कॅन्सर (कर्करोग) विषयी संशोधन होण्याची आवश्यकता : मुख्यमंत्री

पुणे, 26 नोव्हेंबर : कॅन्सर (कर्करोग) हा अत्यंत त्रासदायक आजार असून, याचा परिणाम रुग्णासोबत त्याच्या संपूर्ण परिवाराला भोगावा लागतो. कॅन्सरचे पहिल्या टप्प्यात निदान होऊन योग्य उपचार झाल्यास हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. कॅन्सर या रोगावरील उपचार महागडे असून, त्यावरील खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी या क्षेत्रात अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेरगाव येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या नवीन कॅन्सर विभागाच्या
उद्‌घाटन प्रसंगी केले.

या उद्‌घाटन प्रसंगी बिर्ला ग्रुपच्या प्रमुख राजश्री बिर्ला, चेअरमन कुमारमंगलम् बिर्ला, विश्वस्त आश्विन कोठारी व महापौर शकुंतला धराडे इ. मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘दिवसेंदिवस महाराष्ट्रात तसेच देशातही कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कॅन्सरच्या रुग्णांना किरणोत्साराची उपचार पद्धती घ्यावी लागते. ही उपचारपद्धती मोठी त्रासदायक असून त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात. या रुग्णालयात उभारण्यात आलेल्या नव्या कॅन्सर विभागात अत्याधुनिक मशिनरीचा व तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या रुग्णालयाचा उपयोग पुण्यासह राज्यातील अन्य ठिकाणच्या कॅन्सरपीडित रुग्णांना होणार आहे. या उद्योगसमूहाचे सामाजिकदायित्व कौतुकास्पद असून केवळ फायद्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला नाही तर यामागे सामाजिक दायित्वाची भावना आहे.’

तत्पूर्वी राजश्री बिर्ला प्रास्ताविकात म्हणाल्या, ‘आदित्य बिर्ला यांना कॅन्सर असल्याचे निदान 1993 मध्ये झाले होते. पण पुढील दोन वर्षांतच ते आम्हाला सोडून गेले. त्यांच्या स्वप्नपूर्तीचा आज दिवस आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांना अत्याधुनिक उपचार देण्यात येणार आहेत. हे रुग्णालय म्हणजे निदान व उपचाराचे अद्ययावत केंद्र असणार आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *