ग्रामीण भागात डिजिटल बँकेचे काम करणार ‘आपले सरकार’ : मुख्यमंत्री

मुंबई, 28 नोव्हेंबर : राज्यात डिजिटल बँकिंगची सुविधा 30 हजार केंद्रांवर ‘आपले सरकार’वर उपलब्ध करून देणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर ही केंद्रे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम पाहतील.

ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी वर्ग, वाहतूकदार यांनाही सुविधा निर्माण होणार आहे. कॅशलेस अर्थव्यवस्था अंगीकारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. त्या दृष्टीने नियोजन करून पंतप्रधानांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चलनातून 500 < व 1000 < च्या जुन्या नोटा बंद करण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बँक समितीची बैठक बोलावली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत व्हावेत. तसेच रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना, ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांमध्ये रोकड उपलब्ध करून देण्यात यावी – असे मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामामध्ये तयार झालेले पीक शेतकऱ्यांना बाजारात विक्री करता यावे. यासाठी व्यापारी, वाहतूकदार, शेतकरी यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी बँकांनी पुढाकार घेण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते खरेदी करणे सोपे व्हावे, यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरून अधिकृत विक्रेत्याच्या खात्यात पैसे जमा करण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी बँकांनी तयारी दर्शविली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांमध्ये गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून बँकांमधील अधिकारी, कर्मचारी यांनी अतिरिक्त वेळ देऊन परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

पुढील काही दिवस अशाच प्रकारचे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेतकरी आणि खास  करून शेतमजूर यांच्यासाठी आपल्याला जास्त काम करावे लागणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या यंत्राची संख्या वाढविण्यात यावी, त्यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, वित्त विभागाचे अप्पर सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, विविध विभागांचे प्रधान सचिव उपस्थित होते. त्याचबरोबर राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, नाबार्ड तसेच मोबाईल वॉलेट कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *