारा मला महत्त्वाचा वाटतो. असे म्हटल्यावर लोकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. मी चेवाने बोलत राहिलो. लोक खूप नाराज झाले. नंतर चॅरिटी इव्हेण्ट होता, म्हणजे देणग्या जमवण्यात येणार होत्या. माझ्यामुळे देणग्या कमी जमल्या असे माझ्या लक्षात आले. मी त्यांना म्हटले की, ‘‘देणगी किती कमी झाली ते सांगा तेवढे पैसे मी भरून देतो. कारण मला वाटते की – पैशाच्या कर्जापेक्षा नैतिक कर्ज मला अधिक त्रासदायक वाटते.’’

बॉब डिलन त्याच्या ‘क्रोनिकल्स’मध्ये म्हणतो, ‘‘मला शब्दात सांगता येणार नाही की मला काय हवे होते. पण मी काहीतरी शोधायला सुरुवात केली. न्यूयॉर्कच्या सार्वजनिक वाचनालयात. त्या प्रचंड मोठ्या इमारतीत वाचनालये होती. अफलातून वास्तूसौंदर्य, संगमरवरी लाद्या आणि भिंती असलेल्या प्रचंड मोठ्या इमारतीत पुस्तके असायची. त्या इमारती पाहताना वाटायचे की विजय आणि आनंदोत्सव साजऱ्या करणाऱ्या इमारती आहेत. वरच्या एखाद्या खोलीत जाऊन मी 1855 ते 1865 मधली दैनिके पाहायला सुरुवात करायचो. मला त्या काळात माणसे दैनंदिन जीवन कसे व्यतीत करत होती हे पाहायचे होते. भाषा आणि वक्तृत्व यातून येणारे विषय मला नको होते. वर्तमानपत्रे मी चाळत होतो. वेगळी वर्तमानपत्रेही मी चाळायचो. ते काही अगदी वेगळे जग होते; असे नाही पण आजचे मी जे जग जगत होतो त्यातली ती अर्जन्सी होती ती मागच्या जगात नव्हती. आणि वर्णद्वेष, गुलामगिरी यासारखे विषय अजूनही कायम होते. सुधारणांच्या चळवळींबद्दलच्या बातम्या होत्या. वाढती गुन्हेगारी, बालमजुरी, कमी वेतनावर करणारे काम धार्मिक पुनर्वृत्तातांच्या चळवळी अशा अनेक बातम्या त्यात होत्या. असे वाटायचे की, या बातम्यांनी वर्तमानपत्रात स्फोट होईल. आणी ते पेट घेतील.

वर्जेनियामध्ये तंबाखूच्या मळ्यावर काम करणारे मजूर त्यांच्या मुलांना विकतात, असेही आरोप वर्तमानपत्रातून होत होते. उत्तरेच्या शहरांमध्ये प्रचंड असंतोष होता. आणि कर्जबाजारीपणा होता. शेतमजूर, तंबाखूच्या शेतमळ्याचे मालक राज्य चालवल्यासारखे तिथे चालवायचे. रोमन सत्तेच्या काळात जशी हुकूमशाही होती. विशिष्ट लोकांचे वर्चस्व होते. उच्चभ्रूंचे तसेच इथेही होते. त्यांच्या ताब्यात लाकडाचे कारखाने होते. दारू गाळणारी दुकाने होती, सारे काही होते. एका प्रकारचे मन दुसऱ्याला विरोध करत असे.

ख्रिश्चन करुणा आणि तत्त्वज्ञानाने बांधलेले मन एकमेकांना विरोध करायचे. विल्यम रॉय हा एक अफलातून वक्ता स्वतः वर्तमानपत्राचा मालक होता आणि बोस्टनसारख्या शहरातून सूचना करायचा. न्यूयॉर्कमधेही दंगे होत असत. यात शेकडो माणसे मेट्रोपॉलिटन ऑपेरा हाऊसमध्ये मरण पावली. आणि या दंग्यांचे कारण काय होते तर अमेरिकन अभिनेत्यांच्या जागी ब्रिटिश अभिनेते आले. बस एवढ्यावरून हाणामारी सुरू होत होती. सिनासिनाटीमध्ये गुलामगिरीविरुद्धची चळवळ सुरू होत होती. बफेलो आणि क्लीव्हलँड या राज्यांमध्ये अशी भावना होती की, जर दक्षिणी राज्य करू लागले तर उत्तरी फॅक्टरीचे मालक मजुरांना मोफत वापरतील. यामुळे ही दंगे सुरू झाले. यानंतर 1850 मध्ये लिंकन आला आणि दक्षिणी प्रेसमध्ये त्याचा उल्लेख बफुन म्हणजे माकड किंवा जिराफ असा केला जायचा. इतरत्र त्याची अर्कचित्रे काढली जायची. कोणीही त्याला गंभीरपणे घेत नव्हते. म्हणजे आज ज्या देशाचा महान राष्ट्रपिता आहे हे सांगून समजले नसते. केवळ भूगोलामुळे आणि धार्मिक कल्पनामुळे एकत्रित आलेली माणसे एकमेकांची किती शत्रू असू शकतात आणि किती कडवट असू शकतात हे तेव्हाचे वर्तमानपत्र वाचल्यावर कळते. नंतर लक्षात येते की हे सारे म्हणजे काळे दिवस होते.

काळे राज्य चालू होते. दुष्मनीचा बदला दुष्मनी, सैतानाचा बदल सैतानी अशी चळवळ चालू होती. हे सारे म्हणजे एक शोकात्मक गाणे होते. पण त्याच्यामध्ये अनेक चुकीचे पॅरेग्राफ होते. अनेक बुद्धिमान माणसे होती पण ती तशी काही कामाची नव्हती. कुठली एक कल्पना त्या काळात सर्वांना व्यापून नव्हती. कुठलेही एक अभिजात मूल्य लोकांना माहीत नव्हते. राष्ट्रियता आणि देशप्रेम या बद्दलची पोकळ भाषणे सुरू होती. अगदी दक्षिणी बायकाही चेकाळल्या होत्या. स्त्रियांबाबत जे काही झाले ते दुर्दैवाचे होते. अनेक स्त्रिया आणि मुलांना भुकेने मरण्यासाठी मळ्यावर सोडून देण्यात आले. अनेकांवर अत्याचार झाले त्यांचे दु:ख आणि त्यांना झालेली शिक्षा ही निरंतर चालू होती. हे इतके अविश्वसनीय, इतके बेकार होते की विश्वास बसत नव्हता. अगदी काळाच्या संकल्पनेबद्दल लोकांचे मतभेद चालू होते. दक्षिणीमध्ये लोक मस्त सूर्योदय-दुपार-संध्याकाळ अशी जगत होती तर उत्तरेमध्ये माणसे घड्याळ्याच्या काट्यागणिक जगत होते. फॅक्टरीचा घंटानाद व्हायचा किंवा भोंगा वाजायची तशी माणसे कामाला जायची. दक्षिणी लोकांची वेळेत असणे ही गरज होती. यादवी युद्ध हे खरेतर दोन प्रकारच्या काळामधले युद्ध होते. गुलामगिरीचा नि:पात हा काही हेतू नव्हता. ‘होर्ड सेंटर’मधून पहिली गोळी सुटली ती त्यासाठी नव्हे. हे सारे बघून आता माझ्या मनाला उद्विग्नता आली. ज्या काळात मी जगत होतो, तो काळ या काळाशी अजिबात नाते सांगणारा नव्हता. पण थोडे नाही बहुतेक कमी-अधिक प्रमाणात. जो काळ मी जगत होतो त्यातले मानसशास्त्रीय तत्त्व थोडेसे याच्याशी जुळून आले होते. तुम्ही थोडा प्रकाश टाकलात तर तुम्ही पाहू शकत होतात की, मानवी मन किती वेगळे असू शकते. अमेरिकेला क्रुसावर चढवून त्याचा मृत्यू झाला होता आणि पुनरावृत्ती झाली होती. या साऱ्या कल्पनांनी तेव्हा माझे डोके भरले होते. आणि त्यातूनच मी नव्या गाण्याकडे वळलो.’’

एकंदरीत ‘फॉक’ या शब्दामधील फॉक याचा अर्थ होतो ‘ग्रामीण एकसंघ समुदाय’. ज्याच्यामध्ये जे संगीत तयार होते ते अनामिकाने लिहिलेले असते. आपली जर लोकगीते घेतली तर ती कोणी लिहिलीत ते आपल्याला माहीत नसते. काही अपवाद सोडता. उदा – बहिणाबाईची गीते, बानू तुला देव कोणाचे घरी ग? हे गाणे कोणी लिहिलेय सांगता येईल का? किंवा ‘पिंगा ग बाई पिंगा ग’ अशी कितीतरी गाणी आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेतही आणि देशोदेशी लोकसंगीताची ही परंपरा होती. त्याचा अर्थ होतो कुठल्याही व्यक्तीने हे गाणे किंवा संगीत रचलेले नाही. तर परंपरेने वंश परंपरागत अनेक पिढ्यान्‌पिढ्या ही गाणी चालत येतात.

1964 च्या सुमारास लेखक लिहितो की, ‘‘मात्र अलीकडे लोकसंगीत व्यक्तिगत होण्याची तऱ्हा सुरू झाली आहे. इतकेच नव्हे तर त्याला कॉपीराईटही लागू लागले आहेत म्हणजे अमक्या अमक्याने हे गाणे लिहिले आणि रचले असे. यातली अनेक गाणी ग्रामीण तर नाहीतच किंवा शतकानुशतके आलेल्या परंपरेशी त्यांचा काही सबंध नाही. ही खरेतर ग्रामीण लोकसंगीताने म्हटलेली गाणी आहेत. थोडासा सराव करून तशी गाणी रचता येतात, म्हणता येतात. ग्रामीण भागातील गाण्यांचे लोकसंगीताशी जे नाते होते ते ही गाणी कॉपी करतात. यामध्ये कलावंत स्वतःच गाणी लिहितात, त्याला चाली लावतात, त्यामध्ये स्वतःला हवे असलेले विषय निवडतात. स्वतःला ज्या गोष्टीबद्दल आस्था आहे त्यांच्याबद्दल विधाने करतात. जी तरुण पिढी हे करतेय तिला परंपरागत संगीत ऐकणाऱ्याचा पाठिंबा आहे. त्यामुळे काही तरुण यात लोकप्रिय झाले. त्यातील एक होती जो बाझ. ती स्वतःची गाणी स्वतः लिहीत नाही. पण खूप परंपरागत चालत आलेली गाणी आपल्या कार्यक्रमात निवडते. ती वर्णद्वेष किंवा लष्करशाहीबद्दल बोलत नाही. ती काही विषय निवडून गाणी रचते. तिचा आवाजही शुद्ध, मोकळा आणि दिलखेच आहे. तिच्या एका गाण्यात तर तिने छोट्या खोक्यांचा उल्लेख केला आहे. अशाच गायकांपैकी दुसरा अलीकडील लोकप्रिय गायक म्हणजे – बॉब डिलन. तो 23 वर्षांचा आहे. आणि तरीही त्याचा मोठा ठसा तरुण पिढीवर आहे. याचे कारण तो स्वतःच स्वतःची गाणी लिहितो आणि ती गाऊनही दाखवतो. ‘ब्लोईंग इन द विंड’, ‘मास्टर्स ऑफ वॉर थिंक टॉईज्’ सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी गाणी लोकप्रिय झाली.’

‘जो बाझदेखील त्याची गाणी गात असे. कधी कधी दोघेही एकत्र ही गात. जो बाझ त्याच्या गाण्याबद्दल म्हणतो, ‘‘बॉबी मी आणि माझ्या पिढीच्या लोकांना जे काही वाटते ते व्यक्त करतो आहे. आम्हाला जे म्हणायचे आहे ते त्याच्या शब्दातून व्यक्त होत आहे. त्याची बरीचशी निषेधात्मक गाणी वर्णद्वेष ही खरेतर आचरट गाणी आहेत. त्याच्यात कुठलेही सौंदर्य नाही. आणि अशी गाणी आजूबाजूचे लोक लिहीत आहेत. पण बॉबीच्या गाण्यामध्ये मात्र काव्य, सुंदर संगीत आणि जबरदस्त काव्य यांचा मेळ झालेला दिसतो. माय गॉड हा मुलगा काय गातो असे ती म्हणते. जो बाझ वयाने त्याच्यापेक्षा मोठी आहे. बॉबीची पर्सनॅलिटी तणावपूर्ण थोडीशी लहान मुलासारखी आणि खळखळीत आहे. हकलबरी फिन आणि तरुणपणीचा उडी गुथारी यांचे त्याच्यात मिश्रण आहे. स्टेजवर आणि बाहेरही त्याची खळखळती ऊर्जा कशी वापरावी या संभ्रमात तो असतो.’

तो नेहमीच साध्या देखण्या कपड्यांमध्ये असतो. टाय लावलेला बॉबी आपण कल्पना करू शकत नाही. त्याच्याकडे फार कमी स्वतःच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये मोटारसायकल ही आहे. मनाने तो भटक्या आहे. त्यामुळेच रस्त्यावर वेगाने प्रवास करणे त्याला आवडते. तो म्हणतो की, ‘‘छोट्या शहरांमध्ये टेबल खेळणारे छोटे क्लब असतात. तिथे जर वेळ घालवलात तर तुम्हाला छोट्या शहरांबद्दल बरीच माहिती मिळू शकते. जो बाझप्रमाणेच तो सगळा स्वतःचा वेळ स्वतः बरोबर घालवतो. तो जास्त काम करत नाही. वर्षभरात तो कायम प्रवास करत असतो आणि त्याच्या व्यवस्थापकांनी घेतलेल्या घरात राहतो. न्यूयॉर्कपासून शंभर मैलांच्या दूरवर तिथे बसून तो गाणी लिहितो. कवितांवर काम करतो. नाटक-कादंबऱ्या लिहितो. मोटार सायकल चालवतो. मित्रांना भेटतो आणि अधूनमधून कोलंबियाच्या कार्यालयात येऊन गाणी रेकॉर्ड करतो.’

याच लेखात लेखक म्हणतो, ‘‘काही आठवड्यापूर्वी बॉबीने मला रेकॉर्डिंग सेशनसाठी बोलावले. कोलंबिया स्टुडिओच्या 52 रस्त्यावर हा रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. तो येण्याआधीच टॉम विल्सन नावाच्या माणसाने मला स्वतःची ओळख करून दिली. तो डिलनचा रेकॉर्डिंग प्रोड्यूसर होता. थोड्याच वेळात दोन इंजिनिअर आले आणि त्यांनी कंट्रोल रूमचा ताबा घेतला. विल्सनने लांबलचक टेबलावर पाहिले दोन्ही बाजूला इंजिनिअर उभे होते. स्टुडिओ तसा मोकळाच होता आणि डाव्या हाताला मायक्रोफोन लटकत होते. समोरच म्युझिक स्टँड होता आणि त्याला दोन माईक लावले होते. बाजूला मोठा पडदा होता. आणि हा बॉबी पडदा बॉबीला दडवणार होता. जेणेकरून त्याला एखाद्या गाण्याची चाल मनासारखी नाही वाटली तर तो पुन्हा गाऊ शकेल. विल्सनने एनटॉपला सांगितले – आज तो काय रेकॉर्ड करणार आहे अजून मला माहीत नाही. गेल्या दोन महिन्यात लिहिलेली गाणी तो गाणार आहे. एनटॉपने विचारले बॉबीच्या गाण्यामध्ये कधी अडथळा येतो का? काही समस्या उद्भवतात. विल्सन म्हणाला नाही माझा मुख्य प्रश्न असतो तो बॉबीला माईक समोर ठेवायचा कारण तो सतत सळसळत असतो आणि उत्तेजित झाल्यावर तो किंचित दूर जातो आणि त्यामुळे आवाज बारीक येऊ लागतो. एवढे सोडले तर दुसरी कुठलीही समस्या नाही. माझ्या समोरची दुसरी समस्या असते ती म्हणजे – जे काही सेटिंग भोवती आहे त्याच्यात तो खुश व्हावा त्याला आरामदायक वाटावे. उदा. आता जर हा पडदा त्याला त्रास देऊ लागला तर मला तो काढून टाकता आला पाहिजे. कदाचित त्यामुळे आवाजावर परिणाम होईल पण तरीही हे करावे लागते. बॉबीने दरवाजाकडे पहिले आणि म्हणाला आजच्या रेकॉर्डिंगबद्दल मी जरा काळजीत आहे कारण ते हा पूर्ण अल्बम एका सेशनमध्ये पूर्ण करायचा आहे. हे फारच मोठे आव्हान आहे. साधारणपणे आम्ही कधी एवढ्या घाईत काम करत नाही. पण हा अल्बम कोलंबियाच्या रिलीजसाठी तयार होणे आवश्यक आहे. अशा काही अडचणीच्या वेळा सोडल्या तर बॉबी कधीच आधी ठरवून रेकॉर्डिंग करत नाही. आम्हाला असे वाटते जेव्हा त्याला रेकॉर्डिंग करायचे असेल तेव्हा त्यांनी सांगावे. आम्ही त्यासाठी स्टुडिओ मोकळा ठेवतो. कारण आमच्या मते तो तेवढा मोठा आहे.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *