पाकमधील खांदेपालट

काश्मिर व भारताचे शत्रुत्व हा पाकसेनेसाठी प्राणवायू आहे. तो मुद्दा सोडला, तर पाकसेनेची उपयुक्तता शून्य होते. आज त्या देशातल्या सेनेला असलेले महत्त्व भारताच्या शत्रुत्वात सामावलेले आहे. म्हणूनच भारताशी मैत्रीपूर्ण संबंधांना नवे लष्करप्रमुख बाजवा हातभार लावतील, अशी अपेक्षा कोणी करू शकत नाही. ते निव्वळ दिवास्वप्न आहे. पण आजच्यासारखी युद्धजन्य स्थितीही नव्या लष्करप्रमुखांना परवडणारी नाही.

 

अखेर पाकिस्तानात लष्करी खांदेपालट झाला असे म्हणायला हरकत नाही. कारण दीर्घकाळ त्याविषयी शंका घेतल्या जात होत्या. प्रामुख्याने मावळते लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ़, यांना युद्धाची खुमखुमी होती. म्हणूनच त्यांनी गेल्या काही महिन्यांत पद्धतशीरपणे नियंत्रण रेषेवर आणि काश्मिरात वातावरण तापत जाईल, असा खेळ चालविला होता. त्यांचे चुलते आणि एक भाऊ भारताशी लढताना ठार झालेले असल्यानेच, त्यांच्या सूडभावनेला व्यक्तिगत धार होती. पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. आपल्या कारकिर्दीत भारताशी युद्ध व्हावे आणि भारताच्या ताब्यात असलेला काश्मिरचा काही प्रदेश बळकावण्याचा पराक्रम त्यांना करायचा होता. त्यासाठीच त्यांनी काही योजना व व्यूहरचना केलेली होती. त्यानुसारच सीमेवरील घुसखोरी वाढवण्यात आलेली होती. तसेच काश्मिरच्या खोऱ्यात पाक हस्तकांना सतत चिथावणीखोर कृत्ये करण्याच्या कामाला जुंपलेले होते. त्याखेरीज दंगल सदृश स्थिती निर्माण करून तिथले जनजीवन उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेले होते. एकूणच भारत सरकारला आतले आणि बाहेरचे युद्ध अशक्य करून सोडण्याची ही रणनीती होती. त्यात जनरल शरीफ़ खूप यशस्वीही झालेले होते. कारण पंतप्रधानपदी मोदी आल्यापासून दोन देशात सौहार्द निर्माण करण्याचा दोन्ही देशाच्या नेतृत्वाने केलेला प्रयास हाणून पाडण्यात राहिल यांच्या कारवाया यशस्वी झाल्या होत्या. मग नवाज शरीफ़ यांना माघारही घ्यावी लागली होती. किंबहुना आपली खुर्ची टिकते की नाही, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण करण्यातही राहिल यशस्वी झालेले होते. मनमोहन सिंग सत्तेत असते तर एव्हाना पाकिस्तानात उलथापालथ झाली असती आणि पाकसेनेने  काश्मिरात रक्तपातच घडवून आणला असता. पण मोदी सरकारच्या डावपेचामुळे ते होऊ शकले नाही आणि राहिल शरीफ़ यांना आपला गाशा गुंडाळावा लागला आहे.

उरीची घटना महत्त्वाची होती. पठाणकोट घडल्यानंतरही दोन्ही देशांत बोलणी करण्याचा विचार चालू होता. त्याला शह देण्याच्या घाईतून राहिल शरीफ़ यांनी अतिरेक केला आणि भारताला पाकशी बोलणीच बंद करण्याची पाळी आली. त्यात नवे काहीच नाही. यापूर्वीही असे अनेकदा झालेले आहे आणि काही काळानंतर नव्याने बोलणी करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. त्यामुळेच पठाणकोट पचल्यावर राहिल शरीफ़ यांना जोश चढला आणि उरीचा उत्पात झाला. तिथे सक्रिय होऊन पाकला उत्तर देण्याची गरज भारतासमोर निर्माण झाली. ती गरज असेल तर आक्रमक पाऊल उचलणारा नेता भारताचे नेतृत्व करतोय, हे राहिल शरीफ़ विसरले आणि सगळा घोळ झाला, उरीला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आणि राहिल यांचा सगळा बेत फसला. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकला प्रत्युत्तर देणे म्हणजे युद्धाला आमंत्रण होते आणि तितकी सज्जता पाकपाशी नव्हती. म्हणूनच आधी सर्जिकल स्ट्राईक नाकारला गेला. नंतर प्रत्येक कुरापतीला भारत चोख प्रत्युत्तर देऊ लागला. तेव्हा राहिल शरीफ़ यांची कोंडी होत गेली. पाकला युद्धात ढकलण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती आणि नागरी सरकारही त्यांच्या विरोधात जाऊ लागले होते. त्यामुळेच लष्करी बंड करून सत्ता ताब्यात घेणे, किंवा निमूट निवृत्त होणे भाग होते, इतकाच एक पर्याय त्यांच्यापुढे होता. पण गेल्या दोन महिन्यात प्रत्येक कुरापतीला दामदुप्पट उत्तर मिळत गेल्याने, त्यांचा नाईलाज झाला आणि गुपचुप निवृत्तीचा पर्याय त्यांनी स्वीकारला. म्हणूनच पाकिस्तानात शांततापूर्ण खांदेपालट झालेला आहे. मात्र आपल्या जागी आपल्याच पसंतीचा लष्करप्रमुख आणण्यात राहिल शरीफ़ यशस्वी झाले आहेत. त्यामुळे हा बदलाने भारताला जिहादी हिंसेच्या कटकटीतून मुक्ती मिळाली, असे मानायचे कारण नाही. पण निदान नव्या अधिकाऱ्याला बस्तान बसवायला वेळ लागेल हे नक्की.

लेफ्टनंट जनरल कमर जावेद बाजवा हे पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख आहेत आणि ते अत्यंत व्यावसायिक सेनाधिकारी असल्याची ग्वाही भारताचे माजी सेनाप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनीच दिलेली आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रसंघाच्या शांतिसेना पथकामध्ये बाजवा यांनी विक्रमसिंग यांच्या नेतृत्वाखाली काम केलेले आहे. त्यामुळेच आज विक्रमसिंग काय म्हणतात, त्याला महत्त्व आहे. व्यावसायिक सेनाधिकारी म्हणजे धार्मिक वा व्यक्तीगत अजेंडा नसलेला अधिकारी, असे़च त्यांना म्हणायचे आहे. राहिल शरीफ़ यांच्याप्रमाणे व्यक्तिगत सूडबुद्धीने हा नवा पाक सेनाप्रमुख काम करील, अशी विक्रमसिंग यांची अपेक्षा नाही. त्याचा अर्थ आपली कारकिर्द पाकिस्तानला लांच्छनास्पद ठरू नये आणि आपल्यासाठी अभिमानास्पद ठरावी; यासाठी बाजवा काम करतील असे गृहीत धरायला हरकत नाही. त्याचा अर्थ असा, की पाकिस्तानच्या आजच्या सुरक्षा दुर्दशेतून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न बाजवा करू शकतील. काश्मिरचा मुद्दा घेऊन सतत भारतविरोधी उचापती करताना पाकला आपल्या इतर सुरक्षांकडे काणाडोळा करावा लागला आहे. त्यातूनच बलुचिस्तान वा अन्य टोळीवादी लोकसंख्येचे शत्रुत्व पाकसेनेने ओढवून घेतले आहे. परिणामी त्यांच्या पश्चिम सीमा व अन्य प्रदेशात अशांतता माजली आहे. तिथे शांतता निर्माण करायची, तर अधिकाधिक प्रयत्न पाकसेनेला करावे लागतील. त्यासाठी काश्मिरच्या भारतीय सीमेवर उभी केलेली सेना व चाललेल्या उचापतींना विश्रांती द्यावी लागेल. त्याचा अर्थ भारताला डोकेदुखी कमी करणे असा आहे. तसे होऊ शकले तर पाकिस्तानातील नाराज बलुची, सिंधी वा अन्य प्रांतीय वादाचा लाभ उठवण्याचे भारताचे उद्योग थांबू शकतात. त्यामुळे पाकसेनेवर येणारा ताण कमी होऊ शकतो. परिणामी पाकिस्तानातील अशांतता कमी होण्यासाठी तातडीचे उपाय अंमलात आणण्याची सवड जनरल बाजवा यांना मिळू शकते.

काश्मिर व भारताचे शत्रुत्व हा पाकसेनेसाठी प्राणवायू आहे. तो मुद्दा सोडला, तर पाकसेनेची उपयुक्तता शून्य होते. आज त्या देशातल्या सेनेला असलेले महत्त्व भारताच्या शत्रुत्वात सामावलेले आहे. म्हणूनच भारताशी मैत्रीपूर्ण संबंधांना नवे लष्करप्रमुख बाजवा हातभार लावतील, अशी अपेक्षा कोणी करू शकत नाही. ते निव्वळ दिवास्वप्न आहे. पण आजच्यासारखी युद्धजन्य स्थितीही नव्या लष्करप्रमुखांना परवडणारी नाही. आपले बस्तान बसवून राजकीय संस्था व यंत्रणांवर आपली हुकूमत प्रस्थापित करायला, बाजवा यांना थोडा वेळ लागणार आहे. ते जितके नवाजझ शरीफ़ यांनी नेमलेले प्रमुख आहेत, तितकेच राहिल शरीफ़ यांच्याही विश्वासातले मानले जातात. म्हणूनच तत्काळ कुठल्याही भारतविषयक धोरणात आमूलाग्र बदलाची शक्यता नाही. पण हळुहळू आपला अधिकार प्रस्थापित करणारा नेता, ज्येष्ठाच्या सावलीतून बाहेर पडत असतो. भारताशी युद्ध शक्य नसेल, तर निदान उर्वरीत पाकिस्तानात एकजूट व शांततेचे श्रेय मिळवण्याकडे बाजवा यांचा कल असू शकतो. त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीत बाजवांना घोड्यावर मांड ठोकायला तीन महिने तरी लागतील आणि तितका काळ भारताला त्यांच्याशी दोन हात करायची रणनीती आखायला सवडही मिळू शकते. त्यामुळेच आगामी काही महिने भारत-पाक सीमेवरच्या उचापती कमी होतील आणि दरम्यान नवाझ शरीफ़ यांच्याशी बाजवा यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, तर दोन देशातील संबंधांना नवे वळण मिळण्याचीही अपेक्षा करता येईल. पण सध्या तरी ती दूरची गोष्ट आहे. राहिल शरीफ़ यांनी निर्माण केलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पुढल्या महिन्यात बाजवा काय करतात बघायचे. त्यात कुठलाही लाक्षणिक फ़रक पडला नाही, तर एकाच ताग्यातल्या कपड्याचे गणवेश परिधान केलेला नवा लष्करप्रमुख, असेच बाजवा यांचे वर्णन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *