‘एअरटेल’ मार्फत भारतातील पहिली पेमेंट बँक सुरू

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : ‘एअरटेल’मार्फत भारतातील पहिली पेमेंट बँक ‘एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेड’ सुरू करण्यात आली असून या बँकेने राजस्थानमध्ये मर्यादित स्वरूपात सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे.

या बँकेत खाते सुरू करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज लागणार नसून आधारकार्डावर आधारित ‘ई-केवाय्‌सी’ या नवीन प्रणालीचा वापर होणार आहे. ग्राहकाचा मोबाईल क्रमांक हाच त्यांचा खातेक्रमांक असणार आहे. तसेच एअरटेल ते एअरटेल मोबाईल क्रमांकावर हस्तांतरण मोफत असणार आहे. एअरटेलची किरकोळ विक्रीची सुमारे 10000 केंद्रे खाते सुरू करणे, पैसे भरणे व काढणे इ. सेवा पुरवतील.

या बँकेमार्फत बचत खात्यांवर 7.25% व्याजदर देण्यात येणार आहे. हा व्याजदर व्यापारी बँकांकडून देण्यात येणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त आहे. पेमेंट बँक (देयक बँक) असल्यामुळे या बँकेस ग्राहकांना कर्ज देता येणार नाही. पण बँक आपल्या कर्मचाऱ्यांना ठराविक अटींची पूर्तता केल्यानंतर कर्ज देऊ शकते. तसेच ही बँक
1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी स्वीकारू शकते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुरू करण्यासाठी अंतिम मान्यता मिळवणारी ही पहिली पेमेंट बँक आहे. कोटक महिंद्रा बँकेची या बँकेमध्ये सुमारे 20% भागीदारी आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेने 11 पेमेंट (देयक) बँकांना मंजुरी दिली होती.

पेमेंट बँक (देयक बँका) :

अपेक्षित कार्ये : ठेवी स्वीकारणे, भरणा करणे, देणी भागवणे इ. या बँका देणी भागवण्यासाठी एटीएम् कार्ड, डेबिट कार्ड निर्गमित करतील.

पात्रता : प्रीपेड सेवा देणारी कंपनी, गैरबँकिंग वित्तीय कंपनी, दूरसंचार कंपनी, सुपर मार्केट साखळी, उद्योग, रिअल इस्टेट उद्योग, सहकारी संस्था देयक बँक परवान्यासाठी अर्ज करू शकतात.

किमान भरणा भांडवल : लघु वित्त बँकेप्रमाणेच < 100 कोटी.

प्रवर्तकाचा वाटा : वाणिज्य बँकांप्रमाणेच सुरुवातीची 5 वर्षे. किमान 40% राहिला पाहिजे.

भांडवली मर्यादा : रिझर्व्ह बँकेत सीआर्‌आर्‌ ठेवावा लागेल. जेवढ्या मागणी ठेवी जमा झालेल्या आहेत, त्यापैकी किमान 75% रक्कम शासकीय प्रतिभूतींमध्ये गुंतवावी लागेल. बँक ठेवींमध्ये 25% पेक्षा जास्त रक्कम गुंतवता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *