दक्षिण डकोटा -एक गूढ रहस्य!

‘लाँग विकेंड’ची चाहूल लागली की ऑफिसमध्ये चर्चा सुरू. कोण कुठे जाणार फिरायला याची. एक मैत्रीण म्हणाली आईला भेटायला ‘साऊथ डकोटा’ राज्यातल्या ‘रॅपिड सिटी’ ह्या शहरात जाणार. आमच्या शेजारचंच हे राज्य. पण तसं जरा बेतासबात आहे असं ऐकून होतो. सगळा प्रेअरी प्रदेश. सरळसोट रस्ते, ना चढ ना उतार. रस्त्याच्या दोनही बाजूला नजर जाईल तिथं वर फक्त शेतजमीन. आणि कडाक्याच्या थंडीत ह्या हिरव्यागार शेतजमिनीवर फूटभर स्नो! एकूणच दुर्लक्षित, भकास, बकाल आणि गूढ अशी समजूत. माझी हीच समजुत ह्या मैत्रिणींनी मोडून काढली आणि जणू मला दृष्टांतच दिला. एक एक करत तिने मला इंटरनेटवरून सगळ्या प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवून आणली. ऑफिस संपवून घरी पोचते ना पोचते तोच मी सगळा प्लॅन आखला आणि पुढच्याच वीकेंडला आमची गाडी सुसाट सुटली ते रॅपिड सिटीच्या दिशेनी.

साऊथ डाकोटाच्या ट्रिपमधलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे ‘बॅड लँड्स नॅशनल पार्क’. ट्रिपची सुरुवात ह्याच पार्क पासून करायची ठरवली. आदल्या दिवशी जवळजवळ 6 तास प्रवास आणि दुसऱ्या दिवशी साधारण 2 तासात बॅड लँड्स गाठायचं असं ठरलं. हा 2 तासांचा प्रवास केवळ अविस्मरणीय. सरळसोट रस्ता आणि दुतर्फा केवळ फूटभर उंचीचं गवत. सकाळच्या सूर्यप्रकाशात अगदी सोनसळी दिसत होतं. हे होतं ‘अमेरिकन नॅशनल ग्रासलँड’. लाखो एकर नुसतं गवतच गवत. एकही झाड नाही, पान नाही की झाडाची वाळलेली फांदी नाही. एक स्वच्छ आणि स्पष्टं चित्रं. हे सगळं चित्रं डोळ्यांत सामावून घेत होते, फोटो काढत होते आणि अचानक फोटो फ्रेममध्ये उंच, टोकदार, टेकड्यांसारखी रचना दिसली आणि बॅड लँड्स जवळ आल्याचा सिग्नल मिळाला.

अब्जावधी वर्ष तीव्र वातावरणाचा सामना करणाऱ्या पर्वतरांगांची कहाणी म्हणजे बॅड लँड्स नॅशनल पार्क. भौगोलिक जमाखर्च म्हणजे बॅड लँड्स. नदी, समुद्र आणि पर्यावरणातील इतर घटकांमुळे इथे सुरुवातीला डोंगररांगांची निर्मिती झाली. पण ही निर्मिती काही एका दिवसांत झाली नाही. वेगवेगळ्या घटकांनी जमा केलेले थर एकावर एक चढत गेले आणि ह्या डोंगरांची निर्मिती झाली. साहजिकच घटक वेगळे असल्यामुळे प्रत्येक थराचा रंग निराळा. एकीकडे निर्मिती होत होती आणि दुसरीकडे धूपदेखील. जवळजवळ प्रत्येक वर्षी एक इंच धूप होते. ह्या धुपेमुळे डोंगराला वेगवेगळे आकार आले आहेत. लांबून पाहिलं तर अक्षरशः वळकट्या पडल्यात असं वाटतं. जवळ गेल्यावरती एक एक वळकटी म्हणजे जवळपास एका डोंगराएवढी दिसते. असे एकदोन डोंगर नाहीत तर अडीच लाख एकर पसरलेली हि पर्वतरांग आहे. ह्या पर्वतरांगांमधून वाट काढून जाणं केवळ अशक्यं. त्यामुळे ह्यांना ‘बॅड लँड्स’ नाव पडलं. ‘Bad Lands to Travel through’. ह्या नॅशनल पार्कमध्ये आपले वाहन घेऊन वेगवेगळ्या स्पॉट्सवर थांबत, फोटो काढत, दोन अडीच तासात सगळं बघून होतं.

बॅड लँड्स बघून रॅपिड सिटीमध्ये मुक्कामी सामान ठेवलं आणि पुढे ‘माउंटरशमोर’ च्या दिशेनी निघालो. रॅपिडसिटीपासून अर्ध्याच तासावर ‘कीस्टोन’ नावाचं छोटंसं गाव आहे. माऊंटरशमोरच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव. जेमतेम 50 कुटुंबं. दक्षिण डकोट्यात पर्यटनाला चालना मिळावी आणि लोकं व्यवसायउद्योगाला लागावेत ह्या हेतूनी डोआनरॉबिन्सन ह्यांनी माऊंटरशमोरमध्ये भव्यं ‘नीडल्स’ कोरण्याची कल्पना सुचवली. परंतु रचनाकार गटझनबोरग्लम ह्यांनी ही कल्पना खोडून काढली. कारण ह्यानी डल्स कोरण्यासाठी रशमोरचा ग्रॅनाईट अत्यंत ठिसूळ आणि दुय्यम दर्जाचा होता. शेवटी राष्ट्रहिताची आणि जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित करतील अशी रचना साकारण्याचे ठरले. आणि ते म्हणजे स्वतंत्र अमेरिकेचे पहिले चार राष्ट्राध्यक्ष! अनुक्रमे जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफर्सन, थिओडोर रूस वेल्ट आणि अब्राहम लिंकन. 60 फूट उंचीचे हे चेहरे लांबूनही सुबक आणि ठसठशीत दिसतात. राष्ट्रीय निधी उपलब्ध झाल्यापासून 1937 ते 1941 सालापर्यंत हे काम अहोरात्र चालू होतं. 1940 मध्ये गटझन यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा लिंकन बोरग्लम ह्याने कामाची धुरा स्वीकारली. परंतु पुढे अपुऱ्या निधीमुळे केवळ चेहरे कोरण्यात आले. ही संपूर्ण कलाकृती आग्नेय दिशेला तोंड करून उभी आहे. जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाशानी ही कलाकृती उजळून निघेल. ह्या कलाकृतीसमोर उभं राहिल्यावर ते चार चेहरे नुसते चेहरे राहिले नाहीत तर ते बोलके झाले आणि इतिहास पुन्हा जागा झाला.

एकीकडे माऊंटरशमोर तर एकीकडे ‘क्रेझी हॉर्स मेमोरिअल’. साऊथ डकोटामधील ‘लकोटा’ या जमातीच्या पराक्रमी योध्याचा- क्रेझी हॉर्सचा 550 फूट उंच पुतळा इथे साकारण्यात येत आहे. घोड्यावर स्वार झालेला हा योद्धा दूर दिशेला बोट दाखवताना दिसतो. घोड्याचा तुफान वेग आणि नवीन भूमी पादाक्रांत करण्याचं लक्ष्य ह्या कलाकृतीतून दिसणार आहे. 1948 पासून ह्या शिल्पाचं काम सुरू झालं आहे आणि अजूनही बरेच वर्ष सुरू राहील.

कॉर्कझॅकझि ओलकोवस्की ह्यांची ही निर्मिती. ह्या पोलिश वंशाच्या शिल्पकाराने आधी बोरग्लम ह्यांच्या हाताखाली माउंटरशमोरचे काम केले होते. त्यांच्या पश्चात संपूर्ण झिओलकोवस्की कुटुंबाने क्रेझी हॉर्सच्या निर्मितीत स्वतःला झोकून दिलं आहे. हे काम पूर्णपणे ना नफा तत्त्वावर चालत आहे. सरकारने आर्थिक मदत करण्यासाठी बरेचदा हात पुढे केला परंतु झिओलकोवस्की कुटुंब केवळ मेमोरिअल फंडच्या माध्यमातून आर्थिक बाजू सांभाळत आहे. एन्ट्री फी, पार्किंग फी, गिफ्ट शॉप, कपडे यांच्या माध्यमातून पैसे जमवले जातात. एवढच नाहीतर ज्या डोंगरात कोरीव काम चाललं आहे ते दगडही विकायला ठेवलेत.

क्रेझी हॉर्सची पूर्ण मूर्ती कशी दिसेल हे दाखवण्यासाठी प्रस्तावित मूर्तीच्या 1/34 मूर्ती इथे साकारण्यात आली आहे. थंडर हे द माउंटनवर कोरण्यात येणाऱ्या ह्या शिल्पावर जाण्यासाठी पायवाट आहे. जवळजवळ तासा-दीडतासाचा ट्रेकच आहे. अधूनमधून लहानसहान सुरुंग लावण्यात येतात. ते बघण्यासाठी देखील खूप गर्दी होते. रात्री लाईट अँड साऊंड शो पण असतो. पूर्वी हे डकोटा लोक कसे राहायचे हे दाखवण्यासाठी एक छोटं म्युझियम देखील उभारण्यात आलं आहे.

नवीन पिढीला इतिहास कळावा आणि पूर्वजांचा अभिमान वाटावा ह्या साध्या हेतूतून रचला जाणारा हा नवीन इतिहास बघता आला आणि आम्ही त्याचे साक्षीदार झालो याचा आनंद वाटला. आठवण म्हणून आम्ही देखील एक दगड घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *