कॅशलेस व्यवहार करा – ‘मन की बात’ मध्ये मोदींचे आवाहन

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : नोटाबंदी निर्णयानंतर पहिल्याच ‘मन की बात’ कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर ‘अर्थव्यवस्था कॅशलेस होणे, हे आत लगेचच शक्य नाही. मात्र रोख रकमेवर कमीत कमी अवलंबून राहणे शक्य आहे. लोकांनी रोख रकमेचा कमीत कमी वापर करावा.’, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी लोकांना संयम पाळण्याचे आवाहन केले. ‘कार्ड पेमेंट, इतर इलेक्ट्रॉनिक पेमेंट करणे शिकायला हवे. कॅशलेस अर्थव्यवस्था सुरक्षित आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबियांना त्याचबरोबर छोट्या व्यावसायिकांना देखील डिजिटल पेमेंटचे फायदे सांगू शकता. तुम्ही दररोज तुमच्या पाच शेजार्‍यांना ऑनलाईन आणि डिजिटल पेमेंटची माहिती देऊ शकता. त्यांना कॅशलेस व्यवहार कसे करायचे ते सांगू शकता,’ असे मोदींनी सुचविले.

नोटाबंदीच्या समर्थनाचे दाखलेही त्यांनी यावेळी दिले. ‘सुरतमध्ये लग्नसोहळ्यात पाहुणेमंडळींना केवळ चहा देण्यात आला. त्यासाठी अवघे रु. 500/- लागले. अकोल्यात एका ढाब्यावर मोफत जेवण देण्यात आले. ही उदाहरणे काळ्या पैशांविरोधातील मोहिमेला बळकटी देणारी आहेत.’ असे मोदी म्हणाले.

नोटाबंदीचा निर्णय कठोर आहे, पण त्यामुळे उद्याचे भविष्य उज्ज्वल आहे. अशा शब्दात या निर्णयाचे समर्थन करताना मोदी यांनी विरोधी पक्षांवरही जोरदार टीका केली. मोदींनी ‘भारत बंद’च्या मुद्द्यावर विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधानांनी या वेळी बँक कर्मचाऱ्यांचे आवर्जून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *