3.26 कोटी शेतकरी पीक विमा योजनेअंतर्गत
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : 2016 च्या खरीप हंगामामध्ये जवळपास 3.26 कोटी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा करून घेतला आहे. यामध्ये जवळपास 1.37 लाख कोटी रुपयांची विमा रक्कम उपयोगात आणली जाणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBT) व हवामान आधारित पीक विमा योजना (WBCIS) या योजनांचे बळकटीकरण करण्याचे धोरण सरकारने आखले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी दिली.
उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 2016 सालच्या खरीप हंगामात 326 लाख शेतकऱ्यांची, 380 लाख हेक्टरएवढी जमीन पीक विम्याअंतर्गत सुरक्षित केली आहे. त्यासाठी 1,37,535 कोटी रुपये एवढा निधी खर्च झाला आहे. या तुलनेत मागच्या(2015) खरीप हंगामात 309 लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता. याद्वारे 339 लाख हेक्टर पीकांना विमा सुरक्षा मिळाली होती, अशी माहिती कृषिमंत्र्यांनी दिली.
2015 च्या तुलनेत शेतकऱ्यांच्या संख्येत जवळपास 5.5 टक्के व विम्याखालील क्षेत्रामध्ये 12 टक्क्यांची वाढ दिसून आली. पुढील 2-3 वर्षांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना व हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत क्षेत्रांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ करण्याचे ध्येय सरकारने ठवले आहे.