मृत नदी जीवित करता येईल का?

नदीच्या आसपास होत गेलेले वाढते अतिक्रमण लक्षात घेता नदीला लागणारी स्वत:ची जागा आपण तिला दिली पाहिजे. यासाठी तिला वाहण्यासाठी आखून दिलेली लाल व निळी रेषा पुणेकर नागरिक म्हणून आपण पाळली पाहिजे. आज शहरातून वाहणाऱ्या मुठेच्या कडेने फिरताना एक गोष्ट प्रामुख्याने दिसते व जाणवते ती ही की, तिचे मूळ जीवन संपुष्टात आले असून तिच्यातील वाढते प्रदूषण, टाकला जाणारा कचरा, तसेच त्यामुळे येणारा घाण वास आणि आसपासची अतिक्रमणे यांना आपण आजवर थारा दिला आहे. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आज मुठा संपूर्ण मृतप्राय झाली आहे! ही नदी आपल्या साऱ्यांचीच असून तिची केवळ सामूहिक मालकी नसून सामूहिक तिचे उत्तरदायित्वही आपल्याकडे येते. हे उत्तरदायित्व अर्थातच पुणे शहर व आसपासच्या सर्व गावे व खेड्यातील रहिवाशांकडे पोहोचते. एवढेच नाही तर याची जबाबदारी पुढच्या पिढ्यांच्या खांद्यावरही ठेवायची आहे. या सर्व लाभार्थींचे कर्तव्य म्हणजे या नदीला स्वच्छ, ताजी टवटवीत व नैसर्गिक पद्धतीने वाहती ठेवणे ही आहे. यासाठी आपण व आपले अन्य शहरवासी ही नदी अस्वच्छ करणार नाहीत यासाठी दक्ष राहायला हवे.

 

पुण्यातून वाहणाऱ्या मुळा-मुठा या दोन्ही नद्या आरंभापासून पुण्यात येईपर्यंत नैसर्गिकरीत्या खळाळत वाहतात आणि शहरात शिरल्यावर मात्र शहरातील सांडपाणी व वाढत्या प्रदूषणामुळे मृत होत जातात. या अवस्थेत मुठा नदीचा मुळेशी संगमही होतो. जगात सर्वत्रच मानवी संस्कृती ही नदीच्या काठावर येऊन वसली व बहरली. तिथे गावे, नगरे व महानगरेही झाली. पण त्यांनी नदीला प्रदूषित केले. मुठेप्रमाणे ज्या ज्या नद्या शहरी भागांमधून वाहात गेल्या, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे प्रदूषण टोकाला गेले व त्या मूळ नैसर्गिक स्वरूपापासून वंचित राहिल्या.

पुणे शहरातून बाहेर पडणारी मुठा नदी ही पुढे भीमा नदीला मिळेपर्यंत येणाऱ्या ग्रामीण भागातील रहिवाशांनाही तिच्या प्रदूषणाचा प्रादुर्भाव पोचतो. पुण्यातून वाहणाऱ्या मुठेचे प्रदूषण कमी करून तिला पुन्हा एकदा जीवित नदी करणे शक्य आहे, असा आशावाद जागवत जीवित नदी याच नावाच्या संस्थेने पुणे शहरात दुसऱ्यांदा मुठाई महोत्सवाचे आयोजन केले होते. साठ-सत्तरच्या दशकापर्यंत चांगल्या स्थितीत असणारी मुठा नदी ही ऐंशीच्या दशकानंतर प्रदूषित होत गेली व तिचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पुणे महापालिकाही अयशस्वी ठरली आहे. नदीवर आतापर्यंत करोडो रुपये खर्च करूनही या नदीचे स्वरूप वाहत्या गटारापेक्षा वेगळे नाही. महापालिकेने आतापर्यंत 12 ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारूनही नदीचे स्वरूप तितकेच चिंताजनक बनले आहे.

नदीच्या काही भागातून जाताना येणारा प्रचंड दुर्गंध व कचरा याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मुठा नदी सुधारण्यासाठी केंद्र सरकारने जायका प्रकल्प जपान सरकारच्या मदतीने पुण्यासाठी तयार केला आहे. त्यातून किमान शहरातील सांडपाणी व मैलापाणी स्वच्छ होऊन नदीत सोडले जाईल. ते होईल तेव्हा होवो, पण नदीची मूळ स्थिती जी उगमापासून निखळ व खळाळती आणि स्वत:त जैविक विविधता घेत पुढे जाणारी आहे, ती पुन्हा एकदा नव्याने निर्माण करता येईल का, हा आज खरा कळीचा प्रश्न आहे.

सत्तेवर येणाऱ्या राजकीय नेत्यांनी नदीची स्वच्छता व शुद्धता हा प्रश्न स्वातंत्र्योत्तर काळात कधीच हाती घेतला नव्हता. आजही अगदी महापालिका निवडणुका ऐन तोंडावर आल्यानंतरही नदीसाठी काही ठोस काम करू असे सांगून मते मिळतील अशी कोणतीही शक्यता नाही. तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमी, नदी व पाण्यावर काम करणाऱ्या अभ्यासकांची व संस्थांची एक मोठी फळी असतानाही मुठा नदीचे दैन्य कमी करा हे सांगणारा या संस्था व तज्ज्ञांचा तसेच नदीवर प्रेम करणाऱ्या पुणेकरांचा आवाज आजही तितकाच क्षीण वाटतो. अशा स्थितीत मुठेला पुन्हा सुगीचे दिवस कसे येतील, हा प्रश्न पडतो. ज्या नदीत आम्ही लहान असताना आपण पोहायला शिकलो, तिथले मासे रुमालात पकडून बाटलीतून आणून घरी पाळले, त्या तेव्हाच्या स्वच्छ नदीत आज हात घालायचा म्हटले तरी दहा वेळा विचार करावा लागतो. तसेच मुठा नदीचा हा उज्ज्वल भूतकाळ उद्याचा भविष्यकाळ होईल का हा प्रश्नही आपण काळजीपोटी विचारतो.

कोणतीही नदी, मग ती मुळा-मुठा का असेनात, ही निसर्गाच्या परिसंस्थेचा (इकोसिस्टिम) अविभाज्य भाग म्हणून काम करते. नदीमध्ये जर सुधारणा झाली तर पर्यायाने ते निसर्गचक्रही सुधारायला मदत होईल. मुळात मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गचक्र प्रत्येक मोठ्या आकाराच्या मानवी वस्तीपाशी बिघडलेले दिसते. ते पुन्हा कसे दुरुस्त करता येईल याचा विचार जीवित नदीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुठाई महोत्सवात करण्यात आला. या कामासाठी अगदी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनाही बोलावण्यात आले होते. स्मार्ट सिटीकडे आपली वाटचाल चालू असताना मुठा नदीतील सुधारणा ही आता तरी खऱ्या अर्थाने सामूहिक चळवळ बनायला हवी.

मुठा नदीचाच प्राचीन इतिहास :

– भूशास्त्रातील पुरातत्त्व विषयाचे (जिओआर्किओलॉजी) पुणेकर अभ्यासक डॉ. शरद राजगुरू यांनी मुठा नदीचा गेल्या दोन लाख वर्षांपासूनचा इतिहास काय असावा याचा अभ्यास केला आहे. त्यांनी मुठा नदीवर 1964 मध्ये पीएच् डी. ही केली होती. या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे 1961 मध्ये आलेल्या पानशेत पुराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे संशोधन केले होते. पुण्यात जन्मलेल्या डॉ. राजगुरूंनी त्या काळात आलेल्या पुरांचाही अभ्यास या संशोधनातून मांडला. त्याचबरोबर मुठेचा प्राचीन इतिहासही त्यांनी तपासला. मुठेला आलेला हा पूर तपासताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली ती ही की, तेव्हा नदीच्या परिसरात (कॅचमेंट एरिया) विक्रमी पाऊस झाला होता. मुठेला जेव्हा जेव्हा पूर आला तेव्हा तेव्हा या भागात असाच जोरदार पाऊस झाला होता.

– गेल्या दोन लाख वर्षांमध्ये या परिसरातील भौगोलिक बदल कोणते होत गेले असावेत यासाठी डॉ. राजगुरू व आताचे त्यांचे तरुण संशोधक सहकारी निखिल पवार यांनी मुठा नदीचा उगम असणाऱ्या टेमघर धरणापाशी असलेल्या भागाला भेटीही दिल्या आहेत. याशिवाय या भागाचा विस्तृत अभ्यास केला. गेल्या दोन चार वर्षांतील त्यांचा संयुक्त संशोधन पेपर डॉ. राजगुरू व पवार यांनी इस्तंबूल येथे पाठवला आहे. मुठा नदीचा हा मूलभूत अभ्यास बहुधा प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला जातोय.

– 1964 मधील आपल्या संशोधनाचा संदर्भ देताना डॉ. राजगुरू म्हणाले की, गेल्या दोन लाख वर्षांमध्ये मुठा नदीच्या वाहण्यातील भौगोलिक बदलांच्या अभ्यासात त्यात फार मोठे बदल झाले नाहीत. वाहत्या नदीचा प्रवाह कधी समुद्रसपाटीपासून थोडा वर तर कधी थोडा खाली गेला आहे. तसेच नदीचे पात्र आज आहे, तेवढेच पूर्वीही होते. जागतिक हवामानातील बदलानुसार या भागातही गेल्या 50 हजार वर्षांत काही बदल झाले इतके. या भागात पूर्वी कदाचित काही भूकंप झाले असल्याची शक्यता आहे. डॉ. राजगुरूंच्या मते सुमारे 13 हजार वर्षांपूर्वी मुठा नदीला मोठे किंवा प्रचंड पूर आले असावेत. पानशेत पूर यातही नैसर्गिक कारणे आहेतच.

– विशेष म्हणजे या भागात डॉ. राजगुरू यांना काही अश्मयुगीन हत्यारेही सापडली. येथे सापडणारा बेसॉल्ट दगड व गारेच्या दगडाचा वापर स्थानिक लोक हत्यारांसाठी करत असावेत. मुठा नदीच्या परिसरातील भीमा नदीच्या परिसरात चंडोली या गावात आढळलेल्या जीवाश्मानुसार तेथे शहामृगांच्या अंड्यांचे तुकडे मिळाले. तसेच आजच्या गाय व बैलांच्या मूळ जाती, तसेच हत्ती होते असे काही पुरावे मिळाले आहेत. मुठेचा अभ्यास हा एक प्रकारे भारतातील बहुतेक नद्यांचा अभ्यासाचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. डॉ. राजगुरूंनी त्यासाठी भारतातील बहुतेक नद्या पाहून त्या परिसरातही त्यांनी बरेच संशोधन केले आहे. नद्यांमधील बदल हा बदलत्या हवामानबदलानुसार घडून आल्याचे इतर नद्यांप्रमाणे मुठेबाबतीतही सांगता येईल.

– डॉ. राजगुरू म्हणाले की, पावसाळा हा स्वतंत्र ऋतू ही भारताला निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. तसेच मध्यपूर्वेप्रमाणे आपल्या देशात राजस्थान वगळता कुठेही वाळवंट नाही. पोषक हवामान व पाऊस ही नैसर्गिक देणगी मिळाल्यानेच भारतात सुवर्णयुग होते असे सांगितले जाईल. पहिल्यापासूनच आपल्या देशात पाऊस कमी अधिक पडतो पण तो कधी पडतच नाही असे घडत नाही. या पावसामुळेच मुठेच्या उगमाचा इतिहासही सुमारे अडीच लाख वर्षे मागे जातो. या भागात घनदाट जंगल नव्हते पण नदीच्या प्रदेशात प्रामुख्याने शेती हा मोठा उद्योग होता. विशेष म्हणजे पुण्याजवळील थेऊरसारख्या ठिकाणी गेल्या तीन हजार वर्षांत शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याचे स्पष्ट दिसते. त्या ठिकाणी जोरवे ही संस्कृती नांदत होती. त्या अर्थाने मुठेच्या अस्तित्वामुळे पुण्यात सातवाहन काळापासूनचे अनेक पुरावे सापडतात.

– पुन्हा पानशेत पुरासंबंधी बोलताना डॉ. राजगुरू म्हणाले की, पानशेत पुराची कारणे ही जरी मनुष्यनिर्मित असली तरी प्रचंड पावसाला अडवणारे धरण आपल्याकडे नव्हते. तेव्हा खडकवासला परिसरात 400 इंच पावसाची नोंद झाली होती. हा सर्व भाग पश्चिम घाटाचाच एक तुकडा असल्यामुळे या भागात दररोज आठ ते दहा इंच इतका पाऊस पावसाळ्यात पडतो. पाण्याचा साठा प्रचंड असल्यामुळे धरणांची दारे पाणी वाहून जाण्यासाठी उघडावी लागतात. वाढत्या शहरीकरणाचा फटका मुठा नदीला बसला आहे. पण त्यापेक्षाही भविष्यात मोठा धोका आहे तो या नदीतील वाळू उपशासंबंधीचा. नदीच्या वाहत्या प्रवाहामुळे दगडापासून गुळगुळीत वाळू तयार होण्याच्या प्रक्रियेस हजारो वर्षांचा कालखंड जावा लागतो. त्या अर्थाने वाळू ही आपली स्वत:ची असणारी नैसर्गिक संपत्ती आहे. ती नदीच्या पात्रात अबाधित राहिलीच पाहिजे. वाळू उपशाच्या संकटापासून आतापासूनच आपण सावध राहायला हवे, असा इशारा डॉ. राजगुरूंनी दिला आहे.

जीवित नदीतर्फे मुठाई महोत्सव :

– मुठा नदीसंबंधी तीन वर्षांपूर्वी समविचारी माणसे एकत्र आली आणि त्यांनी जीवित नदी ही संस्था स्थापन केली. यामागे अर्थातच निसर्गाचा जागरूकपणे अभ्यास करणारे इकॉलॉजिकल सोसायटीचे संस्थापक कै. डॉ. प्रकाश गोळे यांची प्रेरणा होती, असे जीवित नदीच्या शैलजा देशपांडे यांनी सांगितले. मुठा नदीबद्दल दिसणारी वाढती अनास्था लक्षात घेऊनच हा गट स्थापन करण्यात आला. गेल्या वर्षी प्रथमच मुठाई महोत्सव सुरू करण्यात आला. यामागे नदीचे होत चाललेले वाढते प्रदूषण तसेच तिची अवस्था कचराकुंडीप्रमाणे होणे या विरोधात वाढता लोकसहभाग व लोकमताचा दबाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हा भाग होता.

– या चळवळीमागचे एक व्यापक सूत्र आहे, ते हे म्हणजे केवळ मुठा नदी व निसर्गच नव्हे तर ही संपूर्ण पृथ्वी आपल्याला पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळाली नसून ती पुढच्या पिढीकडून आपण उसनी घेतली आहे. हे सूत्र मुठा नदीच्या जतन, संवर्धन व तिला जीवित नदी करण्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न करण्याची शपथ या उपक्रमातून घेतली जाते. मुठेचा उगम असणाऱ्या लवार्डे गावापासून खडकवासल्यापर्यंत चांगल्या स्थितीत असणारी ही नदी विठ्ठलवाडीतून पुण्यात शिरत असताना मात्र आसपासच्या मानवी वस्तीमुळे हळुहळू प्रदूषित होत जाते. आपली शहरातून वाहणारी नदी किती सुंदर होती, या रम्य भूतकाळात न वावरता तिला तिचे मूळ नैसर्गिक रूप पुन्हा कसे मिळवून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे देशपांडे यांनी स्पष्ट केले. अशा स्थितीत मी मुठा नदीसाठी काय करू शकतो या एकाच कळीच्या मुद्द्याभोवती हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.

– नदीच्या आसपास होत गेलेले वाढते अतिक्रमण लक्षात घेता नदीला लागणारी स्वत:ची जागा आपण तिला दिली पाहिजे. यासाठी तिला वाहण्यासाठी आखून दिलेली लाल व निळी रेषा पुणेकर नागरिक म्हणून आपण पाळली पाहिजे. या भागात कोणतीही बांधकामे वा अतिक्रमणे होणार नाही याची काळजी पुणे महापालिकेबरोबरच पुणेकर नागरिक म्हणून प्रत्येकाचीच आहे. नदीसाठी आखून दिलेल्या या रेषांचे उल्लंघन केल्यामुळेच चेन्नईत पूर आला होता. या दोन्ही रेषांचा आदर करण्यासाठी जीवित नदीतर्फे एक मानवी साखळी मुठा नदीच्या परिसरात तयार करण्यात आली होती.

– यापूर्वी डॉ. गोळे सरांनी नदीकाठच्या पक्ष्यांच्या विविध जाती कोणत्या आहेत यावर तर वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. विनया घाटे यांनी या भागातील 135 सपुष्प वनस्पतींचा अभ्यास केला आहे. मृणालिनी वनारसे, पक्षीमित्र किरण पुरंदरे, प्रगती कौशल, जलसाक्षरतेवर काम करणारे विश्वास येवले, वनस्पती अभ्यासक डॉ. अंकुर पटवर्धन यांनीही मुठेच्या परिसरातील जीव व वनस्पतींचा वेळोवेळी अभ्यास केला आहे. प्राणीतज्ज्ञ डॉ. हेमंत घाटे यांनी मुळा, मुठा व पवना नदीतील जीवसृष्टीचा अभ्यास करताना 1990 पर्यंत माशांच्या अनेक जाती नष्ट झाल्याचे सांगितले. 1950 पर्यंत डासांना नष्ट करणारे गप्पी मासे नदीत होते. तीच स्थिती खेकडे व झिंगे या माशांची आहे. हे खेकडेही आता प्रदूषित झाले आहेत. याशिवाय वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे घातक बॅक्टेरियाचे जंतूही या भागात आढळतात.

– वनस्पती अभ्यासक श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनीही मुठा नदीच्या उगमापाशी असणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास केला आहे. तर डॉ. संजय खरात यांनी मुठेतील मत्स्य जीवनावर एक शोधनिबंधही लिहिला आहे. नदीचे प्रदूषण कमी होण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादासाठी पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी केलेले प्रयत्नही तितकेचे मोठे व मोलाचे आहेत. डॉ. स्वाती गोळी यांनी भूशास्त्राच्या दृष्टीने नदीचा अभ्यास केला आहे. तसेच पुण्यातील नद्यांच्या जीविततेसाठी त्यांनी परिसंस्था विकास आराखडे (इको डेव्हलपमेंट प्लॅन) तयार केले आहेत. आपली नदी ही शहराचे पर्यावरण व सौंदर्य खुलवणारा दुवा असल्यामुळे नदीचे चित्र काढण्याची स्पर्धाही या उपक्रमातून घेतली जाते.

मुठा नदीला पुन्हा जीवित नदी कसे करता येईल?

– यासाठी आधी मुठा नदीला एक नदी म्हणून तिला तिचे अधिकार मिळवून दिले पाहिजेत, असे प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले. हे अधिकार कोणते आहेत, तर आधी नदीला तिला वाहण्यासाठी लागणारी स्वत:ची जागा तिला मिळवून दिली पाहिजे. वाहण्यासाठी तिला लागणारे स्वत:चे पाणी दिले पाहिजे व तिचे स्वत:चे नदी म्हणून असणारे जीवन तिला परत मिळवून दिले पाहिजे. या तीन मूलभूत आधिकारांचा समावेश असणारा एक जाहीरनामाच जीवित नदीच्या मुठाई महोत्सवातून जाहीर करण्यात आला आहे.

– पुणे महापालिकेतर्फे नदीसाठी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प सुरू होण्यापूर्वी येत्या 100 दिवसांमध्ये लोकसहभाग असावा म्हणून एक लाख लोकांच्या सह्या या जाहीरनाम्याखाली घेण्यात येणार आहेत. मगच तो राज्य व केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागांना सादर करण्यात येणार आहे. तसेच मुठा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने एक कृती आराखडाही तयार करण्यात येणार आहे. ते काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल. मुठेला जीवित नदी करण्यासाठी कोणते धोरण ठरवावे याचाही आग्रह धरला जाणार आहे. नदी म्हणून आपल्याला काय हवे हे मुठा नदी बोलू शकत नाही. म्हणूनच हा जाहीरनामा आम्ही तयार करत आहोत, असे शैलजा देशपांडे यांनी सांगितले. यातून नदीच्या आसपासची सर्व अतिक्रमणे हटवणे यालाही तितकेच प्राधान्य देण्यात आले आहे. लाल व निळ्या पूररेषांचा सन्मान केला गेला पाहिजे असा आग्रहही त्यातून धरला जाणार आहे. नदीतील व आसपासची जैविक विविधता अबाधित राहावी यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत हेही त्यातून सुचवले जाणार आहे.

– पुणे शहराचा उदय व विकास या दोन्ही पातळ्यांवर मुठेचा सहभाग मोठा असून तो नाकारता येत नाही. जगातल्या इतर कोणत्याही नद्यांप्रमाणे मुठेनेही तिच्या दोन्ही काठांना लागून असणारा भूभाग समृद्ध व सुजलाम सुफलाम केला आहे. केवळ शेतीलाच नव्हे, तर नदीलगतच्या शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवताना या भागात विकसित झालेल्या उद्योगांची भरभराटही मुठेमुळे शक्य झाली आहे. या नदीतील मासे व अन्य जीव यांनी या शहराला व तेथील अनेक समाजांना एक अन्न म्हणून पुरवठा व उपजिविकेचे साधन म्हणून भूमिका बजावली आहे.

– वर्षभर मुठेच्या स्वच्छ वाहत्या प्रवाहामुळेच तिच्या आसपासचा समृद्ध परिसर अस्तित्वात आला असून त्याचा विकासही त्यातून साध्य झाला आहे. यापूर्वी मुठा नदी व तिच्या आसपासच्या परिसरातील लोक व लोकजीवन यांनी तिच्यासह असणारे आपले अर्थपूर्ण सहजीवन समृद्ध केले आहे. हा भूतकाळ कितीही सुंदर व रम्य असला तरी आज मुठेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एकेकाळी तिच्यातून स्वच्छ वाहणारे झुळझुळते पाणी आता संपूर्ण प्रदूषित व मैलापाणी बनून वाहते आहे. अशा स्थितीत तिचा मूळ उद्देश लक्षात घेऊन निसर्गाचा एक मूलभूत घटक असणारी एक परिसंस्था म्हणून तिचे प्राधान्याने जतन होणे हीच आजची खरी गरज आहे. मुळात तिच्यात एकेकाळी अस्तित्वात असणारी नैसर्गिक साखळीच आता नष्ट झाली आहे. आज शहरातून वाहणाऱ्या मुठेच्या कडेने फिरताना एक गोष्ट प्रामुख्याने दिसते व जाणवते ती ही की, तिचे मूळ जीवन संपुष्टात आले असून तिच्यातील वाढते प्रदूषण, टाकला जाणारा कचरा, तसेच त्यामुळे येणारा घाण वास आणि आसपासची अतिक्रमणे यांना आपण आजवर थारा दिला आहे. या साऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आज मुठा संपूर्ण मृतप्राय झाली आहे!

– तिची ही शोचनीय अवस्था पाहून तिला पुन्हा तिचे गतवैभव व अधिकार मिळवून दिले पाहिजेत, असे पर्यावरणाचा आदर करणारे पुणेकर म्हणून आपल्याला वाटायला हवे. मुठेला तिचे मूळ हरवलेले अस्तित्व पुन्हा मिळवून द्यायला हवे. एक नैसर्गिक परिसंस्था म्हणून आपण मुठेचे जतन व संवर्धन अत्यंत जाणीवपूर्वक करायला हवे. मुठेने पुन्हा एकदा तिच्या स्वत:च्या पाण्यात व नदीकाठच्या प्रदेशात तिची मूळ जैविक विविधता निर्माण करावी अशी आपण परिस्थिती निर्माण करायला हवी. पर्यायाने यातून नदीकाठच्या लोकांचे आरोग्यही सुधारणार आहे. आजच्या बदलत्या परिस्थितीतही नदी व आसपास असणारे तिचे सहजीवन व जनतेशी असणारे तिचे नाते हे तितकेच संदर्भ असणारे व उपयुक्त असेल.

– यासाठी मुठा नदीचा पर्यावरणीय व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तिचा हा मूळ उद्देश जनतेपर्यंत पोचवून त्यासंबंधी जनजागृती निर्माण करावी लागणार आहे. मुठेच्या या समृद्ध वारशात तिच्याभोवती बांधले गेलेले सुंदर घाट आणि आराध्य देवालये तसेच तिला जोडणारी ऐतिहासिक तळी, पाणीपुरवठा यंत्रणा, पाण्याचे संरक्षण करणाऱ्या भिंती व नदी व परिसरातील जलचर व आसपासचे वनस्पतीजीवन याचे धोरणात्मक नियोजन करणे शक्य आहे. ही नदी आपल्या साऱ्यांचीच असून तिची केवळ सामूहिक मालकी नसून सामूहिक तिचे उत्तरदायित्वही आपल्याकडे येते. हे उत्तरदायित्व अर्थातच पुणे शहर व आसपासच्या सर्व गावे व खेड्यातील रहिवाशांकडे पोहोचते. एवढेच नाही तर याची जबाबदारी पुढच्या पिढ्यांच्या खांद्यावरही ठेवायची आहे. या सर्व लाभार्थींचे कर्तव्य म्हणजे या नदीला स्वच्छ, ताजी टवटवीत व नैसर्गिक पद्धतीने वाहती ठेवणे ही आहे. यासाठी आपण व आपले अन्य शहरवासी ही नदी अस्वच्छ करणार नाहीत यासाठी दक्ष राहायला हवे.

– त्यासाठी किमान यापुढे तरी तिच्या आसपास कोणतीही अतिक्रमणे होणार नाहीत आणि नदीच्या शाश्वत परिसंस्थेस थेट बाधा पोहोचेल इथवर आपण तिची पिळवणूक करणार नाही, यासाठीही जागरूक राहायला हवे. मुठेशी आपले यापुढेही राहणारे अर्थपूर्ण नाते लक्षात घेता काही कायदे व नियम करणे आवश्यक आहे. एक समाज व व्यक्ती म्हणून त्याबाबत काही शिस्त पाळणे गरजेचे आहे.

उगमस्थानापाशी नैसर्गिक असणारी मुठा नदी पुण्यात शिरल्यानंतर प्रदूषित होते व मृत अवस्थेत पुढे जाते. त्यामुळे तिला पुन्हा एकदा सामूहिक प्रयत्नांनी जीवित करणे शक्य आहे. पुणे महापालिकेप्रमाणे हे प्रत्येकाचेच काम आहे. यासाठी कृत्रिम रसायन विरहित (आर्टिफिशिअल केमिकल फ्री) पर्यावरणपूक जीवनशैली पुणेकर म्हणून आपण अंगीकारायला हवी.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिकेने एक पुस्तिका तयार केली असून ती शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. महानगर बनलेल्या पुण्यात 34 लाख लोकसंख्या असून 744 एम्एल्‌डी मैलापाणी निर्माण होते. त्यात मानवी मलमूत्र, घरगुती वापराचे पाणी यांचा समावेश आहे. घरात दात घासणे, भांडी घासणे, कपडे धुणे, आंघोळ व हात धुणे इत्यादींसाठी दररोज 15 ते 20 ग्रॅम रसायने पुणेकरांकडून रोजच्या सांडपाण्यात मिसळली जातात. योग्य पद्धतीचा वापर झाला तरच सांडपाणी सुमारे 18 तासांनी स्वच्छ होते.

आपल्याकडे तयार होणारे हे सांडपाणी प्रक्रिया क्षमतेबाहेर असून त्यावर कृत्रिम रसायनविरहित जीवनशैली हाच उपाय आहे, असे डॉ. मोघे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. महापालिकेच्या इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्रात ही पुस्तिका डॉ. सुचेता करंडे यांनी तयार केली असून महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे व पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांचे या उपक्रमास मार्गदर्शन लाभले आहे. ही पुस्तिका प्रत्येक पुणेकराने वाचायला हवी. तर त्याला मुठा नदीच्या संदर्भात आपण काय करू शकू याचे भान यायला मदत होईल.

 

विठ्ठलवाडी भागात दिसणारी प्रदूषित मुठा नदी

मुठाई महोत्सवात पुणेकर कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

मुठेचा पुरातत्त्वअंगाने अभ्यास करणारे डॉ. शरद राजगुरू व त्यांचे तरुण सहकारी निखिल पवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *