कर्नाळा पक्षी अभयारण्य

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांचा ओघ दरवर्षी वाढत असून पर्यटकांना अभयारण्याची सर्व माहिती मिळावी म्हणून येथे गाईडही उपलब्ध आहेत. तुम्ही शहरी गजबजाटाला कंटाळला असाल, तुम्हाला थोडीशी विश्रांती व विरंगुळा हवा असेल, निसर्गाचा पुरेपूर आस्वाद घेता येईल, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांमधून वाहणाऱ्या झुळझुळ वाऱ्याची सोबत हवी असेल, अशा स्थळाला भेट द्यायची असेल तर कर्नाळा पक्षी अभयारण्यात जा.

 

रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराजवळील कर्नाळा किल्ल्याच्या आसपासचा परिसर पक्ष्यांच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर सरकारने ‘कर्नाळा पक्षी अभयारण्य’ म्हणून संरक्षित केला आहे.

कर्नाळ्याला एका वर्षात सुमारे 125-150 विविध जातींचे पक्षी आढळतात. सुमारे चार चौरस कि. मी. च्या परिसरात पक्षी अभयारण्य उभारलेले आहे. मुंबईपासून 62 कि. मी. अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे-कल्हाया, रानसई-चिंचवण गावाच्या पंचक्रोशीत हे अभयारण्य वसलेले आहे.

या ठिकाणी आपण केव्हाही गेलो तरी पाचपन्नास वेगवेगळे पक्षी पहायला मिळतात. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकीळ, फ्लाय कॅचर, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ, ससाणे, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी येथे सहज आढळतात. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळते. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, ताम्हण यांचे प्रमाण जास्त आहे. तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, ऐन हे वृक्ष आढळतात. येथे पक्षांव्यतिरिक्त भेकरे, रानमांजरे, माकडे, ससे इ. प्राणीही आढळतात.

या ठिकाणी अतिशय पुरातन कर्नाळा किल्ला आहे. साधारणपणे 12 व्या शतकात बांधलेला कर्नाळा किल्ला 445 मी. उंचीवर आहे.

या किल्ल्यामध्ये असलेल्या टाक्यांवरून हा किल्ला सातवाहनकालीन असावा असे वाटते. मात्र याचा उल्लेख यादवकाळात आढळतो. शिवरायांनी इ.स. 1657 मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. पुरंदरच्या तहात मोगलांना देण्यात येणाऱ्या 23 किल्ल्यांमध्ये कर्नाळा किल्ल्याचा समावेश होता. सन 1670 नंतर महाराजांच्या सैन्याने छापा घालून कर्नाळा किल्ला सर केला. आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी कल्याण प्रांत काबीज केला. पुढे संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला पुन्हा मोगलांनी घेतला. त्यानंतर तो पेशव्यांनी जिंकला. सन 1818 मध्ये जनरल प्रॉथरने हा किल्ला घेतला.

हा किल्ला येथील पक्षी अभयारण्यामुळे अधिक प्रसिद्ध आहे. किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. गड फिरण्यास साधारण अर्धा तास पुरतो. वाटेने किल्ल्यावर येताना एक दरवाजा लागतो. दरवाजा बराचसा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच भवानी मातेचे मंदिर आहे. समोरच मोठा वाडा आहे. वाडा संपूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. समोरच अंगावर येणारा सुळका आहे. सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्याची कोठारे आहेत. सुळका चढण्यास अतिशय कठीण आहे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर पहाण्यासारखे काहीच नाही. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य एका दिवसांत पाहून होण्यासारखे आहे.

किल्ल्याच्या मोक्याच्या स्थानामुळे आणि भोर घाट ते मुंबई या व्यापारी मार्गामुळे याला पूर्वी खूप महत्त्व होते. हा किल्ला देवगिरीच्या राजांच्या अंमलाखाली होता. त्यानंतर 1318 ते 1347 दरम्यान तो दौलताबादच्या मुसलमान राजांच्या आधिपत्याखाली होता. त्यानंतर गुजरातच्या राज्यकर्त्यांनी त्याचा ताबा घेतला. पण 1540 साली त्याच्या कारभाराची सूत्रे अहमदनगरच्या राज्यकर्त्यांकडे गेली.

गुजरातच्या सैन्याने पराभव न मानता पोर्तुगीज सैन्याबरोबर हातमिळवणी केली आणि हा किल्ला पुन्हा मिळवला.

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांचा ओघ दरवर्षी वाढत असून पर्यटकांना अभयारण्याची सर्व माहिती मिळावी म्हणून येथे गाईडही उपलब्ध आहेत.

येथे पक्षी आणि प्राणी दोघांचे दर्शन होते. रानखाटिक, सातभाई, कस्तूर, शिंपी, गिधाड, मुनिया, सुगरण, घार, नीलकंठ, पोपट असे सुमारे 134 जातींचे स्थानिक तर 38 स्थलांतरित प्रकारचे पक्षी येथे पहावयास मिळतात. येथे पर्यटकांसाठी दोन विश्रामगृहे देखील आहेत.

तुम्ही शहरी गजबजाटाला कंटाळला असाल, तुम्हाला थोडीशी विश्रांती व विरंगुळा हवा असेल, निसर्गाचा पुरेपूर आस्वाद घेता येईल, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांमधून वाहणाऱ्या झुळझुळ वाऱ्याची सोबत हवी असेल, अशा स्थळाला भेट द्यायची असेल तर कर्नाळा पक्षी अभयारण्यात जा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *