संविधान सन्मान मूक मोर्चा; पुण्यात लाखोंचा जनसागर

पुणे, 27 नोव्हेंबर : संविधान सन्मान आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा बळकट करून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, त्याचबरोबर कोपर्डी प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी लाखोंच्या संख्येने संविधान सन्मान मूक मोर्चात नागरिक सहभागी झाले होते. जाती-धर्म तसेच पंथाच्या समाजाने घालून दिलेल्या चौकटीचे बंध मोडीत काढून मानवी ऐक्याचे दर्शन या मोर्चात जागोजागी झाले. तरुणांचा उत्साह आणि महिलांचा सहभाग हे या मोर्चाचे खास वैशिष्ट्य होते. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी बाराच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील जंगली महाराज रस्ता आणि लक्ष्मी रस्ता या मुख्य रस्त्यांबरोबरच त्यांना जोडणाऱ्या उपरस्त्यांवरची वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद केली जात होती. या रस्त्यांवरून निळ्या आणि पिवळ्या रंगाचे झेंडे घेतलेले नागरिक गटागटाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले होते. डेक्कन चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आल्यामुळे डेक्कन चौक व परिसरात वेगाने गर्दी वाढत होती. त्यामुळे जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक स.गो.बर्वे चौकातून दुसरीकडे वळविण्यात आली होती. हा रस्ता फक्त मोर्चात सहभागी होण्यासाठी खुला ठेवण्यात आला होता.

मोर्चात शिस्तीचे दर्शन :

एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असतानाही या मोर्चात शिस्तीचे जागोजागी दर्शन घडत होते. मोर्चाच्या सुरुवातीला अपंगांची वाहने, त्यापाठोपाठ युवती, महिला, त्यानंतर सुमारे 20 फूट लांबीचा फलक, त्यानंतर तरुण, वृद्ध असा क्रम अगदी नियोजनबद्ध होता.

प्रमुख मागण्या :

– अ‍ॅट्रॉसिटीच्या खटल्यांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करावे.

– खैरलांजी हत्याकांडासह कोपर्डी बलात्कारातील सर्व गुन्हेगारांना फाशी द्या.

– या खटल्यांचे निकाल सहा महिन्यांत द्यावेत.

– मुस्लिम समाजाला 5% आरक्षण द्यावे.

अनेकांना या मोर्चाला येण्याची इच्छा असून सुद्धा पैशाची चणचण असल्यामुळे येता येत नसल्याची खंत अनेक नागरिकांनी व्यक्त केली. तर सुटे पैसे नसल्यामुळे आणि दोन हजाराची नोट कोणी स्वीकारत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. संयोजकांनीही नागरिकांच्या या म्हणण्याला दुजोरा देत नोटाबंदीचा फटका बसल्याचे मान्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *